Thursday, 7 February 2013

व्याजाच्या नाण्यांचे झाड

निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. त्याने झाडावरुन शव खाली उतरवले आणि खांद्यावर घेतले, व तो निमूटपणे स्मशानाच्या दिशेने चालायला लागला. तेव्हां प्रेताच्या आंत लपलेल्या वेताळाने त्याला विचारले, ‘‘राजन्, तुला या प्रयत्नांत जरा तरी यश मिळतंय कां ते सांग! लक्ष्य साधण्यासाठी तुझा प्रयत्न कौतुकास्पद आहे, परंतु त्याचा उपयोग काय? जगांत कांही माणसांचे वर्तन अगदी विचित्र नि गूढ असते. असली माणसें परोपकार करीत असल्याचे ढोंग करतात, आणि आपल्या नातेवाईकांत भांडणें लावतात, द्वेष निर्माण करतात. अशा प्रकारच्या एखाद्या माणसाने तुला प्रोत्साहन दिले असेल, म्हणून हे काम करायला तू तयार झालास.
तुला सावध करण्यासाठी मी तुला जडनाथ नांवाच्या एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे. लक्ष देऊन ऐक.’’ आणि वेताळाने पुढील गोष्ट सांगितली. भद्रपुरांत मणिदीप नांवाचा एक धनवंत राहात होता. त्याची पत्नी वेदवती ही देखील संपन्न परिवारांतून आलेली होती. दोघेही सुस्वभावी व दिलदार होते. जे कुणी मदत मागायला येत, त्यांना मणिदीप भरपूर सहाय्य करीत असे. घरी येणार्‍या प्रत्येकाचे वेदवती आईच्या मायेने आदरातिथ्य करीत असे.
सांचलेली संपत्ती बसून खाल्ली तर संपायला लागते असं म्हणतात. आता मणिदीपचा एकुलता एक मुलगा गुणदीप मोठा झाला होता. त्याच्यासाठी वडिलोपार्जित घराखेरीज बाकी कांहीही उरलं नाही. आणि खरं सांगायचं तर घरी काय चाललंय हे गुणदीपला ठाऊकच नव्हतं. जडनाथ नांवाच्या एका मित्राबरोबर वैद्यकीचा अभ्यास शिकण्यासाठी तो सुदूर प्रांतात गेला होता. आपल्या मुलाचाच नव्हे, तर जडनाथच्या वैद्यकी शिक्षणाचा सारा खर्च मणिदीप करीत होता. जेव्हां विद्याभ्यास संपवून गुणदीप घरी परतला, तेव्हां घरांतल्या परिस्थितीची त्याला खरी कल्पना आली.
‘‘पूर्वजांनी दिलेली संपत्ती तुम्ही खर्च करुन टाकलीत, आणि माझ्या हातांत आता फक्त करवंटी शिल्लक उरलीय असं दिसतंय. आता या अशा अवस्थेंत मी काय करावं तेच मला समजत नाही.’’ गुणदीपने संतापून पित्याला सांगितलं. ‘‘पोरा, संपत्ती कधी स्थिर नसते. आपला चांगुलपणाच आपले रक्षण करीत असतो. तुझ्या वडिलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला मी दुजोरा दिलेला आहे. जर तुला ही चूक वाटत असेल तर ही चूक आम्हा दोघांची आहे. अजूनही कांही आपण दुसर्‍यांच्यावर अवलंबून राहाणार नाही.
राहायला हक्काचे घर आहे. तू जर वैद्यकीचा व्यवसाय सुरुं केलास तर तू ही रग्गड पैसा मिळवूं शकशील.’’ असं म्हणून वेदवतीने मुलाची समजून घालण्याचा प्रयत्न केला.
गुणदीपने वैद्यकीला सुरवात केली. त्यांतून थोडीफार कमाई सुरुं झाली, पण त्यावर तो संतुष्ट नव्हता. आणि त्याचं कारण होतं जडनाथ! वर्षभरांतच जडनाथचे उत्पन्न खूप वाढले, व दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढत चालली. इतका चांगला वैद्य आजपर्यंत पाहिला नव्हता असं लोक आपसांत बोलायला लागले. त्याच्या औषधांत संजीवनी होती असं म्हणायला लागले.
दूरदूरच्या प्रांतांतून तपासणी करुन घ्यायला लोक जडनाथकडे येऊं लागले. साहजिकच, संपत्तीचा ओघ वाढायला लागला. ‘‘तुमच्याच पैशावर जडनाथ वैद्यकी शिकला आणि आता तो तुमच्या मुलाचा प्रतिस्पर्धी बनला आहे. तुमच्यामुळेंच माझी संपत्ती गेली आणि माझा व्यवसायही निरर्थक ठरायला लागला.’’ गुणदीप आपल्या वडिलांवर आरोप करीत राहिला.
‘‘अरे बाळ, तुझीही कमाई कांही कमी नाही. वैद्यकीच्या वृत्तींत सेवा ही महत्वाची असते. तुझ्याकडून जमेल तितकी लोकांची सेवा कर, त्यांच्या उपयोगी पडत राहा. तेव्हां लोक तुला मान देतील, तुला मोठेपणा देतील. जे आपल्या-जवळ नाही असं तुला वाटतं ना, ते म्हणजे एक भ्रामक कल्पना आहे.’’ मणिदीपने देखील गुणदीपला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची नजर फक्त कमाईवरच होती, आणि ती तर कांही केल्या जास्ती वाढत नव्हती.
ही गोष्ट त्या शहरांतला तांदळाचा व्यापार करणारा व्यापारी महासेन याला कळली. रत्नमाला ही त्याची एकुलती एक मुलगी होती. महासेनला मुलगा नव्हता, म्हणून तो रत्नमालेसाठी चांगला नवरामुलगा बघतच होता. तिचे लग्न करुन देऊन जांवयाला घरींच राहायला बोलवावे व आपला व्यापार त्याच्या स्वाधीन करावा असे महासेनला वाटत होते. तो गुणदीपला भेटून म्हणाला, ‘‘मुला, तुझ्या परिवाराबद्दल मला संपूर्ण माहिती आहे. तुझ्या पूर्वजांनी बराच दानधर्म केलेला आहे. तुमचा परिवार नेहमीच संपन्न होता. लक्ष्मीदेवीची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर होती. पण तुझे आईवडील अभागी ठरले. तू जर त्यांच्याजवळच राहिलास तर तुमची परिस्थिती कांही सुधारणार नाही. उलट ती जास्तच बिघडत जाईल. तू माझ्या मुलीशी लग्न कर, आणि घरजांवई म्हणून माझ्या घरीं राहायला ये. तुझ्या आईला नि वडिलांना मात्र आपल्याजवळ फिरकूं देऊं नकोस,’’ असं सांगून त्याने गुणदीपचे कान भरले. महासेनच्या मानभावीपणाचा गुणदीपवर बराच परिणाम झाला. शिवाय सुंदर रत्नमालेला बघितल्यानंतर तो तर फारच भारल्यासारखा झाला.
गुणदीपचे रत्नमालाशी लग्न झाले आणि तो सासरी राहायला गेला. या काळांत जडनाथला मणिदीपच्या वाईट परिस्थितीबद्दल समजले तो त्यांना भेटायला गेला तेव्हां त्या दोघांनी त्याला सांगितले, ‘‘आम्ही अगदी सुखांत आहोत. आमचा मुलगा म्हणत होता कीं आम्हीदेखील त्याच्याबरोबरच राहावे, पण आम्हाला कांही त्याच्या सासुरवाडी राहाणें आवडले नसते. मरेपर्यंत याच घरांत राहावे अशी आमची इच्छा आहे. आणखी कुठे जाण्याची इच्छाच उरली नाही आता!’’
कांही क्षण जडनाथ गप्प बसला होता. नंतर तो म्हणाला, ‘‘इथें येण्यांत माझाही थोडा स्वार्थ आहे. तुमच्या घराच्या मागीलदारी एक झाड आहे. त्याचं नांव कुणालाच माहीत नाही. पण त्या झाडाच्या फळांपासून एक अद्भुत औषधी बनवता येते. हे रहस्य मला नुकतेच माहीत झाले. या झाडाला बारा महिने फळें येत असतात. एकेका फळाची किंमत दहादहा मोहोरा होईल. पण इतकी रक्कम द्यायची कांही माझी शक्ती नाही. आपण रोज एक फळ मला द्या, त्याबदली मी तुम्हाला रोज एक सोन्याची मोहोर देत जाईन. पण त्यासाठी आपण मला लेखी करार लिहून दिला पाहिजे, आणि त्या करारानुसार ही फुळें आपण इतर कुणालाही विकणार नाही अशी लेखी हमी हवी.’’
मणिदीप विचारांत पडला. नंतर भानावर येऊन म्हणाला, ‘‘तू सांगितले नव्हतेस तोपर्यंत या झाडाचे महत्व आम्हाला मुळीच ठाऊक नव्हते. तू सांगतोस त्या किंमतीला मी तुला फळें देत जाईन. पण हे लेखी स्वरुपांत तू कां मागतो आहेस हे मात्र मला समजत नाही!
‘‘नाही, त्याचं काय आहे कीं या फळांचं महत्व जर इतर लोकांना कळले तर तो मोठाच धोका होईल. अनेकजण ही फळें खरेदी करायला येतील. आपल्यावर त्यासाठी दडपण आणतील. जर त्या फळांचा उपयोग एका विशिष्ट पद्धतीने केला तर त्यांत संजीवनीसारखे औषध तयार होऊं शकेल. जर आणखी इतर पद्धती वापरल्या तर ते औषध विषारी होऊं शकेल, प्राणघातक ठरुं शकेल. माझ्यासारख्याच्या हातांत हे औषध आले तर त्याचा दुरुपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही मला हा अधिकार लेखी स्वरुपांत दिलात तर इतर कुणीही तुमच्यावर दडपण आणूं शकणार नाही.’’ जडनाथने त्यांना समजावून सांगितले.
मणिदीपने त्याप्रमाणें हा अधिकार जडनाथला करारपत्रकावर लिहून दिला. त्या दिवसापासून मणिदीपच्या परिस्थितींत बदल झाला. तो आता आरामांत राहूं लागला व जमेल तशी इतरांना मदतदेखील करुं लागला. आपल्या वडिलांची परिस्थिती सुधारली आहे हे गुणदीपला समजलं, पण त्याचं कारण मात्र त्याला उमगलं नाही. गुणदीप वडिलांना भेटायला आला. त्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल त्याने खोदून चौकशी केली. मग मात्र मणिदीपला मागील दारच्या झाडासंबंधी सांगावे लागले.
ते रहस्य कळल्याबरोबर गुणदीप धावतच त्या झाडाजवळ गेला. झाडाला लागलेली असंख्य फळें पाहून तो उर बडवीत पित्याला सांगू लागला, ‘‘या झाडाचे रहस्य तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेत. मला चिरल्याशिवाय या फळांचे हक्क तुम्ही लेखी लिहून दुसर्‍याच्या स्वाधीन केलेत. हा फार मोठा अन्याय आहे. माझा वांटा मिळवण्यासाठी मी आता वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याची तक्रार करीन.’’
मणिदीपला हे आवडले नाही. म्हणून त्याने जडनाथला ही बातमी कळवली. सर्व बातमी समजल्यानंतर जडनाथ म्हणाला, ‘‘गुणदीपच्या तक्रारींत तथ्य आहे. त्याला मी एक उपाय सुचवतो. या झाडाची मी चार हजार फळें घेऊन जातो. त्याची किंमत म्हणून रोज एका मोहोरेच्या हिशेबाने पुढची अकरा वर्षें आपल्याला मला रोज एक मोहोर द्यावी लागेल. जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत मी रोज एक मोहोर देत राहीन. आजपासून या झाडावर गुणदीपचाच अधिकार राहील.’’ मणिदीपला त्याने उपाय सुचवला.
गुणदीपला हा प्रस्ताव आवडला. त्यानंतर ती फळें विकण्यासाठी गुणदीपने प्रयत्न केले. पण वैद्यांनी स्वच्छ सांगितले, कीं त्या फळांमधे औषधी गुण मुळींच नाहीत. हे ऐकून गुणदीप निराश झाला. त्याच्या आशेवर पाणी पडले. तो जडनाथला भेटला व म्हणाला, ‘‘तुला जी किंमत द्यायची असेल ती देऊन ही सगळी फळें तूच घेऊन टाक.’’
जडनाथ हंसून म्हणाला, ‘‘ही निरुपयोगी फळें घेऊन मी काय करुं?’’ ‘‘ही फळें निरुपयोगी आहेत? अरे, तूच तर प्रत्येक फळाला एकेक सोन्याची मोहोर द्यायची असा करार केला आहेस ना?’’ गुणदीपने आश्चर्याने विचारले. ‘‘तुझ्या वडिलांकडून ती फळें घेतली तरच ती किंमती होतात. तुझ्या मागील दारचे हे झाड व्याजाच्या नाण्यांचे झाड आहे. तुझ्या वडिलांनी जे उपकार केले आहेत, ती पुंजी आहे आणि त्या पुंजीवरच्या व्याजाची ही फळें आहेत.’’ जडनाथने सांगितलं.
त्याचे हे भेदक शब्द ऐकून गुणदीपचा चेहरा उतरला. खाली मान घालून तो तिथून निघून गेला. ही गोष्ट सांगून वेताळाने विचारले, ‘‘राजन, जेव्हां वैद्यकीचे शिक्षणपूर्ण करुन जडनाथ परत आला, तेव्हांपासून मणिदीपच्या परिवाराशी त्याचे वागणें विचित्र नि संदिग्ध होते, हे स्पष्ट दिसून येते. त्याचा सहाध्यायी गुणदीप आपल्या  आईवडिलांच्यावर नाराज होता, त्यांच्याबद्दल त्याच्या मनांत आदर नव्हता आणि त्याला त्या दोघांपासून दूर राहायचे होते हे जडदीपला समजले होते.
तरीसुद्धां त्याने गुणदीपला सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. वैद्यकीच्या व्यवसायांत त्याला भरपूर कमाई होऊं लागली, आणि म्हणून त्या झाडाच्या आडून तो आपली करमणूक करीत होता. ज्या धर्मात्म्याच्या मदतीमुळेंच तो इतका मोठा वैद्य होऊं शकला, त्याच्याबाबतीत जडनाथने अन्याय केला व त्याचा अवमान केला. हा त्याचा कृतघ्नपणा नाही कां? माझ्या या शंकांचं समाधानकारक उत्तर तुला माहीत असूनही जर तू मौन पाळलेस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलें होऊन पडतील.’’
विक्रमार्कने उत्तर दिले, ‘‘जडनाथच्या व्यवहारांत कोणताही विचित्रपणा नाही किंवा त्याचे वागणें संदिग्धही नाही. उलट त्याचे धोरण चांगले होते. जिथें मानसिक आणि आर्थिक विचारसरणींत फरक असतो त्या लोकांशी कसे बागावे हे त्याला चांगले ठाऊक होते. त्यांच्या विचारांशी सुसंगत असेच वागावे लागते. निर्मळ मनाच्या मातापित्यांना जरी त्यांच्या मुलांनी अनादराने व तिरस्काराने वागवले, तरी ते इतरांसमोर आपल्या मुलांचा पाणउतारा करीत नाहीत. म्हणून मणिदीपने जडनाथला सांगितलं, ‘‘आमचा मुलगा सारखा म्हणत असतो कीं आम्ही त्याच्याबरोबर राहावे! पण त्याच्यावर आमचा भार टाकणें हे आम्हाला आवडणार नाही.’’ अशा परिस्थितींत जडनाथ काय करणार?
आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जडनाथने झाडाच्या फळांच्या आडून त्याला मदत केली. जेव्हां गुणदीपने म्हटलं कीं जी किंमत देतोस ती देऊन ही सारी फळें तू घे, तेव्हां जडनाथने काय उत्तर दिलं होतं? तो म्हणाला होता, ‘‘तुझ्या वडिलांकडून घेतली तरच या फळांची किंमत आहे. नाहीतर त्यांचे कांहीच मूल्य नाही.’’ त्याचे हे सूचक बोलणें गुणदीपला समजले. आपल्या आईवडिलांचा परोपकार किती मूल्यवान आणि महत्वपूर्ण आहे याचीही त्याला जाणीव झाली. राजाचे मौनभंग करण्यांत सफल झालेला वेताळ पुन्हां शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला. (सुभद्रादेवींच्या रचनेवरुन)


No comments:

Post a Comment