Thursday, 7 February 2013

पाताल दुर्ग - 3


(कदंबनरेशाचे चार दूत दोन कैद्यांना पकडून कुंतल देशाच्या राजाकडे घेऊन गेले व त्याला म्हणाले कीं, त्या दोघांनी मंत्र्यांचा मुलगा व त्याच्या मित्राची हत्या केली आहे. त्यानंतर ते आपल्या देशांत परत जात असताना कुंतल देशाच्या सैनिकांनी त्यांच्यापैकी दोघांच्या गळ्यांत फांस टाकून ठार केले आणि कैद्यांची सुटका केली. त्यानंतर...)

(कदंबनरेशाचे चार दूत दोन कैद्यांना पकडून कुंतल देशाच्या राजाकडे घेऊन गेले व त्याला म्हणाले कीं, त्या दोघांनी मंत्र्यांचा मुलगा व त्याच्या मित्राची हत्या केली आहे. त्यानंतर ते आपल्या देशांत परत जात असताना कुंतल देशाच्या सैनिकांनी त्यांच्यापैकी दोघांच्या गळ्यांत फांस टाकून ठार केले आणि कैद्यांची सुटका केली. त्यानंतर...)

कदंबनरेशाचे दुसरे दोन दूत घोड्याला टांच मारून ओढा ओलांडून आपल्या राज्यांत पोचले. कुंतलच्या सैनिकांचे बाण त्यांना लागले नाहीत. मध्यरात्र झाली होती. धूसर चांदणे पसरले होते व जंगलही घनदाट होते. त्यामुळे सैनिक दूतांवर नेम धरून बाण मारूं शकले नाहीत. आणि कदंब राज्याचे दोन दूत सुखरूप स्वतःच्या राज्याच्या हद्दींत पोचले. कुंतलच्या सैनिकांचा सरदार चिंताग्रस्त झाला. कोणताही दूत परत जाता कामा नये, असा मंत्र्यांचा आदेश होता. ते राजाला कांहीही सांगू शकतील व दोन्ही देशांत युद्ध होण्याचीही शक्यता आहे, असे त्याला वाटले.
‘‘ओढा पार करून त्या दूतांचा पाठलाग करणे धोक्याचे आहे. कदंब राज्याचे सीमारक्षक त्यांच्या मदतीला येऊं शकतात. पण कांही झाले तरी त्यांना जिवंत सोडता कामा नये. सांगा, तुमच्या पैकी कोण शत्रूच्या प्रदेशांत जाऊन त्यांचा पाठलाग करेल, आणि त्यांना जिवंत किंवा मृत पकडून आणूं शकेल? त्यांना मारणार्‍यास मंत्री बक्षीस देतील.’’ कुंतलच्या सैनिकांचा सरदार म्हणाला.
हे ऐकताच धूमक पुढे आला. तो म्हणाला, ‘‘मी व सोमक हे काम करूं शकूं. आम्हाला बक्षिसाची कांहीही आवश्यकता नाही. केवळ त्या दूतांनाच नव्हे तर कदंबनरेशाच्या मंत्र्यालाही आम्ही ठार करूं. त्या दुष्टांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे वडिलांचे व भावाचे मारेकरी नाही आहोत. आम्ही साधे गांवकरी आहोत. परंतु उग्रसेनने लावलेले अनावश्यक कर सहन न झाल्याने आम्ही बंडखोरी केली.’’

‘‘आमच्या मंत्र्यांनाही संशय आला होता कीं, तुम्ही मारेकरी नाही आहात. त्यामुळेच त्यांनी आम्हाला तुम्हाला सोडविण्याची आज्ञा दिली होती. हे घोडे व या तलवारी घेऊन तुम्ही त्यांचा पाठलाग सुरूं करा. बक्षिस हवे असेल तर तुम्हाला त्या दूतांची मुंडकी छाटून आणून मंत्र्यांना दाखवावी लागतील’’ सैनिकांचा सरदार म्हणाला.
ताबडतोब धूमक व सोमक सरदाराने दिलेले घोडे व तलवारी घेऊन निघाले. दूतांनी पार केलेल्या ठिकाणीच त्यांनीही ओढा पार केला. त्यांच्या शोधांत ते कदंब नगरीच्या दिशेने जाऊं लागले. जंगली जनावरे पाणी प्यायला येत असत त्या दिशेने ते गेले नाहीत. तर पायवाटेवरून ते घोडी दामटू लागले. अत्यंत हुशारीने सोमक व धूमक जंगलातून पुढे जात होते. परंतु दूतांचा कांहीच पत्ता लागेना.

‘‘सोम! अशा अंधारात त्या दुष्टांना पकडणे सोपे काम नाही. चल, आधी आपण आपल्या गांवात जाऊ आणि आपल्या कुटुंबियांना सीमा पार करून कुंतल राज्यांत पोचवूं या’’ धूमक म्हणाला.
सोमक आवेशाने मुंडी हालवून म्हणाला, ‘‘उग्रसेनला मारल्याशिवाय मी गांवात तोंड दाखवणार नाही. तो क्रूर व अत्याचारी आहे. प्रजेचे रक्षण करण्याऐवजी तो शोषण करीत आहे. नाना प्रकारचे कर लावून आपल्याला लुटतो आहे. म्हणूनच तर आपण कर भरायला नकार दिला. केवळ आपण कर भरला नाही म्हणून त्याने आपला असा छळ केला, मारझोड केली आणि वर म्हणतो कीं, मी भातृहन्तक आहे!’’ ‘‘सोम, तुझा हा हट्ट सोडून दे. राजा इतक्या सहजी आपल्या हाती येईल का? त्याचे किती तरी अंगरक्षक असतील! त्याच्याजवळ सैन्य आहे.
शिवाय सर्वच प्रजाजन आपल्या बाजूने नाहीत. आपण मूठभर गांवकरी काय करू शकणार? तो आपल्याला मुंगीप्रमाणे चिरडून टाकेल. आपल्याला मुलेबाळे आहेत. तुझ्याप्रमाणे माझ्यावरही जोरजबरदस्ती केली गेली आहे. हे निसटलेले दूत राजाजवळ आपली चुगली करतील, आणि सांगतील कीं, मारल्या गेलेल्या दूतांसाठी आपणच कारणीभूत आहोत. तेव्हां नीट विचार कर, मग आपल्या कुटुंबियांची काय अवस्था होईल?’’ धूमक म्हणाला.

हे ऐकून सोमक थोडा नरमला. त्याला वाटले कीं, आधी आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता पाहायला हवी. ‘‘ठीक आहे. तू म्हणतोस तसेच करूंया’’ असे म्हणून सोमकने घोडा वळवला. धूमकही घोडा वळवणार, इतक्यांत त्यांना गांवाच्या दिशेला उजेड दिसूं लागला.

दोघांनी आश्चर्यचकित होऊन त्या दिशेने माना उंचावल्या. किल्ल्याच्या दारांतून जळते बाण जंगलाच्या दिशेने येऊं लागले. नगारा, ढोल व ताशांचा आवाज जंगलात घुमूं लागला.
‘‘नगराला आपल्या लोकांनी घेरले आहे. राजा ठार झाला वाटतं. चल, आपणही नगराकडे जाऊं या’’ असे म्हणून सोमकने घोडा वळवला.
धूमक त्याला थांबवत म्हणाला, ‘‘उतावीळपणा करूं नकोस. कदंबनगरीला वेढण्याची शक्ती आपल्या गरीब गांवकर्‍यांमधे कुठे आहे? आपण अंदाधुंदी माजलेल्या नगराच्या दिशेने निघालो, तर राजाकडून पकडले जाऊं. चल, आपण ही पायवाट सोडून झाडींत लपूं या आणि बाण कां सोडले जात आहेत, हे माहीत करून घेऊं या’’ धूमक म्हणाला.
नगरांत दुसरीच अद्भुत, आश्चर्यकारक आणि भयानक अशी एक घटना घडली होती, त्यामुळे संपूर्ण नगरांत व राजवाड्यांतही हलकल्लोळ माजला होता. त्या घटनेच्या अनुरोधाने जंगलाच्या दिशेने जळते बाण सोडले जात होते. घडले असे होते कीं, ऐन मध्यरात्रीच्या वेळी एक बलदंड व्यक्ती किल्ल्याभोवतालचा खंदक ओलांडून गेली व जोरजोरांत नगराचे प्रवेशद्वार ठोठावूं लागली. ‘‘कोण आहे रे? एवढीही अक्कल नाही कां? उजाडल्याशिवाय दार उघडले जाणार नाही’’ द्वारपाल ओरडले.
‘‘मी कोण आहे? राजाधिराज आहे!’’ असे म्हणत त्या बलदंड व्यक्तीने एक गुद्दा हाणून फाटकाचे तुकडेतुकडे केले. दारावरचे कांही पहारेकरी त्याच्याखाली सांपडले. आणि उरलेल्यांनी जेव्हां मोडलेल्या दारांत त्या काळ्या पर्वताएवढ्या व्यक्तीस पाहिले, तेव्हां घाबरुन ते बेशुद्ध झाले. ‘‘तुम्ही मरून पडल्याचे नाटक करीत असाल, तर करा. कमीतकमी जे त्यांतून वाचतील ते तरी जिवंत रहातील. पण तुम्ही जर किल्ल्यांत जाऊन हलकल्लोळ माजवलात, तर एकेकाची मान मोडून फेकून देईन.’’ तो बलदंड महाकायी म्हणाला.

हे ऐकताच कांही पहारेकर्‍यांनी त्याच्याकडे पाहिले. त्या महाकायीने कातडे पांघरले होते. डोळे निखार्‍यांसारखे वाटत होते. डोक्यावर दोन वळलेली शिंगे होती आणि हातांत मोठी कांटेरी गदा होती. ‘‘हा माणूस नाही, राक्षस आहे. याच्यासमोर राज्याच्या सैन्याचाही टिकाव लागणार नाही. मग आपण कांही बोललो, तर तो आपल्याला कच्चाच खाऊन टाकेल. त्याला जायचे तिकडे जाऊं दे’’ एक पहारेकरी म्हणाला.
‘‘राक्षस महाराज! आपण कोणत्या लोकांतून आला आहात ते आम्हाला माहीत नाही. शहरांतील पाहिजे त्याला टाका. खाऊन टाक. परंतु राजमार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रेषांच्या घरांतल्यांना कांही करू नका. त्या घरांत माझी बायकोमुले आहेत. एवढी दया करा, महाराज!’’ दुसर्‍या एका पहारेकर्‍याने विनंती केली. राक्षस गडगडाटी हंसला. ‘‘अरे मूर्खा, मी दुसर्‍या एखाद्या लोकातील माणसांना खायला आलेला राक्षस नाही. मी इथलाच आहे, दण्डकारण्यातील! मी तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेलो नाही. आणि तुम्हाला खाण्याकरिताही आलेलो नाही. 
‘‘मी फक्त इथल्या राजकुमारीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आमच्या राजाला माणसांशी संबंध जोडायचा आहे. तुमची राजकुमारी खूपच सुंदर आहे म्हणे! मी तिला घेऊन जाण्यासाठी राजवाड्यांत निघालो आहे. माझ्या वाटेत आडवे आलात, तर तुमची व तुमच्या बायकामुलांची कांही धडगत नाही’’ असे म्हणून राक्षस मुकाट्याने राजवाड्याच्या दिशेने निघून गेला.
राजमहालाच्या मुख्य दरवाज्यापाशी दोन पाहारेकरी पहारा देत होते. आणखी चारपांचजण जवळच बसून गप्पा मारत होते. त्यांच्या समोरच्या झाडाच्या छायेंत राक्षस कांही वेळ थांबला. मग तो दाराच्या दिशेने निघाला. पण अचानक मधेच थांबला. थोड्या दूरवरच्या दाट झाडीकडे गेला. तिथून राजभवनाच्या खिडकीपाशी गेला व त्यांतून आंत उडी मारूं लागला. ती उडी मारताना त्याचा एक पाय भिंतीला लागला व भिंतीचा कांही भाग धाडकन खाली पडला. खूप जोरांत आवाज आला.

लगेच महालात खळबळ माजली. ‘‘शत्रूसैन्य, शत्रूसैन्य’’ असे कांहीजण ओरडू लागले. कांहीजण ‘‘भूकंप, भूकंप’’, म्हणून ओरडू लागले. राजवाड्यांतील सर्वजण पळत बाहेर आले. ढासळलेली भिंत पाहून ते आश्चर्यचकितच झाले.

राजकुमारी क्रांतीसेना हलकल्लोळाच्या आवाजाने उठली. ती आपल्या महालातून बाहेर आली व छोट्या भिंतीला धरून खाली पाहू लागली. तिच्या दोन मैत्रिणी तिच्याजवळ आल्या. ‘‘केवढा आवाज आला! सर्वजण म्हणताहेत, भूकंप झाला’’ असे म्हणून विस्फारलेल्या डोळ्यांनी हात हालवून तिने ढासळलेली भिंत त्यांना दाखवली. राक्षस मुकाट्याने जिना चढून वरच्या मजल्यावर राजकुमारीच्या दालनाकडे जाऊ लागला. वाटेत त्याला एकही नोकरचाकर दिसला नाही. ते सर्वजण मशाली घेऊन भिंतीकडे गेले होते.
तो जिना चढून जात असताना त्याच्या डोक्याची सांवली राजकुमारीजवळ पडली. तिच्या मैत्रिणी घाबरल्या. ही सांवली आकाशांतून तर पडली नाही? या विचाराने त्या आकाशाच्या दिशेने पाहू लागल्या. इतक्यांत राक्षस जिना चढून वर आला व हळू आवाजांत म्हणाला, ‘‘मी तुमच्यापैकी कोणालाही इजा पोचवणार नाही. तरीही कोणाला बेशुद्ध व्हायचे असल्यास होऊ शकता. पण तुम्ही कोणी आवाज केलात तर मात्र तुमचा जीव घेईन.’’
राजकुमारी घाबरून बेशुद्ध झाली. पण मैत्रिणींनी तिला सावरून धरले. राक्षस त्यांच्याजवळ आला. त्याने क्रांतीसेनेला अलगद उचलले व खांद्यावर टाकले. राजकुमारीच्या मैत्रिणींच्या सौंदर्यानेही तो मोहित झाला. स्वतःच्या राज्यातील तरुणांसाठी त्याने त्यांनाही घेऊन जायचा विचार केला.
म्हणून तो तिच्या मैत्रिणींना म्हणाला, ‘‘तुम्ही राजकुमारीच्या सौंदर्याच्या तुलनेत अजिबात कमी नाही आहात. माझ्याबरोबर येता का? आमच्या शूर, साहसी तरुणांशी लग्न करा आणि राजकुमारीबरोबरच तुम्हीही सुखी व आरामाचे जीवन जगा. आमच्या राज्यात स्वर्गापेक्षांही जास्त सुख व आनंद लाभेल. मला तुम्ही पाहिले आहेच की! माझ्याएवढेच सर्वजण सुंदर आहेत.’’

हे ऐकताच एकाचवेळी मैत्रिणीही बेशुद्ध झाल्या. क्रांतिसेनेला घेऊन राक्षस जिना उतरला. ही भिंत कुठून ओलांडावी, या विचारात तो असतानाच राजाचा एक सेवक तिथे आला. आणि राक्षसाला बघून ओरडला, ‘‘राक्षस राजकुमारीला पळवून नेतो आहे.’’

राक्षस चटकन बागेकडे पळाला व तिथल्या झाडांखाली उभा राहिला. राजाच्या एकाही सेवकाला मारायची त्याची इच्छा नव्हती. त्याला फक्त राजकुमारीला सुखरूपपणे पळवून न्यायचे होते. म्हणून तो तलवार, मशाली घेऊन येणार्‍या लोकांच्या दिशेने गेला नाही. त्याने पटकन भिंत ओलांडली व तो नगराच्या प्रवेशद्वाराकडे जाऊ लागला. तोपर्यंत राजा उग्रसेन आणि मंत्री दोघेही उठून राजवाड्याच्या गच्चीत आले होते. पळणार्‍या राक्षसाच्या खांद्यावर आपली मुलगी असल्याचे उग्रसेनाने पाहिले. कांही सैनिकांनी राक्षसावर नेम धरून बाण सोडले. त्यापैकी एकदोन त्याला लागलेही, परंतु त्याने तिकडे लक्ष दिले नाही. शिलाखंडासारख्या त्याच्या प्रचंड शरीराला ते बाण फक्त सुईसारखे टोचले व त्याने ते काढून फेकून दिले. बाणांनी त्याला कांहीही दुखापत झाली नाही. तो भर्रकन पुढे गेला व प्रवेशद्वार ओलांडून जंगलात नाहीसा झाला.
‘‘किल्ल्यांतील बुरुजांवरून अग्निबाण सोडून तो जंगलातून कुठे निघाला आहे, हे शोधून काढा. तोपर्यंत घोडेस्वारांना त्याच्या मागावर पाठवा. राक्षसाला मारण्याकरिता मी स्वतःच येतो आहे.’’ उग्रसेन जोरात ओरडला. ताबडतोब सैनिक बाणांना मशाली गुंडाळून जंगलाच्या दिशेने सोडूं लागले. घोडेस्वार नगराचे प्रवेशद्वार ओलांडून राक्षसाचा पाठलाग करूं लागले.         (क्रमशः) No comments:

Post a Comment