Saturday, 16 February 2013

असा चालतो शेअर बाजार !!! :-

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागलेत.

मुलगी आणि मम्मी :)

मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय , काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... ॅसिडीटी झालीय.
मम्मी - ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही . हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी.. 

ऊन-सावली

त्या दिवशी बादशहा अकबर खूप चिंतित तसेच खूप रागावलेलाही दिसत होता. त्याची काळजी दूर करण्यासाठी बिरबल हळूच म्हणाला, ‘‘खाविंद, आपण असे काळजीग्रस्त, रागावलेले चांगले दिसत नाही. तसेच ते आपल्याला शोभतही नाही.’’

‘‘कधी चांगल्या मनःस्थितीत असावे, कधी नाही, कधी हंसावे, कधी हंसू नये, हे आम्हाला चांगले समजते. मी बादशहा आहे, हे विसरूं नकोस. मी मला वाटेल तेच करीन. तुझ्या सल्ल्याची मला अजिबात गरज नाही.’’ अकबर रागाने म्हणाला.

‘‘रागावल्यामुळे आपला चेहरा खूप विकृत व कुरूप दिसतो आहे. खूप विचित्रही दिसतो आहे, जहाँपन्हाँ!’’ बिरबल म्हणाला. त्यावर जास्त चिडून बादशहा म्हणाला, ‘‘काय म्हणालास? माझा चेहरा विकृत व कुरूप दिसतो आहे? माझ्यासमोरच माझी अवहेलना करण्याची तुझी ही हिम्मत?’’

‘‘मला असे म्हणायचे नव्हते, खाविंद!’’ असे म्हणून बिरबल आणखी कांही म्हणणार तोच अकबर म्हणाला, ‘‘तुला आणखी कांही बोलण्याची आता गरज नाही. माझ्यासमोरून चालता हो. पुन्हा कधीही तुझे हे तोंड मला दाखवू नकोस.’’

अकबराच्या हुकुमाप्रमाणे बिरबल कांही न बोलता तेथून निघून गेला. ‘‘थोडेसे जवळ केले तर डोक्यावर चढून बसतात.’’ असे पुटपुटत, चरफडत अकबर दिवसभर गप्पगप्पच होता. तो खूप रागात दिसत होता.

दुसर्‍या दिवशी अकबर दरबारांत आला तेव्हां बिरबलाशिवाय सर्व दरबारी उपस्थित होते. त्याचे रिकामे आसन पहाताच अकबर म्हणाला, ‘‘बिरबल कुठे आहे?’’

‘‘खाविंद, ते म्हणत होते कीं, आपण त्यांच्यावर खूप रागावला आहात. आपण त्यांना इथून निघून जाण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळ  आपल्या आज्ञेवरून हे शहर सोडून जात असल्याचे ते म्हणाले.’’ एकजण म्हणाला.

तेव्हां अकबराला कालच्या वादविवादाची आठवण झाली. आता तो विचारांत पडला. काल तो खूप घुश्श्यांत होता, ही गोष्ट खरी होती. तसेच त्याने बिरबलाला निघून जाण्याविषयीही सांगितले होतेच. त्याक्षणी त्याला वाटले कीं, बिरबलाचा अवमान करून आपण फार मोठी चूक केली आहे. त्याच्याशी आपण इतक्या कठोरपणे वागायला नको होते. त्यामुळे तो दुखावला असेल आणि इथून निघून गेला असेल. त्याला एकदम बिरबलविषयी सहानुभूती वाटू लागली.

कधीकधी अकस्मात एखादी घटना घडून जाते. कालची घटना तशीच होती. कोणाला कांही न सांगता बिरबल निघून गेला होता. बरेच दिवस लोटले पण त्याच्याविषयी कांही कळले नाही. त्याच्याशिवाय दरबार सुनासुना वाटत होता. अकबराला अगदीच राहवेना म्हणून त्याने बिरबलाच्या शोधार्थ शिपायांना पाठवले. परंतु त्याचा कांही पत्ता लागला नाही. कांहीही झाले तरी अकबराला बिरबलाचा शोध घेऊन त्याला परत बोलवायचे होते.

एके दिवशी तो मंत्रिगणांना म्हणाला, ‘‘संपूर्ण राज्यात दवंडी पिटा कीं, कडकडीत उन्हांत जी व्यक्ती छत्री न घेता राजमार्गावरून चालत येईल, त्याला शंभर मोहरांचे बक्षिस देण्यात येईल.’’

‘‘जहापन्हां, हे तर अशक्य आहे. छत्रीशिवाय कडकडीत उन्हांतून चालणे कोणाला तरी शक्य होईल का?’’ एक वयस्कर मंत्री आश्चर्याने म्हणाला.

‘‘असे असले तरीही दवंडी द्या. त्यामुळे नुकसान नक्कीच होणार नाही’’ बादशहाने प्रत्युत्तर दिले.

मग मंत्र्यांना गप्प रहावे लागले. त्यांनी बादशहाच्या आज्ञेनुसार दवंडी दिली.

दवंडी ऐकून लोक त्यावर उलटसुलट मतप्रदर्शन करूं लागले. ते म्हणूं लागले, ‘‘राज्यकर्त्यांच्या इच्छा किती विचित्र असतात!’’

कुग्रमचा एक गरीब गांवकरी ही दवंडी ऐकल्यावर म्हणू लागला, ‘‘रणरणीत उन्हांत छत्रीशिवाय चालले तर शंभर मोहरा मिळणार, वा !’’ मनांतल्या मनांत हे घोकत तो घरी आला.

त्याने आत्तापर्यंत एखादी मोहोरही कधी पाहिली नव्हती. दवंडीप्रमाणे तो वागू शकला तर त्याची गरीबी दूर होईल, त्याच्या सर्व गरजा भागू शकतील. त्याने आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगितली.

पत्नी म्हणाली, ‘‘नुकतेच आपल्या शेजारी राहायला आलेल्या वीरेंद्रांचा सल्ला घ्या. ते खूप हुषार वाटतात.’’

‘‘त्यांना हे समजले असेल तर ते स्वतःच जाऊन हे बक्षिस पटकावू शकतात. असो, तरीही तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना भेटतो’’ असे म्हणून तो गरीब माणूस वीरेंद्रला भेटला.
त्याचे बोलणे ऐकून स्मितहास्य करीत वीरेंद्र म्हणाला, ‘‘हे कांही फार कठीण नाही!’’

‘‘तुम्हाला माहिती आहे, हे कसे करता येईल ते? माहिती असेल तर मला सांगा ना.’’ गायावया करीत तो गरीब म्हणाला.

वीरेंद्रने सांगितले कीं, ‘‘डोक्यावर पलंग धरून चालत जा म्हणजे डोक्यावर छत्री नसली तरी पलंगाच्या सावली मुळे तुझे उन्हापासून संरक्षण होईल. आणि पलंगाची सावली प्रत्येक क्षणी तुझ्याबरोबर असेल.’’

‘‘वा ! तुम्ही किती चांगला उपाय सांगितलात ! मला हे अजिबात सुचले नसते. आत्ताच आगर्‍यासाठी निघतो आणि बादशहांना भेटतो. आता मलाच शंभर मोहरा मिळतील’’ तो गरीब आनंदून म्हणाला.

तो लगेच निघाला व आगर्‍याला येऊन पोचला. मग अकबराची भेट घेऊन त्याने सांगितले, ‘‘खाविंद, मी उन्हांतून चालतच आपल्याकडे आलो आहे, तेही छत्रीशिवाय! सावलीतून चालत उन्हापासून बचाव करून घेत आलो आहे.’’

‘‘सर्वजण म्हणत होते कीं, हे अशक्य आहे. पण तुला हे कसे शक्य झाले?’’ बादशहाने विचारले.

‘‘डोक्यावर पलंग धरून चालत आलो आहे’’ तो गरीब म्हणाला.

‘शाब्बास, तुला शंभर मोहरा नक्की मिळतील. पण एक सांग ही कल्पना तुझी की आणखी कोणाची?’’ अकबराने विचारले.

‘‘नुकतीच आमच्या शेजारी आगर्‍याहून  वीरेंद्र नांवाची एक व्यक्ती रहायला आली आहे. ते खूपच हुशार आहेत. त्यांनी मला हा उपाय सांगितला’’ गरीब म्हणाला.

ती व्यक्ती म्हणजे बिरबल असणार, हे बादशहांनी ताडले. त्यांनी त्या गरीब माणसाला लगेचच शंभर मोहरा दिल्या आणि म्हणाले, ‘‘तुला सुखरूप घरी पोचविण्याकरीत माझे दोन शिपाई तुझ्याबरोबर येतील. ते दोघे परत येतील तेव्हां तुझ्या शेजार्‍यालाही त्यांच्याबरोबर पाठवून दे.’’

खूप आनंदलेला तो गरीब माणूस शिपायांसोबत गांवी परतला.

आठवड्याभराने वीरेंद्रला घेऊन शिपाई अकबराकडे आले. त्यावेळी वीरेंद्रने रूमालाने आपला चेहरा झाकून घेतला होता. अकबराने त्याला विचारले, ‘‘रूमालाने तू आपले तोंड का झाकून घेतले आहेस?’’

‘‘आपणच आज्ञा केली होती कीं, पुन्हा तोंड दाखवू नकोस. राजाज्ञेचे पालन करणे माझे कर्तव्य आहे’’ वीरेंद्र नम्रपणे म्हणाला.

‘‘बिरबल, आता मात्र मला तुझा चेहरा पाहायचा आहे’’ असे म्हणून अकबराने त्याच्या तोंडावरचा रूमाल बाजूला केला आणि हंसतमुखाने त्याला आलिंगन दिले.

श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.


' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.


आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.


आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.


आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.


आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.


संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.


वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.


पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.


*** साथ,सोबत संगत... ***

***  साथ,सोबत संगत... ***
ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय
चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.

तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,
विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका
कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची
आणि आपल काम करत राहायची. 

त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे
वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे.
मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर
होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. 
झुरळ मुंगीपेक्षा
वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला 'सर्' म्हणू लागली. झुरळ कंपनीत
आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त
वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही
म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल.
सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस
सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं.
ते पाहून मुंगी आपली बिचारी खूप दुखी व्हायची. मुंगीला काम करून देखील मग
सिंहाचे बोलणे खावे लागायचे. झुरळाच्या ह्या वागण्याने कंपनीतील इतरही
'झुरळ सर्' म्हणायला लागले. मुंगीच्या डोक्यात मग कंपनी सोडायचा विचार
बळावू लागला. आणि जवळपास दीड वर्षानंतर त्याला आहे त्या कंपनीपेक्षा खूप
मोठ्या कंपनीत जाण्याची संधी मिळाली. 
नवीन कंपनीत आल्यावर मुंगी खूप खुश
झाली. कारण आता झुरळाचा त्रास तिला पुन्हा होणार नव्हता. नवीन कंपनी
डायनासोरप्रमाणे अवाढव्य होती. आणि हजारो मुंग्या, उंदीर, खेकडे, माश्या,
हत्ती, जिराफ, घोडे, हरणे, ढेकणे कामाला असलेल पाहून मुंगी अजूनच खुश
झाली.
नवीन कंपनीत मुंगीवर लक्ष ठेवायची जबाबदारी एका खेकड्याची होती. 

दोन
मोठ्या ढेकणांच्या हाताखाली काम करायचं अस मुंगीला सांगण्यात आल. पण दोन
आठवडे मुंगीला त्या कंपनीत नुसतंच बसून ठेवलं. नंतर मुंगीला कामाची
हत्यारे न देता काम कर अस सांगण्यात आल.
काम एका हरिणीचे होते. आणि त्या
कामातील प्रत्येक गोष्टीची परवानगी देण्याची जबाबदारी उंदीरमामाकडे होती. 

रोज झालेल्या कामाचा इमेल उंदीरमामाला पाठव अशी ताकीद दिली होती. हत्यारे
नसतांना देखील मुंगीने आपले काम सुरु केले. पण हत्यारानिशी लवकर होणारे
काम हत्यारविना मुंगीला जड जावू लागले. कामाला होणारा विलंब हत्यारामुळे
नसून मुंगीमुळे होतो असा निष्कर्ष उंदीरमामा आणि हरिणीने काढला. हत्यारे
पुरवण्याची जबाबदारी खेकड्याची होती. हत्यारे नाहीत ही माहिती त्याने
हरिणीला दिलेली नव्हती. चूक लपवण्यासाठी मग खेकडा कोणतेही कारण काढून
मुंगीला त्रास द्यायला लागला.
सुरवातीला मुंगीचा 'इमेल' नंतर तिची 'इंग्लिश' असे कोणतेही कारण काढून
त्रास दिला जायचा. मुंगी आपली न झालेली चूक देखील मान्य करायची. आणि
सारखी दुखी देखील राहायची. त्यामुळे तिच्यात 'न्यूनगंड' निर्माण झाला.
झालेल्या कामाचे इमेल पाठवण. आलेल्या इमेलचा रिप्लाय देण्. छोट्याशा 

कामासाठी उंदराची परवानगी आणि त्यासाठी सतत इमेल, फोन करून मुंगी आणखीनच
वैतागली. उंदीरमामा परवानगी देतो म्हणायचा. 
पण देत नसायचा. कामापेक्षा
इमेल आणि फोन जास्त होत असल्याने कामावर त्याचा परिणाम जाणवू लागला. आणि
सतत मीटिंग मधून कामाबद्दल मुंगीला ढेकणे रागवायचे. शेवटी मग मुंगीने
देखील ठरवलं की जशास तसे प्रत्युतर द्यायचे. 

मग कामात होणाऱ्या उशिराबद्दल मीटिंग बोलावली गेली. ज्या हरिणीचे ते काम
होते. त्या कामाचा लक्ष देणारा उंदीरमामा, एक मांजर, खेकडा, ढेकणे आणि
मुंगी असे जवळपास पाच सहा लोकांची मीटिंग बोलावली. मिटींगच्या
सुरवातीपासून सगळेच कामात उशीर होण्याबद्दल मुंगीलाच दोषी ठरवू लागले. पण
मुंगीने चूक नसतांना माफी मागायला नकार दिला. 
आणि मुंगी पेटली. बोलायला
सुरवात केल्यावर तिने परवानगीसाठी केलेल्या विलंबाला, हत्यारे न
पुरवल्याबद्दल उंदीरमामा आणि खेकड्याची सोलायला सुरवात केली.
ढेकणाचा
देखील समाचार घेतला. आणि आश्चर्य लहान मुंगी समोर उंदीर आणि खेकड्याने
मान टाकली. मुंगीला 'हल्याच्या उत्तरासाठी प्रतिहल्ला' हे सूत्र ध्यानी
आले. तेव्हापासून मुंगीची जहाल मुंगी झाली. 

आणि त्यानंतर असा त्रास तिला
पुन्हा झाला नाही.
 

बिरबल व राजाचा पानवाला

अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे. 

तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’

बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.

एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली. 
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’

शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.

आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’

या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.

पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’

‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’

‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’

‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.

‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.

शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’

‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.

‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.

शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.

‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.

त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्‍याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.

‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.

राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’

महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’

‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.

‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.

थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’

‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.

‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.

ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’

नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’