Sunday, 10 February 2013

.... आणि चंद्र तयार झाला

कोणे एके काळी, या विश्वाचा निर्माता, सिंगी बोंगा, याने पृथ्वी निर्माण करायचे ठरवले. पृथ्वीबरोबर त्याने स्त्रिया, पुरुष, पशू, पक्षी, झाडे आणि शेतेही निर्माण केली. आणि त्यांच्या जोडीला त्याने एक सिंगी किंवा सूर्य ही निर्माण केला. त्याचेच नांव असलेला सूर्य ही या सर्वांतली महत्वाची निर्मिती होती. 

त्याच्यामुळे सर्वांना उजेड व उब मिळायला लागली. सूर्याचा उजेड झाडाझुडपांना वाढायला मदत करीत होता. सूर्यामुळे फुले उमलत होती व फळे पिकत होती. सूर्य शेतांना व कृष्णांना हिरवीगार बनवत होता. त्याच्यामुळे पाऊस पडायला लागला. सर्वांना भरपूर धान्य उगवत होते. साहजिकच, सर्वजण आनंदात होते.  

सिंगी बोंगा ते पाहून समाधानाने हसला. दिवसभर सिंगीचा प्रकाश असे. तो कधी मावळत नव्हता. म्हणून दिवसही नव्हता व रात्रही नव्हती. लोक थकून जाईपर्यंत कष्ट करीत व थांबत. कामासाठी किंवा विश्रांतिसाठी अशी ठराविक वेळ नव्हती. प्रत्येकजण वाटेल तेव्हां काम सुरुं करी, पाहिजे तेव्हां झोप काढी, आणि भूक लागेल तेव्हां जेवण करीत असे.  

एक दिवस सिंगी बोंगा पृथ्वीवर फेरफटका मारायला आला. शेतांत काम करणारे स्त्रीपुरुष त्याला दिसले. ‘‘तुम्ही हे शेत केव्हा नांगरले आहे?’’ सिंगीने त्यांच्यापैकी एकाला विचारले, ‘‘आज’’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘‘तो खड्डा तुम्ही केव्हां खणलात?’’ ‘‘आज’’ दुसर्‍या माणसाने उत्तर दिले. ‘‘आणि ती बाग तुम्ही केव्हां तयार केलीत?’’ ‘‘आजच की!’’ तिसर्‍या माणसाने उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, ‘‘तुम्ही असं कां विचारता? फक्त आजच असतो. जे काही होतं ते आजच होतं, आजच झालंय. त्याखेरीज दुसरं काय असणार?’’ 

सिंगी बोंगा पुढे गेला. तिथे एक स्त्री व एक मूल होते.

‘‘हा मुलगा केव्हां जन्मला?’’ त्याने त्या मातेला विचारलं.

‘‘आज.’’ ती बाई उद्गारली.

‘‘आणि तुझी ही मुलगी मोठी दिसते चांगली... तिचा जन्म केव्हां झाला?’’ ‘‘आज’’ ती बाई म्हणाली, ‘‘पण तुम्ही हे का विचारता आहात?’’ 


या वेळी मात्र सिंगी बोंगाला आश्चर्य वाटले नाही. त्याच्या प्रत्येक प्रश्नाला हे लोक ‘आज’ हे एकच उत्तर कां देत होते ते त्याच्या लक्षांत आलं. 

त्या लोकांना वेळेचा अंदाजच नव्हता, कारण तिथें दिवस नव्हते किंवा रात्रीं नव्हत्या, काळाची विभागणी झालेली नव्हती. फक्त एक लांबच लांऽऽब दिवस होता! याबद्दल कांहीतरी करायला हवे असे सिंगी बोंगाने ठरवले. त्याने दुसर्‍या सिंगीला, सूर्याला बोलावले नि सांगितले, ‘‘हे बघ, तू संध्याकाळी मावळलं पाहिजेस आणि पुन्हां सकाळी उगवले पाहिजे. 

म्हणजे अंधार झाला की लोक काम करणार नाहीत. ती विश्राम करण्यासाठी वेळ आहे हे त्यांना समजेल. तू पुन्हां सकाळी दिसायला लागलास की तो दुसरा, पुढचा दिवस होईल.’’ सूर्याने (सिंगीने) हे मान्य केले. संध्याकाळ झाली तशी तो दिसेनासा झाला, आणि जगभर अंधार पडला.  

काय झालंय नि का अंधार पडलाय हे काही कुणाला कळेना. लोक घाबरले नि इकडेतिकडे पळायला लागले. काहीजण पळताना पडले. काही जणांचा पाय खड्ड्यांत पडून मुरगळला. मुले खेळत होती ती झाडावरुन खाली पडली. स्त्रियांच्या हातून भांडी पडून फुटली. काय करायचे ते कुणालाही कळेना. 

शेवटी त्यांच्या नेत्याने सर्वांना बोलावून सांगितले, ‘‘आता सर्वजण खाली पडून राहा आणि विश्रांति घ्या. अंधारात तुम्हाला कांहीही काम करता येणार नाही.’’ अशा तर्‍हेने रात्र ही विश्रांतिसाठी वेळ ठरली. सूर्य जेव्हां दिसूं लागला, तेव्हां सगळेजण उठले आणि उजाडल्यावर कामाला लागले. एकूण लोक आनंदात राहू लागले. थकव्याने खाली पडेपर्यंत त्यांना काम करावे लागत नव्हते. अंधार पडला की सारे चिडीचूप होत आणि त्यांना कांहीही दिसत नसे. 

पण पुन्हां एक समस्या निर्माण झाली. अंधारात कांहीच दिसत नसल्यामुळे बरेचजण ठेचकाळत, जखमी होत होते. जरी आभाळांत चांदण्या चमचमत होत्या. तरी त्यांचा उजेड पुरेसा नव्हता. लोक खड्ड्यांत पडत, झाडावर आपटत व घरांत धडपडत. रात्री सारा गोंधळच होऊ लागला. 

सिंगी बोंगा पुन्हां भेटायला आला, ‘‘आता दिवस व रात्र झाल्यामुळे छान झालं की नाही? रात्री विश्रांति घेतल्यानंतर तुम्हाला उत्साही वाटतं ना?’’ ‘‘हो तर!’’ त्यांनी सांगितलं, ‘‘आम्हाला सकाळी अगदी छान वाटतं. पण अंधारात मात्र आम्हाला दिसत नाही. आणि आम्हाला दुखापत होते, वस्तू मोडतात, हरवतात, अंधार झाल्यावर आम्हाला त्रास होतो. आम्हाला रात्री सूर्य (सिंगी) मिळणार नाही कां? उजेडाशिवाय रात्री फार कठीण असतात.’’  

‘‘नाही’’ विश्वाचा निर्माता म्हणला, ‘‘तुम्हाला रात्रीचा सूर्य आता नाही मिळणार. त्याला रोज संध्याकाळी मावळायला हवं ना! पण मी त्याऐवजी तुम्हाला कमी उजेडाचं कांहीतरी देतो. तुम्हाला त्या उजेडांत दिसेल, पण काम नाही करता येणार. तुम्हाला एक शांत, शीतल प्रकाश मिळेल. त्यामुळे अपघात होणार नाहीत व रात्री त्रास होणार नाही. तुम्हाला मी हा ‘चांदू’ देतो.’’ 

आणि सिंगीने चंद्र उर्फ ‘चांदू’ची निर्मिती केली. तो आभाळांत वर गेला आणि अगदी मंदपणे चमकत राहिला. लोकांना या उजेडाचा डोळ्यांना त्रास होत नव्हता. झोपही चांगली लागायची. दिवसा सिंगी आणि रात्री चांदू! अशा प्रकारे चंद्र तयार झाला.

No comments:

Post a Comment