Thursday, 7 February 2013

दोन मोर


निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला, त्याने झाडावरुन प्रेत खाली उतरवले व आपल्या खांद्यावर घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला. तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन्, किती भयानक अंधार आहे, स्मशानाजवळ हिंस्त्र जनावरे आहेत. तुझा जीव धोक्यांत आहे. कुणीही केव्हांही हल्ला करील. तरीही तू निर्धास्तपणें पुढें चालतो आहेस. किती रे हट्टी आहेस तू !
पण निसर्गाच्या सान्निध्यांत राहणार्‍या वनवासी गिरीजनांच्या माहितीत आणि पंडित व ज्ञानी यांच्या विचारांत खूप वेळां फरक आढलतो. उदाहरण म्हणून मी तुला चंद्रशर्मा नांवाच्या एका चित्रकाराची कथा सांगतो. लक्ष देऊन ऐकलीस तर तुझा शीण दूर होईल.’’ आणि वेताळ पुढील गोष्ट सांगू लागला.
‘‘महाराज सुवर्णदेव, सुवर्णदेशचा राजा होता. तो अत्यंत दयाळू व विचारी होता. आपल्या देशाची निसर्गसंपत्ती वाढावी यासाठी तो सातत्याने प्रयत्न करीत असे. वन्य प्राणी, पशुपक्षी यांचे संरक्षण करण्यासाठी त्याने खूप चांगले नियम केले होते व ते पाळले जातील याबद्दल तो जागरुक होता. प्रत्येक वर्षीं दिवाळीच्या दिवसांत वैलांची शर्यत त्या राज्यांत होत असे. जे बैल चांगले धष्टपुष्ट व निरोगी दिसत, त्यांना राजा विशेष बक्षीसे देत असे. मनमोहक निसर्गचित्रे रंगवणार्‍या चित्रकारांनाही पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करीत असे.
राजधानीजवळच्या गांवात चंद्रशर्मा राहात होता. तो एक चांगला चित्रकार होता. जर कुणी आपले चित्र रेखाटायला त्याला सांगितले, तर थोड्याच वेळांत तो त्यांचे चांगले चित्र काढून देत असे. म्हणून कित्येक रसिक धनवंतांनी त्याच्याकडून आपली चित्रें रंगवून घेतली होती.
त्यावर्षीं दिवाळीच्या उत्सवांत चित्रकारां-साठी जी स्पर्धा ठेवील जाईल त्यांत भाग घ्यायचा चंद्रवर्माने निश्चय केला. म्हणून त्याने दोन हात लांब व एक हात रुंदीच्या जाड कापडी फलकावर दोन सुंदर मोरांचे चित्र काढले. ते मोर पाहिल्यानंतर असे वाटत होते, कीं ते जणूं कांही आपले पिसारे फुलवून, एकमेकांसमोर खुषींत नाचत आहेत.
ते चित्र पाहून एक जाणकार म्हणाला, ‘‘वा, वा, किती देखणे चित्र आहे हे! आपल्यासमोरच हे मोर जणूं कांही नाचत आहेत असं वाटतंय. घराच्या प्रवेशद्वारावर जर हे चित्र लावलं तर घराची शोभा द्विगुणित होईल.’’
दुसरा एक तज्ञ चित्रकार म्हणाला, ‘‘मोराच्या कंठाचे रंग फारच सुरेख मिसळले गेले आहेत. या रंगात इतक्या नाजूक छटा दाखवणं अतिशय कठीण आहे. आणि त्यांत अशी तकाकी व झळाळी कधी पाहिली नव्हती. महाराजांनी जर हे चित्र पाहिलं तर शंभर मोहरांचे बक्षीस ते लगेच देतील.’’
चंद्रशर्मा या स्तुतीमुळें हुरळून गेला. त्याला हे बोलणें फार आवडले. आपल्या बोटांतली जादू अप्रतिम आहे याचा त्याला अभिमान वाटला. जे रसिक त्याच्या मोरांची प्रशंसा करीत होते, त्यांच्यापैकीं प्रत्येकाला तो विचारीत होता, ‘‘खरंच कां हे मोर इतके देखणे आहेत?’’ इतरांकडून स्तुतिस्तोत्रें ऐकण्यासाठीच तो असं विचारीत होता. त्यानंतर ते चित्र त्याने एका मलमलीच्या मऊ चौघडींत गुंडाळून एका पेटींत जपून ठेवले.
दिवाळीच्या दिवशी आपल्या एका मित्राला घेऊन चंद्रशर्मा बैलगाडींतून स्पर्धेंत भाग घेण्यासाठी राजधानीला निधाला. स्पर्धेंत भाग घेणार्‍यांची अगोदर चांचणी होणार होती. चंद्रशर्माचे चित्र पाहून सारे अधिकारी मंत्रमुग्ध झाले. महाराजांना चित्र आवडले व कौतुकाने ते म्हणाले, ‘‘हेच चित्र बक्षीसपात्र आहे.’’ इतरांनी होकारार्थी माना डोलावल्या, व त्या चित्राचे भरपूर कौतुक केले. तिथें बैलांच्या शर्यतींत भाग घेणार्‍या शेतकर्‍याबरोबर एक आदिवासी आला होता. ही स्तुतीसुमने ऐकून तो खुदकन हंसला. महाराज व इतर सरदारांनी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पहिले. तो घाबरला व तिथून मागच्यामागे जायचा प्रयत्न करुं लागला. पण महाराजांनी म्हटले, ‘‘थांब, हे चित्र पाहून तू कां हंसलास ते सांग. घाबरुं नकोस. तू वनांत राहणारा आहेस, त्यामुळें तुला मोरांची चांगलीच माहिती असेल, होय ना?’’
त्या आदिवासी तरुणाने महाराजांकडे व चंद्रवर्माकडे ओशाळवाण्या नजरेने पाहिले व तो म्हणाला, ‘‘महाराज, या चित्रांत फार मोठी चूक झालीय!’’ ‘‘अस्सं! आम्हाला जी चूक कळली नाही ती तुला कळलीय होय? सांग पाहूं काय ते.’’ महाराजांनी चढ्या स्वरांत सांगितले.
‘‘महाराज, फक्त पुरुष मोरच पिसारा फैलावतो. लांडोर ही कोंबडीसारखी असते. ती नाचूं शकत नाही. तिला आकर्षित करण्यासाठीच मोर पिसारा उभारुन नाचतो. एक पुरुष मोर कधीही दुसर्‍या नरासमोर पिसारा फैलावत नाही. जर भांडण असेल तरच तो दुसर्‍या मोराजवळ येतो.’’
त्या आदिवासीचे बोलणें ऐकून सारेच चकित झाले व त्यांना रागही आला. परंतु चंद्रशर्माने मात्र एकदा त्याच्याकडे पाहिले, मान खाली घातली आणि आपले चित्र पुन्हां त्या मलमलींत गुंडाळले. महाराजांना वंदन करुन तो निमूटपणें तिथून चालता झाला.’’

ही गोष्ट सांगून वेताळाने राजाला म्हटले, ‘‘राजन्, चंद्रशर्माने काढलेल्या चित्राची प्रशंसा तिथें असलेल्या सर्वांनी व महाराजांनी देखील केली होती. ते सर्व विद्वान, जाणकार अधिकारी होते. त्यांच्यासमोर एका माणसाने हे चित्र चुकीचे आहे असं सांगणे हे त्याचा मूर्खपणा दाखवणे आहे, नाही कां? त्याच्या या टीकेवर न रागवता चंद्रशर्मा मुकाट्याने सभेंतून निघून गेला. हा त्याचाही असमंजसपणा प्रदर्शित झाला. नव्हे कां? माझ्या या शंकांची उत्तरे ठाऊक असूनही जर तू गप्प राहिलास तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन पडतील.’’
त्यावर विक्रमार्कने उत्तर दिले, ‘‘तो आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यांत, शुद्ध मोकळ्या हवेंत राहाणारा होता. साहजिकच अरण्यांतल्या पशुपक्षांविषयी त्याला खूप माहिती होती. चंद्रशर्माने जे मोरांचे चित्र रंगवले होते, ते खरं म्हणजे त्या पक्ष्यांच्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध होते. त्याकारणाने त्या चित्रांत ही चूक राहिली. हे त्या आदिवासी तरुणाचे अज्ञान नव्हे; उलट त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचे हे उत्तम उदाहरण आहे. आता चंद्रशर्माबद्दल सांगायचं तर तो चित्रकलेंत पारंगत होताच, पण त्याचे चित्र सत्यपरिस्थितीला धरुन नव्हते. त्याने मिसळलेल्या रंगांचे अद्भुत चित्रण पाहून महाराजांसकट बघणारे सारे मोहित झाले होते. म्हणून त्यांनी ते चित्र पुरस्कारास पात्र ठरवले. परंतु त्या आदिवासीच्या बोलण्यांतले निखळ सत्य आणि वस्तुस्थिती ही दोन्ही निर्विवाद होती, योग्य होती. चंद्रशर्मा प्रामाणिक होता आणि त्याचे निसर्ग सृष्टीचे ज्ञान कमी होते हे त्याच्या लक्षांत आले व त्याला आपल्या चित्रांतली चूक मान्य होती, म्हणून तो निमूटपणे तिथून गेला.’’ राजाचे मौन भंग करण्यांत सफल झालेला वेताळ पुन्हां शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला. (आधार : सुचित्राची रचना)

No comments:

Post a Comment