Sunday 17 February 2013

डुक्कराचे वाघाला आव्हान!

डुकरे ही नेहमीच घाणेरडी गणली जातात. पण पूर्वीच्या काळी ती तशी नव्हती. अरण्यांतल्या इतर प्राण्यांसारखी तीही स्वच्छ असत. ही डुकरे घाणेरडी कशी झाली त्याची एक मजेदार गोष्ट आहे. मेघालयातल्या अरण्यांत सगळी जनावरे खेळीमेळीने राहात होती. अरण्यांत सर्वांना पुरेसे खाद्य, गवत, इत्यादि भरपूर होते. एके दिवशी एक वाघ भक्ष्य शोधण्यासाठी निघाला.

त्याला पोटभर प्राणी खायला मिळाले. जिभल्या चाटत तो पाण्याच्या शोधांत निघाला. इकडेतिकडे हिंडल्यानंतर त्याला एक लहानसा तलाव दिसला. तो काठाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. त्याच वेळी एक डुकराचे पिल्लू चिखलांत खूप वेळ खेळत होते. आणि समोरच्या बाजूला तेही पाण्यांत शिरुन पाणी पिऊ लागले. त्याने जेव्हा वाघाला पाहिले, तेव्हा ते भीतीने गारठले. त्याला पळून जाणे व बचाव करणे अगदी अशक्य होते.



इकडे वाघाला इतकी तहान लागली होती की ते पिल्लू त्याला दिसलेच नाही. वाघ पाणी प्यायला खाली वाकला, आणि सटकन मागे सरला. पाणी अतिशय गढूळ होते आणि त्याला घाणेरडा वास येत होता. त्या पिल्लाच्या अंगावरचा चिखल पाण्यांत मिसळला गेला होता. दुर्गंधी तर इतकी भयंकर होती की ते पाणी सोडून वाघ दुसरीकडे पाणी शोधायला निघाला.

वाघाची ही माघार पाहून ते पिल्लू प्रथम गोंधळून गेले. पण ते जरा धीट होते त्यामुळे त्याला वाटलं की वाघ आपल्यालाच घाबरला! नाहीतर तो इतक्या घाईने परत कशाला जाईल? त्या लहानग्या डुकराला आपण हत्तीसारखे बलवंत आहोत असं वाटलं. ते वाघामागे पळायला लागलं. त्याने वाघाला म्हटलं, ‘‘वाघोबादादा, परत येऊन माझ्याशी दोन हात करा. घाबरट कुठले. पळून जाऊ नका असे!’’




वाघ तहानलेला होता. त्याला काही आत्ता भांडायची इच्छा नव्हती. नुसती मान मागे वळवून तो गुरगुरला, ‘‘मी आज तुझ्याशी लढणार नाही. याच वेळेला तू उद्यां इथें ये आणि मग आपला सामना होईल.’’ पिल्लाची मात्र समजूत झाली की वाघ घाबरलाय म्हणून तो संधी शोधतोय! डुकराला आणखीनच चेव चढला व तो फुशारुन गेला.

धावतच घरी जाऊन त्याने घरीदारी सर्वांना जाहीर केले, ‘‘वाघोबा मला घाबरतो. तेव्हां आता मी यापुढे वनराज होणार!’’ घरांतल्या सर्व डुकरांना बोलावून त्याने जे घडलं ते सविस्तर सांगितलं. ते ऐकून थक्क झाले. वाघाने तलावांतलं पाणी का प्यायलं नसेल व तो तिथून का निघून गेला असेल, त्याचे कारण त्यांनी लगेच ओळखले. त्या पिल्लाला असा अगोचरपणा केल्याबद्दल सगळेच रागावले. वाघाला आव्हान देण्यांत आपण केवढी मोठी चूक केलीय ते डुकराला समजलं.

आता मात्र त्याची बोबडीच वळली. दुसर्‍या दिवशी वाघाच्या जेवणासाठी आपला बळी ठरलेलाच आहे असं त्याला वाटलं. नातवाची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याचे म्हातारे आजोबा कासावीस झाले. छोट्या डुकराचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. आणि त्यांनी त्या लहान डुकराला सांगितले, ‘‘तू कबूल केलं आहेस ना? मग ठरल्याप्रमाणे वाघाला भेट. नाहीतर तो इथे येऊन आम्हाला सगळ्यांना मारुन टाकील. पण त्याला भेटण्यापूर्वी तू चिखलांत भरपूर लोळ, म्हणजे तुझ्या अंगाला घाणेरडा वास येईल.’’


आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते छोटे डुक्कर घाणीत लोळले, आणि चिखल, हत्तीचे शेण, गुरांचा कचरा, वगैरे रानांतल्या गलिच्छ जागी ते यथेच्छ बागडले. अंगभर चिकटलेली ती घाण घेऊनच ते वाघाच्या भेटीला गेले. इकडे वाघ त्या पिल्लाची वाट बघतच होता. सामना संपला की त्या पिल्लावर ताव मारायचा हे त्याने आधीच ठरवलेले होते.

जेव्हां डुकराचे पिल्लू जवळ आले, तेव्हां त्या घाणीचा दर्प सहन न होऊन वाघ मागे सरला. ‘‘हे रे काय? तुझ्या अंगाला किती घाण वास मारतोय! शी शी शी !!!’’ ‘‘तू सांगितल्याप्रमाणे मी आलोय इथे. मी आपला माझ्या आजोबांनी शिकवलेले शेणगोळे फेकण्याचे काही प्रकार करुन पाहात होतो.’’ असं म्हणून डुकराचे पिल्लू किंचित पुढे आले.

वाघाला तो दुर्गंध सहन होईना. त्याला मळमळायला लागले. ‘‘चालता हो! माझ्याजवळदेखील येऊ नकोस!’’ तो संतापाने गुरगुरला. डुकराने नाराज झाल्याचे नाटक केले, व विचारले, ‘‘आणि आपल्या सामन्याचे काय?’’

‘‘गप्प बैस! मी नाही तुझ्याबरोबर लढणार,’’ वाघ मागे फिरत ओरडला. घाणीचा वास असह्य होत होता त्याला. डुकराचे पिल्लू मात्र आनंदाने उड्या मारत घरी गेले. त्याच्या कुटुंबियांना समजलं की घाणीनेच त्याला वाचवलं होतं. त्या दिवसापासून घराबाहेर पडले की सारी डुकरे प्रथम घाणीत लोळायला लागली. आजही ती तेच करतात.

Marathi Graffiti (नक्की वाचून पहा....)

पंचायुध

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असता बोधिसत्वांनी युवराज म्हणून अवतार धारण केला. बारशाच्या दिवशी निरनिराळ्या देशातून थोर विद्वान व अनेक ज्योतिषी आले. ते राजाला म्हणाले - ''आपला हा मुलगा कोणी थोर महापुरुष दिसतो आहे! पंचायुधे धारण करून हा जगज्जेता होईल आणि शूर पराक्रमी म्हणून याचा नावलौकिक होईल!’’ म्हणून मुलाचे नाव पंचायुध असेच ठेवण्यात आले.


काही काळ लोटला. मुलाला समजूत येऊ लागली, तेव्हा राजाने त्याला गांधार देशाच्या तक्षशिला नगरीतील एका सुप्रसिद्ध गुरुकुलात विद्याभ्यासासाठी पाठविले.

पंचायुधने तक्षशिला येथील गुरुकुलात काही काळ अभ्यास केला व सर्व विद्यांमधे तो पारंगत झाला. गुरुकुलातून समावर्तन संस्कार झाल्यावर घरी निघतेवेळी कुलगुरुने शिष्याला आशीर्वाद देऊन पाच आयुधे दिली. गुरुवर्याचा निरोप घेऊन पंचायुध काशीला परत निघाला.

पंचायुधाला वाटेवर एक भयंकर अरण्य लागले. त्या अरण्यातून चालत असता पंचायुधाला वाटेत काही ऋषी व मुनी भेटले. ते म्हणाले - ‘‘बाबा रे, तुला पाहिले तर तू वयाने फारच लहान दिसतो आहेस! या रानात रोमांच नावाचा एक भयंकर राक्षस राहतो आहे. तू त्याच्या दृष्टीस पडलास तर तो तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून तू या वाटेने न जाता दुसर्‍या वाटेने जा.’’

पराक्रमी पंचायुधाच्या मनावर मुनींच्या त्या सल्ल्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्याने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले व तो त्याच अरण्यमार्गे पुढे निघाला. वाटेत एका जागी त्याला ताडामाडाएवढा उंच व अवाढव्य देहधारी रोमांच राक्षस भेटला.



तो राक्षस दिसायला भयंकरच होता. त्याचे डोके हत्तीसारखे मोठे होते. त्याला आग पाखडणारे डोळे होते आणि हत्तीच्या सारखेच दोन मोठे सुळे देखील होते. शिवाय सर्व अंगावर अस्वलासारखे लांब लांब केसही होते.

रोमांच राक्षस पंचायुधाच्या वाटेवर आडवा उभा राहून हुंकारला - ‘‘कोण रे तू? कोठे निघालास? उभा रहा! या जंगलात पाऊल टाकायला तुझी छाती कशी झाली? माझे नाव ऐकूनच लोक थरथर कापतात. मी तुला आता गिळतो!’’






पंचायुध जरासुद्धा न भिता म्हणाला - ‘‘राक्षस राजा, मी सर्व कळल्यावरच या वाटेने आलो आहे. खबरदार, तू जवळ आलास तर!’’ असे दरडावून पंचायुधने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला व राक्षसावर सोडला.

तो बाण राक्षसाने अंगात घातलेल्या कातड्याला लागला, राक्षसाला लागलाच नाही. तेव्हां पंचायुधाने बाणामागून बाण सोडून रोमांचावर शरवृष्टीच केली. परंतु तो प्रयत्नही निष्फळ ठरला. शेवटी पंचायुधाने विषारी बाण सोडले.

परंतु त्यामुळे सुद्धा राक्षसाचे काहीही नुकसान झाले नाही.

आता मात्र राक्षस मोठ्याने हुंकारला व पंचायुधावर धावला. पंचायुधाने आपली तलवार उपसली व राक्षसावर वार केला. परंतु राक्षस जागचा हललासुद्धा नाही.




तेव्हा पंचायुध राक्षसाला म्हणाला - ‘‘तू आपल्या मूर्खपणाने मला ओळखलेले दिसत नाहीस. माझं नाव पंचायुध आहे, लक्षात असू दे. मी या अरण्यात पाऊल टाकतांना फक्त आपल्या आयुधांवरच अवलंबून राहून इकडे आलो नाही!’’ असे म्हणत पंचायुधने मूठ आवळून राक्षसाला एक ठोसा दिला. राक्षस जागचा हलला नाही.

राक्षस जोराने हंसला व म्हणाला - ‘‘पोरा! तुझे हे धाडस पाहून तू कोणी सामान्य माणूस असशीलसे मला वाटत नाही. माझ्यासारख्या प्रलयभयंकराशी युद्ध करायचे साहस तू दाखविलेस. इतर लोक मला नुसते पाहूनच बेशुद्ध होऊन पडतात. मग तुला माझी भीति न वाटण्याचे काय कारण रे?’’

‘‘भय वाटण्याचे कारणच कां असावे? जो जन्मतो त्याला मरण हे असतेच! शिवाय माझ्या अंगात वज्रायुधासारखं एक खड्ग आहे. ते खड्ग म्हणजे ज्ञान. तू मला गिळलेस, तर ते खड्ग तुला उभे चिरून काढील!’’

राक्षस एक दोन क्षणच विचार करीत राहिल्यावर म्हणाला - ‘‘पोरा, तू म्हणालास त्यांत काही अर्थ असावा असे मला वाटू लागले आहे! ते काही असो, एवढे खरे की तू निर्भय आहेस, आणि शूर पराक्रमीही आहेस. मी तुझ्यासारख्याला गिळायचं म्हटलं तरी कदाचित् पचवू शकणार नाही. आतां तू तुला जिकडे जावयाचे असेल तिकडे खुशाल जा.’’



पंचायुधरूप अवतार घेतलेल्या बोधिसत्वांनी रोमांच राक्षसाला आशीर्वाद दिला व म्हटले - ‘‘तू मला सोडलेस, ठीकच झालं. परंतु तुझं पुढे काय? तू कितीदा या जगात जन्म घेऊन कुकर्मे करीत निकृष्ट जीवन जगत राहिला आहेस, आणि अज्ञान अंधकारांत कोणास ठाऊक, किती काळ भटकत राहिला आहेस? तू आणखी कितीही दिवस नाहीं, तर युगानुयुगे जिवंत राहिलास, तरी तुला गती नाही का?’’

‘‘तर मग महात्मन्, या अज्ञानांधकारातून बाहेर निघायला काही मार्ग आहे का? असला तर कृपा करुन सांगा.’’ राक्षसाने विचारले.

‘‘तू या अरण्यांत राहून अरण्यमार्गाने येणार्‍या-जाणार्‍यांचा वध करुन त्यांना खातोस व अशा तर्‍हेने तू आपले पाप वाढवीत आहेस. तुझी पापकर्मे जितकी वाढत जातील, तुला तितकाच जास्त काळ हा निकृष्ट राक्षसजन्मच मिळणार, तुला मोक्ष लाभ मिळणेच शक्य नाही. तुला उत्तम मानवयोनीतच जन्म हवा असेल तर तू पापकृत्ये करण्याचे सोडून दे!’’ असा उपदेश करून बोधिसत्वांनी त्या राक्षसाला मानवांचे हित व्हावे, यासाठी त्याने पालन करण्यालायक व पुण्यप्राप्तीस आवश्यक असलेली पांच सूत्रे सांगितली, व अधम मानवत्व आणणारी पांच तंत्रे सांगितली.


त्या दिवसापासून रोमांच राक्षसाने आपली राक्षसी कृत्ये सोडली आणि तो त्या अरण्यमार्गे येणार्‍या लोकांचा अतिथि-सत्कार करू लागला आणि धर्मबुद्धी नावे प्रसिद्ध झाला.

अशा तर्‍हेने बोधिसत्वांच्या उपदेशामुळे भयंकर राक्षस देखील सन्मार्गाने चालू लागला.

उंदीर आणि चिचुंद्री

एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते. त्यातून एक अशक्त व भुकेलेला उंदीर आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहिला. यथेच्छ धान्य खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना.

एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’



तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.

Saturday 16 February 2013

राजा आणि कवी

राजा आणि कवी
    पृथ्वीराज चौहान हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. तो महापराक्रमी व कुशल धनुर्धर होता. चंद वरदायी हा त्याच्याच दरबारातील एक अतिशय प्रतिभावंत कवी होता. त्यानच 'पृथ्वीराज रासो' हे काव्यचरित्र लिहिले. शहाबुद्दीन घोरीने भारतावर सतरा वेळा आक्रमण केले. त्यापैकी सोळा वेळा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र सतराव्या वेळी घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. त्याला कैद करून त्याचे डोळेही काढले. चंद वरदायीला फार वाईट वाटले. तो पृथ्वीराजाला भेटण्यासाठी म्हणून शहाबुद्दीन घोरीकडे गेला. तेथे त्याने आपली काव्यप्रतिभा दाखवून घोरीवर चांगली छाप पाडली. घोरीशी बोलता-बोलता त्याने पृथ्वीराजाच्या शब्दवेधी बाणकौशल्याची माहिती दिली. शहाबुद्दीन घोरीलाही उत्सुकता लागून राहिली. त्याने पृथ्वीराजाच्या धनुर्विद्येची परीक्षा आपल्या दरबारात घेण्याचे ठरविले. दरबारात आपल्या आसनाखालीच 'आवाज' केला जाईल, अशी त्याने व्यवस्था केली. त्या आवाजाला लक्ष्य करून पृथ्वीराज बाण सोडणार होता. मात्र त्या आधी चंद कविरायने एक दोहा सादर केला. त्या दोहय़ामध्ये पृथ्वीराज चौहानला सूचित करणारा एक इशारा होता. पृथ्वीराजाला तो 'इशारा' कळायला वेळ लागला नाही. ठरल्याप्रमाणे लक्ष्यस्थानावर आवाज होताच पृथ्वीराजानं अचूक बाण मारला. तो नेमका शहाबुद्दीन घोरीच्या छातीत घुसून तो मरण पावला. त्यामुळे दरबारात एकच खळबळ उडाली. सैनिक त्या दोघांनाही पकडायला धावले; परंतु दोघांनाही शत्रूच्या तावडीत सापडायचे नव्हते. असं म्हणतात की, तत्क्षणीच पृथ्वीराज चौहान व चंद वरदायी यांनी परस्परांना ठार मारून आपली जीवनयात्रा संपविली. राजा आणि कवीने परस्परांवरील आपल्या मैत्रिप्रेमाची अशी परिपूर्ती केली होती.

‘अंधारात कसा चढणार डोंगर?’


तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

संकल्प करा : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

खरी नक्कल .

भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.
त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.