Thursday, 7 February 2013

जगन्नाथचा आदर


निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हाः झाडाजवळ गेला. त्याने झाडावरुन शव खाली उतरवले आणि ते खांद्यावर घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला. तेव्हां प्रेताच्या आंत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन्, मी वारंवार समजावून सांगून देखील तू आपला हेका सोडीत नाहीस व निष्फळ कष्ट उपसतो आहेस. मी तुझ्या भल्या-साठीच सांगतो आहे कारण मी तुझा हितचिंतक आहे. माझं तू कां ऐकत नाहीस? विश्वास ठेव.

तुझे ध्येय साध्य होण्यासाठी तू जे सतत प्रयत्न चालवले आहेस ते पाहून मला तर असं वाटतं कीं तुला धीर आणि धोरण यांची फार जरुर आहे. तू माझं ऐक. तुला मी माधवशर्माची गोष्ट सांगतो; तो एक विद्वान व महाकवी मानला जात होता. तुझा थकवाही गोष्टीमुळे कमी वाटेल.’’ आणि वेताळ गोष्ट सांगायला लागला.
‘‘फार पूर्वीं रामपूर गांवात जगन्नाथ नांवाचा एक श्रीमंत गृहस्थ राहात होता. तो अतिशय चांगला होता व सगळ्यांशी सारख्याच तर्‍हेने वागत असे. मग तो ओळखीचा असो किंवा अनोळखी! रामपुरांत आलेला प्रत्येक प्रमुख पाहुणा त्याच्या घरी राहात असे. जे लोक श्रेष्ठ मानले जातात ते सर्वांशी सारख्याच तर्‍हेने वागतात, असा सामान्य लोकांचा गैरसमज असतो. खरं पाहिलं तर त्यांची व्यवहार-शैली अनेकवेळां अविचारी व क्षुद्रही असूं शकते.

जगन्नाथच्या पाहुणचाराची प्रसिद्धी होण्यास त्याच्या गांवातल्या रामचंद्राचेही योगदान होते. ते दोघे बालमित्र होते पण त्यांची व्यवहार-पद्धत वेगळी होती. रामचंद्राच्या घरी कुणी गेलं तर तो तुटकपणें वागत असे. मागितलं तरच प्यायला पाणी देई. पैसा म्हणजे परमेश्वर हे त्याचे ब्रीदवाक्य होते. ते ऐकणारे गांवकरी साहजिकच त्याची तुलना जगन्नाथशी करीत असत. तरीदेखील जेव्हां त्याचे नातेवाईक व ओळखीपाळखीचे लोक त्या गांवी येत, तेव्हां ते त्याला आवर्जून भेटायला जात. कारण तो एक सधन व्यापारी होता.
एकदा महाकवी माधवशर्मा त्या गांवात आला. तोही या दोघांचा बालमित्र होता. एकाच गुरुकडून तिघांनी शिक्षण घेतलेले होते. परंतु माधवशर्मा सर्वांत बुद्धिमान होता. जगन्नाथ व रामचंद्राला धडा समजला नाही, तर ते दोघे माधवशर्माकडून शिकून घेत. त्यावेळेस जगन्नाथ एकदा माधवशर्माला म्हणाला, ‘‘तू समजावून सांगितलेलं आम्हाला सगळं समजतं. तेव्हां तू आपल्या गुरुजींच्यापेक्षां जास्त बुद्धिमान आहेस.’’
‘‘अरे, मलाही गुरुजी सांगतात तेव्हांच समजतं. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल कीं.’’ माधवशर्मा म्हणाला. पण त्या दोघांना गुरुजींचा पाठ नीट समजत नव्हता. एके दिवशी ही गोष्ट माधवने गुरुजींना सांगितली. ते हंसून म्हणाले, ‘‘गुरुकडून विद्या शिकायला मनाची एकाग्रता लागते. ती तुझ्यांत आहे पण त्यांच्यात मुळीच नाही. गुरूकडून लक्षपूर्वक शिकतात, त्यांना विषयाचे आकलन होते. ती विद्या त्यांचे जीवन उजलते.

मित्रांकडून शिकलेली विद्या तात्पुरती असते, व त्याचा ती संपूर्ण त्याचा संपूर्ण फायदा होत नाही असे लोक आयुष्यांत यशस्वी व समर्थ होणे कठीण असते. त्यांना एकाग्रतेची संवय करायला सांग.’’ जेव्हां तिघांचा गुरुकुलांतला अभ्यास संपला, तेव्हां गुरुजींनी तिघांना आशिर्वाद दिला. ते माधवला म्हणाले, ‘‘तू महाकवि व पंडित होशील. राजाश्रय मिळवून साहित्याची सेवा कर.’’ रामचंद्रला ते म्हणाले, ‘‘तुझी नजर व्यापारावर केंद्रित होईल. इतरांच्यावर उपकार कर किंवा नको करुंस, पण अपकार मात्र कधीही करुं नकोस.
हे लक्षांत ठेवून व्यापार कर.’’ नंतर जगन्नाथकडे वळून त्यांनी सांगितलं, ‘‘तू संपन्न घरांतला आहेस. तुझ्या पूर्वजांनी खूप मोठी संपत्ती जमवलेली आहे. तुला मोठेपणा मिळवायची खूप हौस आहे. या जगांत माणूस केवळ शिक्षणानेच मोठा होतो असं नाही. ज्यांना मोठेपणा मिळालेला आहे. अशांचा तू आदरसत्कार करीत जा आणि तुमच्या गांवामधे तू मान्यता व श्रेष्ठत्व प्राप्त कर.’’

जगन्नाथ व रामचंद्र आपल्या गांवी परतले. माधवशर्माने राजाश्रय मिळवला व तो पुढे पंडित व कविराज म्हणून प्रसिद्ध झाला. रामपुरच्या ग्रमाधिकार्‍याच्या निमंत्रणावरुन माधवशर्मा रामपुरला आला. त्याचे स्वागत करुन ग्रमाधिकारी त्याला म्हणाला, ‘‘आपण या गांवात पाहुणे म्हणून आलात, म्हणून मी माझ्या घरीच आपली राहायची व्यवस्था केली आहे. बहुतेक श्रेष्ठ मंडळी जगन्नाथरा-वांकडे राहातात. त्यांच्याकडले आतिथ्य फार प्रसिद्ध आहे.’’
तेव्हां माधवशर्माने जगन्नाथ आपला हा बालमित्र असल्याचं व आपण त्याच्याकडेच राहूं असं सांगितलं. ग्रमाधिकार्‍याने आनंदाने तसा निरोप जगन्नाथला धाडला. जगन्नाथने उत्तरादाखल माधवला धाडण्यास कळवले. माधव व त्याचा शिष्य कुशल जगन्नाथकडे पोंचले. जगन्नाथने दारांतच मित्राचे प्रेमाने स्वागत केले. त्यांची जी व्यवस्था केली होती तो थाट पाहून कुशल अवाक् झाला. दुसर्‍याच दिवशी माधवशर्मा गांवकर्‍यांसमोर काव्यवाचन करुं लागला. गांवकरी त्याची प्रतिभा पाहून प्रभावित झाले होते. दोन दिवसानंतर रात्रीं भोजनोत्तर गप्पा मारताना माधवने रामचंद्रची चौकशी केली.

‘‘तो तर सदा व्यापारांत बुडलेला असतो. इतर कांही त्याला सुचत नाही. तो सध्यां गांवात नाही. दोन दिवसांत परत येईल.’’ जगन्नाथने सांगितलं. ‘‘म्हणजे त्याने गुरुजींची आज्ञा प्रमाण मानलीय. तू सुद्धां कांही कमी नाहीस हं! तूही त्यांची आज्ञा पाळतो आहेसच.’’ थट्टेंत माधवशर्माने म्हटले. पण जगन्नाथला ही तुलना खटकली. तो कुरकुरला, ‘‘गुरुजींनी त्याला सोपं काम दिलं.
पण मोठ्या लोकांची सेवा करायची म्हणजे सोपं नसतं. कुणी येणार असं कळलं कीं त्या नामवंतासाठी गाडीची व्यवस्था करा, त्यांच्यासाठी झोंपायला अंथरुण, पांघरुण, जेवायला स्वादिष्ट प्रकार, मी आवर्जून करवतो. आसपासची ठिकाणें पाहायची सोय करतो. माझ्याच नव्हे तर जवळपासच्या गांवातही लोक माझा पाहुणचार नांवाजतात. यासाठीं मला किती कष्ट उपसावे लागतात ते तुला माहीत आहे? गुरुजींनी सांगितलं खरं, पण ते अंमलात आणणं किती कठीण आहे हे कुठे त्यांना माहीत आहे?’’
माधव शर्मा जगन्नाथाची प्रशंसा करीत असतानाच रामचंद्र तिथें येऊन थडकला. माधवला पाहून तो फारच खूष झाला, त्याने प्रेमाने त्याला मिठी मारली आणि म्हटलं, ‘‘मी गांवात नव्हतो तेव्हां तू आलास ना? तू आला आहेस हे जेव्हां कळलं तेव्हां मी तडक इथें काम सोडून आलो आहो. चल आता माझ्या घरी राहायला.’’

रामचंद्र हेका धरुन बसला म्हणून माधवला कुशलसह त्याच्या घरी जावेच लागले. रामचंद्रांच्या सांगण्यावरुन माधवशर्माने त्याला आपली एक कविता ऐकवली. त्यावर रामचंद्र म्हणाला, ‘‘चांगली वाटतेय ऐकायला, पण जरा अर्थ मात्र समजावून सांग रे!’’ माधवने अर्थ सांगितल्यानंतर रामचंद्र म्हणाला, ‘‘आत्ता नीट समजली. तू सांगितलंस म्हणून तर समजली. पूर्वीं सारखीच!’’

दुसर्‍या दिवशी सकाळीं स्नानाला गरम पाणी नव्हतं. जेवणही साधं होतं. नोकरचाकरांची सोय नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी जगन्नाथने पाहुण्यांना परत आपल्या घरीं बोलावले. कुशल परत जायला उतावीळ झाला होता. पण रामचंद्र म्हणाला, ‘‘माधव, इथें आहेस तितके दिवस आता माझ्याकडे राहा ना!’’ आणि माधवशर्मा तिथेंच राहिला.
त्यांनी परत जाण्यापूर्वीं रामचंद्रने किंमती वस्तू स्नेहभेट म्हणून दिली आणि म्हणाला, ‘‘तुझ्या घरी येईन तेव्हां सव्याज वसूल करीन बरं!’’ कुशलला हे आवडलं नाही. ही गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, जगन्नाथ सुसंस्कृत होता, रामचंद्र सामान्य; तरीही जगन्नाथने परत घरी बोलावल्यानंतर माधव गेला नाही. याचं कारण काय असूं शकेल? मला तरी ते लक्षांत येत नाही. तुला ते माहीत असूनही जर तू उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची शकलें शकलें होतील.’’

विक्रमार्क म्हणाला, ‘‘माधवशर्माला माणसांची चांगली पारख होती. जगन्नाथ प्रसिद्धीलोलुप होता आणि त्याची मैत्री दिखाऊ होती. आपल्या आदरातिथ्याच्या गोष्टी त्याने सांगितल्या, पण ग्रमाधिकारी त्याला सांगेपर्यंत त्याने माधवची दखल घेतली नव्हती. त्याने माधवशर्माला म्हटलं होतं, कीं तो मोठ्या व्यक्तींसाठी गाडी पाठवायचा, आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची व्यवस्था करायचा व त्यांचे उत्तम आदरातिथ्य करण्यांत मग्न असायचा.

परंतु माधवशर्मा येणार हे माहीत असूनदेखील त्याने तशी व्यवस्था अगोदर केलेली नव्हती. ग्रमाधिकारी निरोप पाठवेपर्यंत जगन्नाथ स्वस्थ बसला होता. त्याच्या उलट रामचंद्र होता. प्रामाणिक व रोखठोक. माधवशर्माच्या मोठेपणाशी त्याला कांहीही देणंघेणं नव्हतं. त्याच्यालेखी तो बालमित्रच होता. स्वार्थापोटी आदर येत नाही, ती भावना मनांतून यावी लागते.’’ राजाचे मौनभंग करण्यांत सफल झालेला वेताळ पुन्हां शवासहित अदृश्य झाला व झाडावर बसला.
(आधार - शकुंतला गर्गची कथा)


No comments:

Post a Comment