
निश्चयाचा पक्का विक्रमार्क परत एकदा त्या झाडाजवळ गेला. त्याने प्रेत खाली उतरवले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला. तेव्हां प्रेताच्या आंत लपलेल्या वेताळने विचारलं. ‘‘राजन, जगांत असे लोक असतात कीं ज्यांना आपले कार्य पूर्ण होणार नाही, त्यांत कांहीतरी विघ्न येईल अशी सतत भिती वाटत असते. असे लोक कोणत्याही कार्याच्या पूर्ततेवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यात निश्चयाचा अभाव असतो. पण तुझी गोष्ट निराळी आहे. तू त्यांच्यासारखा नाहीस. तरीदेखील या रात्रींच्या वेळीं तुला स्मशानांत कष्ट झेलताना पाहून मला तुझे खरोखर आश्चर्य वाटते, आणि तुझी कींव येते.
मला तुझे हे करणें जरादेखील पसंत नाही. मी असं पाहिलंय कीं कधीकधी विवेकी माणसें, ज्यांचे भक्त असतात, ज्यांची ते आराधना करतात, त्यांच्याचमुळें त्यांना यातना सहन कराव्या लागतात. उदाहरण म्हणून मी तुला अंगद नांवाच्या एका मुनीची कहाणी सांगतो. म्हातारपणामुळें त्याची तार्किक दृष्टी व विवेकबुद्धि भ्रष्ट झाली होती. त्याचबरोबर मी तुला या मुनीवर विश्वास ठेवणार्या विश्वेश्वरचीही गोष्ट सांगेन.’’ आणि वेताळाने अंगद मुनींची गोष्ट सांगायला सुरवात केली.
रत्नगिरी नगरांत रत्नगुप्त नांवाचा एक महाभाग रहात होता. रत्नावती ही त्याची धर्मपत्नी होती. दोघेही परोपकारी व दैववादी होते. बर्याच वर्षांनंतर त्यांना एक मुलगी झाली. तिचे नांव होते अन्नपूर्णा. तिचे पालनपोषण त्यांनी मोठ्या लाडाने केले होते. ती मुलगी म्हणजे त्यांचं सर्वस्व होती. ती पांच वर्षांची असताना अकस्मात एका अनोख्या रोगाने आजारी पडली.
ती जे खातपीत होती ते तिला पचत नव्हते. तिला कांही खावेसेही वाटत नव्हते. दररोज सकाळसंध्याकाळ तिला भयंकर डोकेदुखी सुरुं होई. त्या वेदनांमुळें ती कण्हत असे. कित्येक वैद्यांनी उपचार केले, पण कांही फरक पडला नाही. दुसरा कांही उपाय सुचेना म्हणून तिचा पिता रत्नगुप्त जवळच्या अरण्यांत गेला. त्याने आपली व्यथा अंगद नांवाच्या मुनीला सांगितली.

रत्नगुप्तने अंगदाच्या उपदेशानुसार केले. त्या दिवसापासून अन्नपूर्णा भगवानाची श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूजाअर्चा करूं लागली. तिला जे कांही जेवण देत, ते देवाचा प्रसाद आहे असं समजून ती खाऊं लागली. हळूंहळूं तिचा आजार कमी होत गेला. परंतु ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद यांच्यासारखी ती सारा वेळ परमेश्वरचिंतनात मग्न राहात होती. भक्तीरसांत रंगून जात होती.
हे पाहून रत्नगुप्ताचा जीव कळवळत असे. आता देवाची भक्ती हा अन्नपूर्णेचा आजार झाला, ती जेव्हां मोठी झाली तेव्हां ती म्हणूं लागली, ‘‘माझे जीवन परमेश्वराच्या चरणीं समर्पित आहे. मी लग्न करणार नाही.’’
रत्नगुप्ताने तिला खूप समजावले, रागावून पाहिले, पण ती आपला निर्णय बदलणारी नव्हती, जेव्हां त्याचे सारे प्रयत्न थकले, तेव्हां तो पुन्हां अंगदाजवळ गेला आणि त्याने आपले दुःख उगाळले. आपल्या घरी येण्याचे निमंत्रण त्याने अंगदाला दिले.
अंगद अन्नपूर्णाला म्हणाला, ‘‘प्रत्येक माणसांत परमेश्वर असतो. तुला परमेश्वर पाहायचा आहे ना? तुझे मातापिता ज्या माणसाला तुझ्याकरता पसंत करतील, त्याच्यांतच तू परमेश्वर पाहा. आपल्या पतीची सेवा कर. परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुला संतानप्राप्तीचा वर देईल. त्या संतानाला परमेश्वर आपला अंश प्रदान करील.’’
प्रत्येक स्त्रीला माता होण्याची इच्छा असते. ही तिची सहजभावना असते. अन्नपूर्णाने अंगदमुनींचा सल्ला मानला. वैभव नांवाच्या एका श्रीमंत व्यापारी तरुणाशी तिचा विवाह झाला. एका वर्षाच्या आंत त्यांना एक सुंदर मुलगा झाला. अन्नपूर्णाला वाटलं कीं तिच्या मुलाच्या रुपाने देवानेच तिच्या घरी जन्म घेतला आहे. पतीपत्नींनी त्याचं नांव ठेवलं विश्वेश्वर!

पत्नीचे दुःख समजल्यानंतर वैभवने तिला समजावून सांगितले, ‘‘तूच आपल्या मुलाच्या मनांत इतकी देवभक्ति भरवली होतीस. तुझ्यामुळेच तर तो इतका कट्टर देवभक्त झाला आहे. आता निदान त्याला देवापासून दूर ठेवायचा प्रयत्न तरी कर.’’
पतीचे हे मत अन्नपूर्णाला पटले. दुसर्याच दिवशीं तिने आपल्या मुलाला कठोर आवाजांत सांगितले, ‘‘हे तुझं खेळण्याचं वय आहे. आजपासून देवाची पूजा करायचे थांबव आणि इतर मुलांप्रमाणें खेळ, हिंडणे, अभ्यास, वाचन, लेखन याकडे लक्ष दे.’’
विश्वेश्वरला आपल्या मातेची आज्ञा पाळणें जमले नाही. तो ज्याला ज्याला आपली मनीषा सांगू लागला. ते सर्वजण अन्नपूर्णाचीच बाजू घेऊन बोलायला लागले. विश्वेश्वरला आता त्या घरांत राहायची इच्छा नव्हती. तो अरण्यांत गेला. आणि एका झाडाखाली बसून तपस्या करुं लागला. त्या अरण्यांत कोणत्याही हिंस्त्र श्वापदाने त्याच्यावर हल्ला केला नाही. त्याच्या आईचे अपार प्रेम किंवा त्याच्यामधला दैवी अंश, यापैकीं कुणीतरी त्याचे रक्षण केले.
कोणताही विषारी सर्प त्याला शिवण्याचे धाडस करूं शकला नाही. त्याला जेव्हां भूक लागे, तेव्हां डोळे मिटून तो ध्यान करी. प्रार्थनेनंतर त्याला आपोआप फळें पुढ्यांत येऊन पडत.
विश्वेश्वरचे रुप आता बदलले होते. त्याच्या आजूबाजूला काय चालले आहे याची त्याला शुद्ध नव्हती. जेव्हां तो घर सोडून आला होता तेव्हां तो दहा वर्षांचा होता. अरण्यांत त्याने अखंड दहा वर्षे तपस्या केली. तरीही त्याला परमेश्वराचे दर्शन घडले नाही.

विश्वेश्वर स्तंभित झाला. त्याने आपले मस्तक व गळा चांचपून पाहिला, त्यांत कांही फरक जाणवला नाही. कोणताही बदल जाणवला नाही म्हणून तो कांहीतरी बोलणार तेवढ्यांत शिकारी म्हणाला, ‘‘वा वा, स्वामींनी माझ्यावर अनुग्रह केला आणि ते अंतर्धान पावले. या पृथ्वीवर या घटकेला माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कुणीही नाही.’’ जणूं कांही विश्वेश्वर तिथें नव्हताच असे शिकार्याचे बोलणें चालणें होते. त्यानंतर शिकारी तिथून निघून गेला.
‘‘मी आणि परमेश्वर? माझ्यांत तर भगवान आला नसेल ना? मला तो दिसत नाही पण इतरांना मात्र तो माझ्यांत दिसतो आहे हे नवलच!’’ विश्वेश्वर विचारांत पडला. त्याची मनस्थिती मोटी विचित्र झाली. त्याने बराच वेळ विचार केला व त्यानंतर सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठीं त्याने पुन्हां नागरिकांत मिसळण्याचे ठरवले. खरं काय होतं ते इतर लोकच बरोबर सांगू शकले असते! जेव्हां तो रत्नगिरीच्या दिशेने जायला लागला तेव्हां वाटेंत अंगदमुनी समोरुन येताना त्याला दिसले. ते आता वयस्कर झाले होते आणि म्हातारपणाची सारी लक्षणें त्यांच्यात स्पष्ट दिसून येत होती. बोलताबोलता अंगदमुनींना समजलं कीं तो परका माणूस रत्नगिरीला जातो आहे.

अंगदाच्या बोलण्याने विश्वेश्वरचा संभ्रम जास्तच वाढला. त्याने अंगदला सविस्तर हकीकत सांगितली आणि म्हटले, ‘‘दहा वर्षें मी अरण्यांत तपश्चर्या करतो आहे आणि आपण म्हणता आहात कीं दरवर्षीं आपण माझ्या घरीं मला भेटता आहात! हे कसे शक्य आहे?’’
त्यावर अंगदने विश्वेश्वरकडे चौकसपणें पाहिलं आणि म्हटले, ‘‘माझी दृष्टि अधू झाली आहे, म्हणून मी तुला नीट ओळखले नाही. तुझ्या घरीं मी तुला इतकी वर्षें भेटतो आहेच रे! आता सारं कांही माझ्या ध्यानांत येतंय. तुझ्या मातेने तुझ्यांत परमेश्वर पाहिला आणि तू तिला सोडून दिलंस. आपल्या भक्ताच्या मनाला क्लेश होऊं नयेत असं परमेश्वराला वाटलं, म्हणून तुझे रूप धारण करून परमेश्वर तिथें राहातो आहे. मीही किती मूर्ख आहे बघ! तुझ्या घरीं जाऊन भगवानाचं दर्शन घेत होतो, परंतु त्यातलं सत्य मात्र मला अपरिचित राहिलं.
शिकार्याच्या रूपांत परमेश्वर तुझ्याकडे आला आणि तुला घरीं परत जाण्यासाठीं त्याने उद्युक्त केले. दहा वर्षांच्या तपस्येनंतर तुला परमेश्वराने दर्शन दिले. आता तू घरी जा. परमात्म्यालादेखील मुग्ध करणार्या मातृप्रेमापासून तू दहा वर्षे पारखा झाला आहेस. मातेमधेंच देव बघ आणि उरलेलं आयुष्य घालव.’’
कांहीही न बोलता विश्वेश्वरने अंगद मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि तो वेगाने घराकडे निघाला.ही कथा सांगितल्यानंतर वेताळाने आपला संशय प्रकट करीत म्हटले, ‘‘राजन्, विश्वेश्वरच्या जीवनाचे ध्येय होते, तपश्चर्या करुन परमेश्वराचे दर्शन करणें! त्यासाठी त्याने सर्व शारिरिक सुखें व मातृप्रेम, यांचा त्याग केला आणि तपस्या करण्यासाठीं तो अरण्यांत निघून गेला. सदैव परमेश्वराचे चिंतन करीत बसणार्या विश्वेश्वरला अंगदाने सांगायचं कीं तुझी आई हेच तुझे दैवत आहे, हे विसंगत वाटत नाही? याच्यात मला तरी कोणत्याही प्रकारचे धार्मिक चिंतन व तर्कशुद्ध दृष्टि दिसत नाही.
या असंबद्ध विचारसरणीचं कारण अंगदाचं म्हातारपण आहे कीं अस्वस्थ मन आहे? माझ्या या शंकांचं उत्तर माहीत असूनदेखील जर तू गप्प बसलास तर तुझ्या मस्तकाचे तुकडेतुकडे होतील.’’ विक्रमार्काने उत्तर दिले, ‘‘भगवान करूणामयी आहेत. त्यांच्या मनांत आले कीं भक्ताला दर्शन द्यावे कीं ते कोणत्याही स्वरुपांत दर्शन देतात. हे रहस्य विश्वेश्वरला समजलं नाही. जेव्हां विश्वेश्वरने अंगदाला अरण्यांत घडलेली घटना सविस्तर सांगितली.
तेव्हां अंगदाला त्याला समजावून सांगावं लागलं कीं शिकार्याच्या रुपांत प्रत्यक्ष परमेश्वरानेच त्याला दर्शन दिलं होतं आणि साहजिकच त्याची तपस्या फळाला आली. हे सत्य उलगडल्यानंतरदेखील जर विश्वेश्वर अरण्यांत तपस्याच करीत बसला असता किंवा पुन्हां तिथें गेला असता तर तो त्याचा मूर्खपणा ठरला असता, आणि तो गोष्ट अविचारी आणि अनुचित ठरली असती.
याकारणाने अंगदमुनींनी त्याला हिताचा उपदेश केला, कीं त्याने आपल्या आईच्या रुपांतच आपल्या दैवताचे दर्शन करावे. हे अंगदच्या धार्मिक व आध्यात्मिक परिपक्व बुद्धीचे लक्षण आहे. म्हातारपणाशी किंवा मानसिक अस्वस्थतेशी त्याचा काडीमात्र संबंध नाही.’’ राजाचे मौनभंग करण्यांत वेताळ सफल झाला आणि म्हणून ते प्रेत घेऊन तो पुन्हां अदृश्य झाला आणि पुनश्च झाडावर जाऊन बसला. (आधार : ‘वसुंधरा’ यांची रचना)

No comments:
Post a Comment