Thursday, 7 February 2013

रत्नकंकण

निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. झाडावरचे शव त्याने खाली उतरवले आणि आपल्या खांद्यावर घेतले. स्मशानाच्या दिशेने तो पूर्ववत चालूं लागला. तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन्, तू थकलेला नाहीस. परंतु तुला सांगून सांगून मी मात्र थकलो आहे. तू राजा आहेस. प्रजेच्या-बाबतीत तुझ्यावर अनेक जवाबदार्‍या आहेत. त्या सर्व विसरुन तू या भयानक जागी इतक्या रात्रीं कां वांया घालवतो आहेस? कार्य सिद्धीसाठी तू जे परिश्रम करतो आहेस, त्याचं कौतुक केल्यावाचून मला राहावत नाही. परंतु या जगांत कांहीजण असे असतात कीं त्यांचे काम ते विनासायास साधून घेतात. आदित्य हा असाच एक तरुण होता. त्याने अनेक कष्ट झेलले, मनस्ताप सोसला. तरी त्याने आपला कार्यसिद्धी पुरी केली. पण अगदी ऐन मोक्याच्या क्षणीं त्या कार्याचे फळही त्याने ठोकरले, व आपल्या हातांतून जाऊं दिले. तुझ्याबाबतीत तू असली चूक करुं नयेस असं मला वाटतं. तुला सावध करण्यासाठी मी त्याची कहाणी तुला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक.’’ आणि वेताळाने आदित्यची कथा सांगायला सुरवात केली.
रत्नपुर राज्यांतल्या वज्रपुर नांवाच्या खेड्यांत आदित्य हा तरुण राहात होता. तो खूप हुशार आणि चटपटीत होता. आपल्या आईवडिलांचा मान तो राखीत असे. त्यांची शेती लहानशी होती. त्यामुळें कष्टांचे जे फळ मिळायला हवे ते त्याला मिळत नव्हते. त्याचे वाडवडीलदेखील त्याच परिस्थितींतून गेलेले होते. वज्रपुरांत पाऊस वेळेवर पडला तर चांगले पीकपाणी होत होते. पण पाऊस चांगला पडला तरी चांगले पीक हाती लागेलच याची खात्री नसे. त्याचं कारण होतं. त्या गांवाजवळ असणारी बाष्पधारा नदी. ती नेहमी कोरडीच असे. तिला केव्हां पूर येईल ते सांगता येत नसे. उगमाजवळ जोरदार पाऊस पडला तर अचानक पूर येई आणि गांव आणि शेते जलमय होत असत.
गांवातल्या प्रजाजनांनी ग्रमाधिकार्‍याच्या मार्फत अनेकवेळा सरकारला विनंती केलेली होती कीं त्या नदीवर एक बंधारा बांधून घ्यावा म्हणजे पुराच्या पाण्यापासून गांव सुरक्षित राहील. राजाच्या अधिकार्‍यांमार्फत देखील त्यांनी राजाला विनंती केली होती. पण दुर्देवाने, याबाबतीत राजाने आजपर्यंत फारसे लक्ष दिले नाही. गांवकर्‍यांना गांव सोडून जाणेही शक्य नव्हते, म्हणून दुष्काळी प्रदेश असला तरी ते तिथेच राहात होते.
त्यावर्षीं चांगला पाऊस झाला. यंदा पीक उत्तम येईल व वर्षभर आराम करता येईल याची आदित्याला खात्री होती. आणि झालंदेखील तसंच. पीक चांगलं आलं. मळणी करुन पीक घरी नेण्याची सारी तयारी त्याने केली आणि दुर्देवाने, नदीला प्रचंड पूर आला, नि सारे पीक नष्ट झाले. त्यावेळीं शेतांत गाई बकर्‍यांच्या बरोबर त्याचे आईवडील होते, ते देखील सारे पुरांत वाहून गेले. ते दृश्य बघून आदित्य दुःखाने वेडा झाला. तो धाय मोकलून रडायला लागला. त्यानंतर त्या गावांत राहण्याची त्याला इच्छाच उरली नाही. त्याचे मन विरक्त बनले, व दुःखाने तो तिथून निघून गेला.
दोन दिवस तो चालत राहिला. त्याला कुठे जायचं होतं आणि तो कोणत्या दिशेला जात होता हेदेखील त्याला ठाऊक नव्हतं. तिसर्‍या दिवशी एका वडाच्या झाडाखाली थोडी विश्रांति घेऊन जेव्हां तो तिथून निघाला, तेव्हां त्या झाडींत कांहीतरी चकाकत असल्याचा त्याला भास झाला. त्याने जवळ जाऊन ती वस्तू उचलून पाहिली. ते एक हिर्‍यांचे कंकण होते. त्याच्यावर राजमुद्रा होती. आदित्यने ते कंकण आपल्या कपड्यांत लपवले आणि तो मार्गस्थ झाला.
संध्याकाळपर्यंत तो शशांकपुर या राजधानीच्या वेशीजवळच्या शहरांत पोंचला. जेव्हां तो शहरांतल्या एका रस्त्यावरुन चालला होता, तेव्हां राजाचा एक सैनिक तिथें दवंडी पिटताना दिसला.
‘‘राज्यांतल्या नागरिकांना ही शेवटची घोषणा आहे. कांही दिवसांपूर्वीं महाराजांचे रत्नकंकण हरवले आहे ते अजून सांपडलेले नाही. चोरांचा तपास चालूं आहे. जर हे रत्नकंकण कुणी महाराजांना आणून दिले तर त्याला भरपूर इनाम दिले जाईल. पण जर चोर सांपडला आणि त्याने ते कंकण महाराजांना दिले नाही, तर मात्र त्याला फांशीची कठोर शिक्षा नाईलाजाने द्यावी लागेल. तेव्हां उद्यापर्यंत महाराजांची राजमुद्रा आणून द्यावी आणि बक्षीस मिळवावे हो ऽऽऽ!’’
तिथल्या लोकांशी बोलून आदित्यने त्या रत्नकंकणाबद्दल चौकशी केली, तेव्हां त्याला समजले कीं महाराजांचे पूर्वज प्रत्येक पिढींत ते हिरेजडित कंकण वापरत आले होते. म्हणून महाराजांना त्या कंकणाचे अतिशय महत्व होते. तो पिढीजात दागिना होता. महाराजांनी महिनाभर सतत घोषणा केली होती कीं जो कुणी ते कंकण पौर्णिमेपूर्वीं आणून देईल त्याला भरघोस इनाम मिळेल. जर तोपर्यंत ते कंकण महाराजांच्यापाशी परत आले नाही तर मात्र त्यानंतर ज्याच्यापाशी ते असेल त्याला अटक होईल व त्याला फांशीची शिक्षा होईल. ही दवंडी गांवोगांवी दिली. जात होती परंतु अद्याप कंकणाविषयी कांहीच माहिती मिळालेली नव्हती. ते हरवले होते कीं चोरीला गेले होते याचाही उलगडा झालेला नव्हता. सार्‍या राज्यांत या कंकणाबद्दल चर्चा सुरुं होती. लोक तर्ककुतर्क करीत होते.
शशांकपुरांत आदित्य आणखी दोन दिवस थांबला आणि तिसर्‍या दिवशी तो राजसभेंत गेला. त्याने महाराजांना आदराने वंदन केले आणि भर सभेंत ते हिरेजडित सुंदर कंकण त्याने महाराजांच्यासमोर ठेवले.
ते बघून महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांचे डोळे समाधानाने चमकूं लागले. आश्चर्यचकित झालेल्या दरबार्‍यांसमोर महाराजांनी आदित्यला विचारले, ‘‘हे कंकण तुला कुठे नि केव्हां मिळाले?’’
‘‘तीन दिवसांपूर्वीं शशांकपुराच्या वेशीबाहेर असलेल्या रानांतल्या एका वडाच्या झाडाखाली मी थोडी विश्रांति घेतली. उठलो तेव्हां जवळच्या झाडींत कांहीतरी चकाकत असलेले दिसले. निव्वळ कुतुहल म्हणून मी जवळ जाऊन पाहिले तर हे कंकण तिथे कुणीतरी टाकलेले दिसले.’’ आदित्यने सत्य परिस्थिती सांगितली. ‘‘तर मग तू त्याच दिवशी हे कंकण माझ्या-जवळ कां आणून दिलं नाहीस? त्याबद्दल तुला फार मोठं इनाम आम्ही दिलं असतं.’’ महाराजांनी म्हटलं.  कांहीही उत्तर न देता आदित्य निमूटपणें खाली मान घालून उभा होता.
‘‘पौर्णिमेच्यानंतर जो कंकण आणून देईल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल, हे तुला माहीत होतं कां?’’ महाराजांनी करड्या स्वरांत विचारलं.
‘‘माहीत होतं महाराज’’ आदित्यने मान डोलावीत म्हटले राहिले. नंतर सिंहासनावरुन खाली उतरुन त्यांनी आदित्यला प्रेमाने मिठी मारली व म्हटले, ‘‘तुला जे कांही हवं असेल ते माग.’’
आदित्यने महाराजांना प्रणाम केला व म्हटले, ‘‘महाराज, आपल्या राज्याच्या दक्षिणेच्या टोंकाला वज्रपुर हे छोटेसे गांव आहे तिथला मी रहिवासी आहे. तिथले गांवकरी बाष्पधारा नदीच्याकारणाने फार दुःखीकष्टी आहेत. त्या नदीला एक बंधारा बांधून गांवकर्‍यांची घरेदारे व शेती वांचवावी म्हणून आपल्याला अनेकदा विनंती केलेली आहे.
मी आपला प्रामाणिक नागरिक म्हणून माझे कर्तव्य केलेले आहे. आपण राज्यकर्ते आहात, तेव्हां हा बंधारा बांधणे हे आपले कर्तव्य ठरते. आपण मला आता जायची अनुमती द्यावी.’’ असं म्हणून प्रणाम करुन तो सभेतून मागल्या पावलीं परत फिरला.’’
ही कहाणी सांगून वेताळाने विक्रमार्क राजाला विचारले, ‘‘ते कंकण परत करण्यासाठी महाराजांनी जो अवधी दिला होता, त्यानंतरच आदित्यने ते कंकण राजाला दिले. ही त्याच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. तो कांहीही मागू शकत होता. पण त्याने नदीवर बंधारा बांधावा अशी इच्छा व्यक्त केली. गांवकर्‍यांचा लाभ होईल अशी योजना त्याने आंखली. त्याने जाणूनबुजून हातांत आलेली ही संधी कां सोडली? माझ्या या शंकेचे उत्तर माहीत असूनदेखील जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या मस्तकाची अनेक शकलें होऊन पडतील.’’
विक्रमार्क म्हणाला, ‘‘आदित्य प्रामाणिक आहे. त्याला आपल्या श्रमावर पूर्णपणे विश्वास आहे. ते कंकण परत देताना त्याने बक्षिसाची अभिलाषा धरली नव्हती. म्हणूनच त्याने राजाची पौर्णिमेची मुदत संपल्यानंतर ते कंकण परत दिले. स्वतःसाठी कांहीही न मागता जनतेच्या कल्याणासाठी बंधारा बांधावा अशी त्याने राजाला विनंती केली. आपल्या जन्मग्रमाबद्दल त्याला किती प्रेम आहे आणि दुसर्‍यासाठी सत्कर्म करण्याची भावना त्याच्यांत किती आहे हे सिद्ध करणारी ही घटना आहे. त्याचा प्रामाणिकपणा व चांगली बुद्धी बघून राजाने त्याला प्रेमाने मिठी मारली.’’
राजाचे मौनभंग करण्यांत सफल झालेला वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला.


चांदोबा

No comments:

Post a Comment