Thursday, 7 February 2013

पाताळ दुर्ग - 1


 कुंतल देशाच्या मंत्र्याचा मुलगा, शशिकांत, आपल्या भद्र व जयंत ह्या मित्रांसोबत शिकार खेळण्यासाठी जंगलात गेला. त्या जंगलात हरीणे व रानटी डुकरे भरपूर होती. परंतु शशिकांत व त्याच्या मित्रांना या निष्पाप प्राण्यांना मारण्यांत कांही रस नव्हता. वाघ-सिंहांसारख्या हिंस्त्र, क्रूर व धोकादायक प्राण्यांची शिकार करण्याची त्यांची इच्छा होती. सिंहाच्या शोधांत ते जंगलात खूप दूरवर निघून गेले. दुपारच्या सुमारास त्यांना यश आले. ते एका ओढ्याच्या कांठाने निघाले होते. इतक्यांत ओढ्यापलीकडे एक सिंह उभा असलेला शशिकांतला दिसला. ओढ्याचे पाणी पिऊन तो सिंह पुन्हां जंगलात निघून जाण्याच्या तयारीत होता.
शशिकांतने आपल्या मित्रांना तो सिंह दाखवीत म्हटले, ‘‘आपण घोडे इथेच सोडूं या आणि हळूंच ओढा पार करून त्या सिंहाला चारी बाजूंनी घेरूं या. आपल्यापैकी कोणाच्या तरी बाणाचे तो नक्कीच लक्ष्य ठरेल.’’ घोड्यावरून उतरून शशिकांत चालू लागणार इतक्यांत जयंतने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबविले. तो म्हणाला, ‘‘शशिकांत, घाई करू नको. ओढ्याच्या त्या बाजूचे जंगल आपले नाही, तर कदम्ब राज्याचे आहे आणि त्या राजाशी आपले चांगलेच शत्रुत्व आहे.
त्यांच्या हद्दीत जाणे आपल्यासाठी केवळ संकट नव्हे, तर धोकादायकही ठरूं शकते. शिकार करण्याऐवजी आपण स्वतःच संकटाची शिकार ठरूं. आपल्या प्राणांनाही धोका संभवू शकतो. त्या राज्याला आपल्या राज्यावर आक्रमण करण्याकरिता निमित्त मिळेल. आपल्याला जायबंदी करून ते आपल्या राज्याला कोणत्याही अटी मान्य करायला भाग पाडू शकतील.’’
शशिकांतला शिकारीची चांगलीच सुरसुरी आली होती. त्याने आपल्या मित्राच्या सल्ल्याची खिल्ली उडविली व हंसून म्हटले, ‘‘मी आधीच भित्रा आहे. तू मला आणखी भित्रा बनवू नको. आपण कदंब राज्य जिंकायला त्यांच्यावर आक्रमण करण्याकरिता त्या राज्यांत जात नाही आहोत. क्रूर पशूंची शिकार करायला निघालो आहोत, ते काम झाले की आपण लगेच आपल्या राज्यांत परतूं या.’’
कोणत्याही परिस्थितीत शत्रूच्या राज्यांत जाण्याची जयंतची इच्छा नव्हती. परंतु शशिकांतने त्याचे बोलणे हंसण्यावारी नेले व नाल्याच्या पलीकडे दुसर्‍या राज्याच्या जंगलात उभ्या असलेल्या सिंहावर लक्ष केंद्रित केले. जयंत पुन्हा एकदा शशिकांतला कांहीतरी सांगणार, तितक्यांत भद्र म्हणाला, ‘‘शशिकांत, तुझे बरोबर आहे. आपल्याला सिंहाची शिकार मिळाली तर त्याचे मांस कदंबच्या राजाकडे पाठवू व त्याचे कातडे राजाची एकुलती एक मुलगी कांतिसेना हिला भेट म्हणून पाठवू. हे योग्य होईल ना?’’ यावर शशिकांत मोठ्याने हसला.
त्याचवेळी सिंहाने मान वळवून आपल्या दिशेने येणार्‍या शिकार्‍यांकडे पाहिले व जोरांत डरकाळी फोडली. नंतर तो शेपटी हलवीत पुढे जाऊ लागला. समोरून निघालेल्या सिंहाला मारण्याची संधी गमाविण्याची शशिकांतची अजिबात इच्छा नव्हती, अगदी सिंह शत्रूच्या प्रदेशांत असला तरीही! तो खूपच उत्साहित व उत्तेजित झाला होता. त्याने लगेच बाण काढून धनुष्य ताणले आणि सिंहाच्या गळ्याचा नेम धरून बाण सोडला. तो बाण सिंहाला लागला. बाण लागताक्षणीं सिंहाने पुन्हां जोरांत डरकाळी फोडली व घायाळ अवस्थेत नाल्याच्या दिशेने त्याने झेप घेतली.
शशिकांत व त्याचे मित्र पटकन पांगले. गुडधाभर उंचीचा जलप्रवाह पटकन पार करून पुढे जात, त्या तिघांनी तीनही बाजूंनी सिंहावर बाण सोडले. यावेळी एक बाण सिंहाच्या पोटांत घुसला व त्याने गुरगुरत या शिकार्‍यांपैकी जवळ असणार्‍या शशिकांतवर झेप घेतली. शशिकांतला वाटले, आता बाणाने काम  भागणार नाही. त्याने तलवार उपसली. इतक्यांत झाडांमागे कसलीतरी चाहूल लागली आणि क्षणार्धात एक भाला सिंहाच्या डोक्यावर जोरांत घुसला.
शशिकांत व त्याचे मित्र आश्चर्यचकित होऊन त्या दिशेला पाहूं लागले, इतक्यांत आवाज आला, ‘‘सरहद्द उल्लंघून आलेल्या शत्रूला खलास करा’’ आणि त्यांच्यावर बाणांचा वर्षाव होऊं लागला. शशिकांत घायाळ होऊन जमिनीवर पडला. तो जोरांत ओरडला, ‘‘भद्र, जयंत, तुम्ही लवकर पळून जा. कपटीपणे लढणार्‍या शत्रूशी दोन हात करणे चांगले नाही.’’
परंतु तोपर्यंत जयंतही बाण लागून खाली पडला होता. पळून जाण्यासाठी वळला, पण त्याच्याही पाठीत शत्रूचा बाण घुसला. मात्र त्याने जखमेची पर्वा केली नाही. तो खूप वेगाने पळू लागला. ओढा ओलांडून तो घोड्यापाशी आला. मोठ्या मुश्किलीने घोड्यावर स्वार झाला आणि घोडा वेगाने दौडू लागला. त्याच्यासोबत इतर दोन घोडेही पळूं लागले. ओढ्यापलीकडून कांही शत्रुसैनिक पळत आले व त्यांच्यावर बाण सोडू लागले. ‘‘त्याला जिवंत सोडू नका. इथे घायाळ होऊन ज्याचे प्राण कंठाशी आले आहेत, तो कुंतल राज्याच्या मंत्र्याचा मुलगा दिसतो आहे,’’ असे शब्द मागून त्यांच्या कानावर पडत होते.
भद्रला त्या परिस्थितीत कांहीच ऐकू आले नाही. तो घोड्याची आयाळ घट्ट धरून घोड्यावर वांकून बसला होता. घोड्याला रस्ता माहीत असल्याने तो सरळ राजधानीच्या दिशेने धावत होता. इकडे ओढ्याजवळ घायाळ शशिकांत व जयंतला बर्‍याच हत्यारबंद शिपायांनी घेरले. तोवर सिंह गतप्राण झाला होता. भद्रचा पाठलाग करीत गेलेल्या माणसांना तो सांपडला नाही, म्हणून निराश होऊन ते ओढ्यापाशी परतले.
मात्र शशिकांतचा घोडा, त्याचा लगाम एका झाडांत अडकल्याने, त्यांच्या हाती लागला. ‘‘महाराज, क्षमा करा. त्या घायाळ शत्रूसोबत दोन घोडेही जंगलात कुठेतरी निघून गेले. खूप प्रयत्नांती आमच्या हाती हा एकच घोडा लागला. हा पंचकल्याणी आहे असे वाटते. याची भारी जीन वगैरे पाहून आम्हाला वाटले कीं, हा घोडा कुंतल देशाच्या मंत्र्याच्या मुलाचाच असणार,’’ शिपाई घोड्याला घेऊन पुढे येत म्हणाले
कदंबनरेश उग्रसेनने डोळे वटारून एकदा शिपायांकडे पाहिले आणि जवळच हातावर हात  ठेवून उभ्या असलेल्या सेनापतीकडे वळून राजा म्हणाला, ‘‘सेनापती! आपले सैनिक इतके निकामी आहेत कीं ते एका घायाळ शत्रूलाही पकडू शकत नाहीत. या लोकांच्या भरवंशावरच कां आपण कुंतल देशाच्या राजाशी शत्रुत्व पत्करले होते?’’
सेनापतीला राजास कांही सांगावयाचे होते. परंतु राजाच्या चेहर्‍यावरचा राग पाहून तो नुसतेच ‘महाराज!’ असे म्हणूं शकला. उग्रसेन शशिकांतजवळ आला. आपल्या पायानेच त्याला इकडेतिकडे हलवीत राजा म्हणाला, ‘‘हा मंत्र्याचा मुलगा आहे यांत शंकाच नाही. अजूनही थोडा प्राण शिल्लक आहे. ह्याला उचलून एखाद्या गुहेत टाका, एखादा सिंह त्याला खाऊन टाकेल. आणि हा दुसरा जखमी कोण आहे?’’
दोन शिपाई जयंतला हालवून म्हणाले, ‘‘महाराज, ह्याने तर कधीच प्राण सोडले आहेत.’’ ‘‘मग त्यालाही गुहेंत टाका’’, असे म्हणून उग्रसेन सेनापतीकडे वळून म्हणाला, ‘‘सेनापती, आज आपण शिकार खेळायला निघालो, ती वेळ बहुधा चांगली नसावी. मी बाण सोडला तेव्हां माझी समजूत होती कीं, हे कुंतल देशाचे साधे शिपाई असतील. हा कुंतल देशाच्या मंत्र्याचा मुलगा व त्याचे मित्र असतील, हे मला काय माहित? तो राजा आपल्यापेक्षा बलशाली आहे. मंत्र्याचे चातुर्य मला माहिती आहे. या अशुभ घटनेमुळे आपल्या राज्यावर संकट येऊ शकते. आपल्याला सावध रहायला हवे. आपण राजधानीला पोचल्यावर त्यांना एक पत्र लिहून पाठवू कीं, सरहद्दीवरील शिपायांच्या हातून हे चुकीने घडले आहे. यांचा कांहीतरी विचार करायलाच हवा. तरीही कुंतलनरेश ह्याचा काय अर्थ काढेल, सांगता येत नाही, युद्धाची शक्यताही नाकारता येत नाही. महामंत्र्यांची मतही विचारात घ्या.’’
‘‘होय महाराज, आपले महामंत्री हे सर्व हाताळायला समर्थ आहेत’’ सेनापती म्हणाला. उग्रसेने कांहीच बोलला नाही. तो घोड्यावर स्वार होऊन निघून गेला. त्याच्यामागे सेनापतीही निघाला. शिपायांपैकी दहाजण, शशिकांतला व जयंतला खांद्यावर घेऊन, हाश्यहुश्य करीत एखादी पालखी घेऊन जात असल्याप्रमाणे गुहेच्या दिशेने निघाले.
घायाळ भद्र ज्या घोड्यावर पडून राहिला होता. तो घोडा नगरद्वार बंद होण्यापूर्वी त्या दरवाज्या पाशी पोचला.


द्वारपाल मंत्र्याच्या मुलाची वाट पहात होता. जेव्हां त्याने त्याचा मित्र भद्रला अशा अवस्थेत पाहिले तेव्हां तो घाबरला. भद्रला हालवून तो जिवंत आहे की नाही, हे पहायचीसुद्धा त्याला भीती वाटूं लागली. शिवाय ज्या घोड्यावर जयंत स्वार झाला होता, तो घोडाही त्याच्याबरोबर रिकामा दिसत होता. सर्व द्वारपाल मशाली घेऊन भद्रच्या घोड्यासोबत राजधानीच्या दिशेने निघाले. एका घोड्यावर पाठीत बाण घुसलेला एक तरुण पडलेला व त्या घोड्याला घेऊन निघालेले द्वारपाल पाहाण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. घोड्यावर मंत्र्याच्या मुलाचा मित्र, भद्र होता, याशिवाय कोणाला कांहीही माहिती नव्हते.
घोडा थेट राजवाड्यांत शिरला व तेथील पागेत जाऊन उभा राहिला. ही वार्ता समजताच राजा शतयानु व मंत्री गंगाधर तिथे आले. नोकरांनी काळजीपूर्वक भद्रला घोड्यावरून उतरवले. राजवैद्यांनी त्याला तपासून कौशल्याने त्याच्या पाठीतील बाण बाहेर काढला. त्यावेळी भद्रने थोडीशी हालचाल केली. वैद्यांनी त्याला तपासून म्हटले, ‘‘महाराज! मी शर्थीचे प्रयत्न करीन. नशीब बलवत्तर असेल तर भद्र वांचण्याची शक्यता आहे.’’
भद्रला एका चौपाईवर झोपवून नोकरांनी महालांत नेले. तोपर्यंत मंत्री बाणाचे निरीक्षण करीत तिथेच उभे होते. मग त्याने एका सेवकाला बोलावून तो बाण त्याच्या हातांत देत सांगितले, ‘‘हा अगदी स्वच्छ धुवून आण.’’ ‘‘महामंत्री, शशिकांत व जयंतचे काय झाले? आपल्या देशांतच इतके प्रबळ शत्रू असतील असा मी विचारही केला नव्हता,’’ शतयानु म्हणाला.
‘‘महाराज, मला वाटते कीं, ही घटना आपल्या राज्यांत घडलेली नाही. भद्रचा जीव वाचला तर आपल्याला जंगलात नेमके काय घडले ते कळूं शकेल. शशिकांत व जयंत परत येतील असे मला वाटत नाही. भद्रला लागलेल्या बाणावर कोरलेले चिन्ह पाहून...’’ असे म्हणता म्हणता मंत्री गंगाधरने उपरण्याने आपल डोळे टिपले. शतयानूही अस्वस्थ झाला होता.  शशिकांत हा मंत्र्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याला कांही आश्वासन तरी कोणत्या शब्दांत द्यायचे?

मंत्र्यांनी दिलेला बाण खसाखसा धुवून, अगदी स्वच्छ करून, सेवकाने परत मंत्र्याला आणून दिला. गंगाधरने मशालीच्या उजेडात तो बाण निरखला.
आश्चर्यचकित होऊन तो बाण शतयानूच्या हातांत देत तो म्हणाला, ‘‘महाराज, हा बाण सोडणारी व्यक्ती कदंबनरेश उग्रसेन आहे. बाणाच्या टोकाशी त्याचे राजचिन्ह ‘अस्वल’ कोरलेले आहे.’’
शतयानूनेही तो बाण निरखला, ‘‘महामंत्री, याचा अर्थ काय? युद्धाची घोषणा व करताच उग्रसेनने आपल्यावर चढाई केली? आपले गुप्तहेर काय करीत आहेत? सीमेवरील रक्षक काय करीत आहेत?’’ ‘‘महाराज, उघडउघड हल्ला करण्याची ताकद उग्रसेनमधे नाही. तरीही आपण सावध राहिलेले बरे. सैन्यदळ तयार ठेवायचा व सर्वत्र सुरक्षायंत्रणा राबविण्याचा आदेश सेनापतींना दिलेला बरा!’’ गंगाधर म्हणाला.
शतयानूने एका सेवकाला सेनापतींना बोलावून आणण्याची आज्ञा केली. त्यानंतर तो महालाच्या दिशेने निघाला असताना एक सेवक धापा टाकत तिथे येऊन म्हणाला, ‘‘महाराज, कदंबनरेशाचे दूत नगरद्वारापाशी आले आहेत. आपली काय आज्ञा आहे? त्यांना इकडे घेऊन येऊ?’’ ‘‘उग्रसेन आपल्याकडे दूत पाठवतो आहे?’’ आश्चर्याने शतयानू म्हणाला.
‘‘कितीजण आहेत? त्यांचे हावभाव कसे आहेत? त्यांच्या चेहर्‍यावर कसली घमेंड, उद्दामपणा कांही दिसतो आहे का?’’ गंगाधरने विचारले. ‘‘नाही, नाही. ते सहाजण आहेत. त्यांच्याजवळ मुसक्या बांधलेली दोन माणसे आहेत. सर्वजण जीव मुठीत धरून आल्यासारखे दिसत आहेत’’ सैनिक म्हणाला. ‘‘महामंत्री याच्या पाठीमागे एखादे कुटिल कारस्थान तर नाही?’’ शतयानू म्हणाला.
‘‘अशा बाबींमधे उग्रसेन महाचलाख आहे! तरीही दूतांकरवी त्याने काय संदेश पाठवला आहे, हे जाणून घेणेही खूप महत्वाचे आहे. मुसक्या बांधून आणलेले ते कैदी कोण आहेत?’’ असे म्हणून गंगाधर विचारांत पडला. थोड्या वेळाने त्याने सैनिकांना आज्ञा केली, ‘‘त्या दूतांना ताबडतोब दरबारांत हजर करा.’’          (क्रमशः)

No comments:

Post a Comment