

ते आचारी हंसायला लागले, ‘‘अरे, तू अगदी भोजनभाऊ दिसतोस कीं रे! आम्ही तुझी ही इच्छा कांही पूर्ण करूं शकणार नाही. कारण आम्हाला इतकी मोठी कामें रोजरोज मिळत नाहीत. जी मिळतात तिथें आमच्यापैकीं एकदोघेजण जाऊन ते काम करतात. आणि वरकामासाठी जी माणसें ठेवतात ना, त्यांची जिम्मेदारी असते नवरा किंवा नवरीच्या आईवडिलांची! असं रोज चारी ठाव जेवण जेवायची तुला इच्छा आहे खरी, पण त्याच्या-साठीं एखाद्या बड्या घरांत तू जन्म घ्यायला हवा होतास!’’
जेव्हां पुष्करने प्रथमच ऐकलं की बड्या श्रीमंत घरांतून रोजच असं चमचमीत जेवण असतं, तेव्हां तो आश्चर्याने थक्क झाला. त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहून त्या आचार्यांनी विचारले, ‘‘अजूनपर्यंत तू कुणा मोठ्या धनिकाच्या घरीं काम केलंच नाहीस कां? ते लोक घरांतदेखील रेशमी कपडे वापरतात, मऊ मुलायम बिछान्यावर झोंपतात, सारी सुखें त्यांना उपभोगायला मिळतात.’’ त्यांनी पुष्करला उदाहरणें देऊन अनेक गोष्टी सांगितल्या.

त्याच्या बोण्यावर साधू हंसतहंसत म्हणाला, ‘‘अरे बाळा, प्रत्येक वृक्ष आपल्या ठिकाणीं स्थिर उभा असतो आणि गोड फळें देतो. नदी ही जीवनदात्री आई असते. ती खळाळत सार्या देशभर हिंडते आणि लोकांना प्यायला गोड पाणी देते. या सृष्टीमधें प्रत्येकाचा ढंग वेगवेगळा असतो. कमी वा जास्ती असेल. पण तुला जे सुख वाटतंय ना, ते सुख नव्हे! जे तुला कष्ट वाटत आहेत, ते कष्टही नव्हेत. परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे. या संसारात कष्टाशिवाय कुणालाही कांहीही मिळत नसतं, आणि त्याचं पोट भरतही नसतं. ही सारी परमेश्वराची लीला आहे.’’
परंतु या उपदेशाचा पुष्करवर कांहीच परिणाम झाला नाही. त्याने गयावया करत साधूला विनंती केली कीं त्याला श्रीमंत घरांतच राहायचंय म्हणून पुढचा जन्म श्रीमंताघरी व्हावा. तेव्हां साधूने त्याला एक औषधी मुळी दिली आणि म्हटले, ‘‘शेजारच्या गांवातच विलास नांवाचा एक धनवंत आहे. दोन वर्षांपूर्वीं त्याची पत्नी वारली. त्याचे दोन्ही मुलगा व्यापाराच्या निमित्ताने परदेशी गेले आहेत. त्याची एक नातेवाईक बहीण त्याचे घर सांभाळते. तू त्याच्याकडे जा. तुम्ही दोघांनी एकाच वेळेला ही मुळी हातांत धरलीत आणि एकमेकांच्या शरीरांत प्रवेश करायची इच्छा धरलीत कीं तुमची इच्छा पूर्ण होईल. याला परकायाप्रवेश म्हणतात. दोघांच्या शरीराची अदलाबदल होईल.’’
‘‘स्वामीजी, आपण म्हणता कीं विलास धनाढ्य आहेत, व भाग्यवान आहेत. माझ्या शरीरांत प्रवेश करायला ते राजी होतील?’’ पुष्करने आपली शंका व्यक्त केली.
‘‘जरुर राजी होतील. गेली कांही वर्षें तो तुझ्यासारख्या माणसाच्या शोधांत आहे. पण हे ठरवण्यापूर्वीं पूर्णपणें विचार कर. तू तरुण आहेस. तो वयस्कर आहे. या परकाया प्रवेशाचा प्रयोग करायचा म्हणजे तू तुझे वय त्याच्या स्वाधीन करतो आहेस.’’ साधूने त्याला सावध करीत म्हटले.

तरी पुष्करवर त्या बोलण्याचा कांहीच परिणाम झाला नाही. दुसर्याच दिवशी तो विलासला भेटायला त्याच्या गांवी गेला. त्याला भेटून पुष्करने आपला मनोदय सांगितला. विलासने खूष होऊन म्हटलं, ‘‘मी तर तुझ्यासारख्या माणसाचीच वाट पहातो आहे. आत्तापासून माझं शरीर हे तुझं आहे आणि तुझं शरीर माझं! जोपर्यंत तुला वाटेल तोपर्यंत आपण असेच राहूं.’’
त्यानंतर त्या औषधी मुळीच्या साहाय्याने त्यांनी एकमेकांच्या शरीरांत प्रवेश केला. परकाया प्रवेश झाला. तेव्हांपासून पुष्कर त्या घराचा मालक झाला आणि विलास त्याचा नोकर बनला. शरीरांत परिवर्तन झाल्यानंतर पुष्करला उत्साहाचे भरते आले. मिठाई खायची तीव्र इच्छा त्याला झाली. त्याने विलासच्या बहिणीला बोलावून सांगितले, ‘‘ताई, आज मिठाई बनवा.’’
तिने आचार्यांकडून वीस लाडू बनवले आणि पुष्करमधल्या विलासच्यासमोर ठेवून त्याला म्हटले, ‘‘अरे पुष्कर, ज्या दिवसापासून तू इथें कामाला लागला आहेस, त्या दिवसापासून तुझे नशीब उजळले आहे बघ. तुला जितके लाडू खायचे असतील तितके खा. पण ते मालकांच्यासमोर खायचे हे लक्षांत ठेव. कारण कांही महिने एका आजारामुळें ते बेचैन आहेत. त्या आजाराचे अद्याप निदान होत नाही. जे त्यांना खाता येत नाही, ते नोकरांनी त्यांच्यासमोर खाल्लं कीं त्यांना उलट फार आनंद वाटतो.’’
पुष्करच्या शरीरांतल्या विलासने चार लाडू खाल्ले आणि तो म्हणायला लागला, ‘‘बा वा, अशी मिठाई कित्येक वर्षांत खाल्ली नव्हती.’’ विलासच्या शरीरांतल्या पुष्कर पुटपुटला, ‘‘ज्या शरीरांत मी परकाया प्रवेश केला आहे, ते शरीर भले कितीही रोगांची शिकार असले तरी लाडू खाल्ल्याशिवाय मी कांही राहाणार नाही.’’ आणि त्याने दोन लाडू मटकावले. विलासची बहीण त्याला थांबवत म्हणाली, ‘‘अरे दादा, हे काय केलंस तू? आता झालं ते झालं - आता नदीच्या कांठापर्यंत भराभरा पायी चालत जाऊन परत ये.

दोघेही नदीकिनार्यापर्यंत भराभरा चालत गेले व परतले. त्यावेळीं विलासच्या रोगग्रस्त शरीरांतल्या पुष्करला एकामागून एक कटकटी निर्माण होऊं लागल्या. यापूर्वीं भरपूर मेहनत करुनही पोटभरण्याइतके मिळत नव्हते. आता हवे ते खायला मिळण्यासारखे असून ते पचवण्यासाठी त्याच्याजवळ एकमात्र उपाय शिल्लक होता. ते होता व्यायाम. म्हणून तो दररोज निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करायला लागला. कांही महिने नियमितपणें व्यायाम केल्यानंतर पुष्करच्या शरीरांतले रोग कमी होऊं लागले.
तिकडे पुष्करच्या शरीरांत राहणार्या विलासलाही अनेक समस्यांशी सामना करावा लागला. शरीरांत ताकद असूनही नोकराचे काम करण्यांत त्याला जराही इच्छा नव्हती. नुसतं बसून खावं असंच त्याला वाटायचं. जसे दिवस जात होते, तसा विलासच्या शरीरांतला पुष्कर विलासवर जास्त काम लादूं लागला व त्याच्याकडून कामें करवून घेऊं लागला. एक दिवस पुष्करमधल्या विलासने कळवळून म्हटले, ‘‘माझ्यामुळें तू मालक झाला आहेस. म्हणून तू कृतज्ञता म्हणून तरी माझ्याशी आदराने वागायला हवंस. घरकामाला आणखी एखादा नोकर ठेव. मला आराम करुं दे कीं!’’
पुष्करने त्याची मागणी झिडकारत म्हटले, ‘‘मी जसं सांगीन, तशी कामें करीत राहा. नाहीतर आपण पुन्हां आपल्या शरीरांची अदलाबदल करुन टाकूं आणि हवं तसं जीवन जगूं!’’ घरांतली कामें करण्यांत त्रास जरूर होता, पण पुष्करचे शरीर तरुण असल्यामुळें विलासला ते शरीर इतक्या लौकर सोडायची इच्छा नव्हती.
एक वर्ष उलटले. एक दिवस ह्या दोघांना भेटायला तो साधू आला. दोघांनीही त्याला आदराने वंदन केले आणि आपापले अनुभव सांगितले. तेव्हां साधूने पुष्करला म्हटले, ‘‘एक वर्षभर तू विलासच्या शरीरांत राहिलास. संपत्ती जे जे सुख देते, ते सर्व तू अनुभवलंस. आता विलासचं शरीर सोडून दे आणि पुन्हां तुझ्या शरीरांत प्रवेश कर.’’ पुष्कर लगेच म्हणाला, ‘‘मी याला तयार आहे. पण माझी एक अट आहे. त्यानंतर मात्र विलासने मला त्याच्या घरीं नोकर म्हणून ठेवलं पाहिजे.’’
त्यावर विलासने नाराजीने म्हटलं, ‘‘स्वामीजी, मी ह्याला जरुर माझ्याकडे नोकर म्हणून ठेवला असता, पण सध्यां माझ्या शरीरांत असलेला जो पुष्कर आहे, तो कृतघ्न आहे. मी घराचा मालक होतो, तरीसुद्धां ह्याने माझ्याकडून सर्व प्रकारची कामें करवून घेतली, अनेक प्रकारांनी याने मला त्रास दिला आहे. अशा कृतघ्न माणसाला मी कशासाठी माझ्या घरांत ठेवूं? ते न्यायाचं कसं होईल?’’
तेव्हां साधू जरा कठोर स्वरांत म्हणाला, ‘‘ते अगदी योग्य व उचित न्यायाचं होईल. एकमेकांमुळें तुमच्या शारिरीक व मानसिक दोषांतून तुम्ही मुक्त झाला आहात. पुष्कर मुळींच कृतघ्न नाही.’’ असं म्हणून साधूने त्या औषधी मुळीच्या साहाय्याने त्या दोघांना पुन्हां आपापल्या शरीरांत प्रवेश करुन दिला आणि त्यांना आशिर्वाद देऊन तो निघून गेला.
ही गोष्ट सांगून वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन्, साधूच्या बोलण्यामधें ना कांही न्याय, ना कांही नैतिक मूल्य! पुष्करला कृतघ्न नाही म्हणणे हे अयोग्य व चूक नाही कां ठरत? पुष्कर व विलास यांच्यामधे जी खरी समस्या उभी होती, ती सोडून, साधूने आपल्या चतुर वाणीने या समस्येला वेगळेच स्वरुप दिले, आणि निराकरण केले. माझ्या शंकेचे उत्तर माहीत असूनदेखील जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याची अनेक शकले होतील हे लक्षांत ठेव.’’
विक्रमार्क म्हणाला, ‘‘साधू केवळ महान शक्तींचा पूजक होता असे नव्हे, तर मानवी स्वभावाचा उत्तम ज्ञाता ही होता. त्याने पुष्करला कृतघ्न ठरवले नाही, कारण वयस्कर विलासच्या शरीरांत प्रवेश केल्यानंतरच त्याच्या लक्षांत आले कीं ऐषारामी जीवन शैलीमुळें विलास अनेक रोगांची शिकार बनला होता. कोणतेही लहानसे कामदेखील करायची त्याला संवय नव्हती. व्यायामापासून तो कायमच लांब राहिला. हे जेव्हां त्याला समजले तेव्हां त्याचे तरुण शरीर याच रोगाची शिकार होऊं नये म्हणून त्याने विलासला कामाला जुंपले. आपल्या शरीराबद्दल जागरुक राहण्याची व नियमितपणें व्यायाम करण्याची संवय विलासला लावली. अशा तर्हेने विलासची प्रकृति सुधारली. अप्रत्यक्षपणें विलासचे पुष्करने भलेच केले. म्हणून त्याला कृतघ्न ठरवणें चूक होते.’’ राजाचे मौनभंग झाल्यामुळें वेताळ पुन्हां शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

No comments:
Post a Comment