Sunday, 17 February 2013

पंचायुध

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असता बोधिसत्वांनी युवराज म्हणून अवतार धारण केला. बारशाच्या दिवशी निरनिराळ्या देशातून थोर विद्वान व अनेक ज्योतिषी आले. ते राजाला म्हणाले - ''आपला हा मुलगा कोणी थोर महापुरुष दिसतो आहे! पंचायुधे धारण करून हा जगज्जेता होईल आणि शूर पराक्रमी म्हणून याचा नावलौकिक होईल!’’ म्हणून मुलाचे नाव पंचायुध असेच ठेवण्यात आले.


काही काळ लोटला. मुलाला समजूत येऊ लागली, तेव्हा राजाने त्याला गांधार देशाच्या तक्षशिला नगरीतील एका सुप्रसिद्ध गुरुकुलात विद्याभ्यासासाठी पाठविले.

पंचायुधने तक्षशिला येथील गुरुकुलात काही काळ अभ्यास केला व सर्व विद्यांमधे तो पारंगत झाला. गुरुकुलातून समावर्तन संस्कार झाल्यावर घरी निघतेवेळी कुलगुरुने शिष्याला आशीर्वाद देऊन पाच आयुधे दिली. गुरुवर्याचा निरोप घेऊन पंचायुध काशीला परत निघाला.

पंचायुधाला वाटेवर एक भयंकर अरण्य लागले. त्या अरण्यातून चालत असता पंचायुधाला वाटेत काही ऋषी व मुनी भेटले. ते म्हणाले - ‘‘बाबा रे, तुला पाहिले तर तू वयाने फारच लहान दिसतो आहेस! या रानात रोमांच नावाचा एक भयंकर राक्षस राहतो आहे. तू त्याच्या दृष्टीस पडलास तर तो तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून तू या वाटेने न जाता दुसर्‍या वाटेने जा.’’

पराक्रमी पंचायुधाच्या मनावर मुनींच्या त्या सल्ल्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्याने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले व तो त्याच अरण्यमार्गे पुढे निघाला. वाटेत एका जागी त्याला ताडामाडाएवढा उंच व अवाढव्य देहधारी रोमांच राक्षस भेटला.तो राक्षस दिसायला भयंकरच होता. त्याचे डोके हत्तीसारखे मोठे होते. त्याला आग पाखडणारे डोळे होते आणि हत्तीच्या सारखेच दोन मोठे सुळे देखील होते. शिवाय सर्व अंगावर अस्वलासारखे लांब लांब केसही होते.

रोमांच राक्षस पंचायुधाच्या वाटेवर आडवा उभा राहून हुंकारला - ‘‘कोण रे तू? कोठे निघालास? उभा रहा! या जंगलात पाऊल टाकायला तुझी छाती कशी झाली? माझे नाव ऐकूनच लोक थरथर कापतात. मी तुला आता गिळतो!’’


पंचायुध जरासुद्धा न भिता म्हणाला - ‘‘राक्षस राजा, मी सर्व कळल्यावरच या वाटेने आलो आहे. खबरदार, तू जवळ आलास तर!’’ असे दरडावून पंचायुधने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला व राक्षसावर सोडला.

तो बाण राक्षसाने अंगात घातलेल्या कातड्याला लागला, राक्षसाला लागलाच नाही. तेव्हां पंचायुधाने बाणामागून बाण सोडून रोमांचावर शरवृष्टीच केली. परंतु तो प्रयत्नही निष्फळ ठरला. शेवटी पंचायुधाने विषारी बाण सोडले.

परंतु त्यामुळे सुद्धा राक्षसाचे काहीही नुकसान झाले नाही.

आता मात्र राक्षस मोठ्याने हुंकारला व पंचायुधावर धावला. पंचायुधाने आपली तलवार उपसली व राक्षसावर वार केला. परंतु राक्षस जागचा हललासुद्धा नाही.
तेव्हा पंचायुध राक्षसाला म्हणाला - ‘‘तू आपल्या मूर्खपणाने मला ओळखलेले दिसत नाहीस. माझं नाव पंचायुध आहे, लक्षात असू दे. मी या अरण्यात पाऊल टाकतांना फक्त आपल्या आयुधांवरच अवलंबून राहून इकडे आलो नाही!’’ असे म्हणत पंचायुधने मूठ आवळून राक्षसाला एक ठोसा दिला. राक्षस जागचा हलला नाही.

राक्षस जोराने हंसला व म्हणाला - ‘‘पोरा! तुझे हे धाडस पाहून तू कोणी सामान्य माणूस असशीलसे मला वाटत नाही. माझ्यासारख्या प्रलयभयंकराशी युद्ध करायचे साहस तू दाखविलेस. इतर लोक मला नुसते पाहूनच बेशुद्ध होऊन पडतात. मग तुला माझी भीति न वाटण्याचे काय कारण रे?’’

‘‘भय वाटण्याचे कारणच कां असावे? जो जन्मतो त्याला मरण हे असतेच! शिवाय माझ्या अंगात वज्रायुधासारखं एक खड्ग आहे. ते खड्ग म्हणजे ज्ञान. तू मला गिळलेस, तर ते खड्ग तुला उभे चिरून काढील!’’

राक्षस एक दोन क्षणच विचार करीत राहिल्यावर म्हणाला - ‘‘पोरा, तू म्हणालास त्यांत काही अर्थ असावा असे मला वाटू लागले आहे! ते काही असो, एवढे खरे की तू निर्भय आहेस, आणि शूर पराक्रमीही आहेस. मी तुझ्यासारख्याला गिळायचं म्हटलं तरी कदाचित् पचवू शकणार नाही. आतां तू तुला जिकडे जावयाचे असेल तिकडे खुशाल जा.’’पंचायुधरूप अवतार घेतलेल्या बोधिसत्वांनी रोमांच राक्षसाला आशीर्वाद दिला व म्हटले - ‘‘तू मला सोडलेस, ठीकच झालं. परंतु तुझं पुढे काय? तू कितीदा या जगात जन्म घेऊन कुकर्मे करीत निकृष्ट जीवन जगत राहिला आहेस, आणि अज्ञान अंधकारांत कोणास ठाऊक, किती काळ भटकत राहिला आहेस? तू आणखी कितीही दिवस नाहीं, तर युगानुयुगे जिवंत राहिलास, तरी तुला गती नाही का?’’

‘‘तर मग महात्मन्, या अज्ञानांधकारातून बाहेर निघायला काही मार्ग आहे का? असला तर कृपा करुन सांगा.’’ राक्षसाने विचारले.

‘‘तू या अरण्यांत राहून अरण्यमार्गाने येणार्‍या-जाणार्‍यांचा वध करुन त्यांना खातोस व अशा तर्‍हेने तू आपले पाप वाढवीत आहेस. तुझी पापकर्मे जितकी वाढत जातील, तुला तितकाच जास्त काळ हा निकृष्ट राक्षसजन्मच मिळणार, तुला मोक्ष लाभ मिळणेच शक्य नाही. तुला उत्तम मानवयोनीतच जन्म हवा असेल तर तू पापकृत्ये करण्याचे सोडून दे!’’ असा उपदेश करून बोधिसत्वांनी त्या राक्षसाला मानवांचे हित व्हावे, यासाठी त्याने पालन करण्यालायक व पुण्यप्राप्तीस आवश्यक असलेली पांच सूत्रे सांगितली, व अधम मानवत्व आणणारी पांच तंत्रे सांगितली.


त्या दिवसापासून रोमांच राक्षसाने आपली राक्षसी कृत्ये सोडली आणि तो त्या अरण्यमार्गे येणार्‍या लोकांचा अतिथि-सत्कार करू लागला आणि धर्मबुद्धी नावे प्रसिद्ध झाला.

अशा तर्‍हेने बोधिसत्वांच्या उपदेशामुळे भयंकर राक्षस देखील सन्मार्गाने चालू लागला.

No comments:

Post a Comment