Thursday 7 February 2013

सिद्धेंद्राचा हितोपदेश


निश्‍चयी विक्रमार्क परत झाडाजवळ गेला. झाडावरून शव खाली ओढून त्याने ते खांद्यावर घातले व नेहमीप्रमाणे तो स्मशानाकडे झपाझप चालू लागला. तेव्हां शवांतला वेताळ बोलू लागला, ‘‘राजा, तुझ्या धैर्याची खरंच कमाल आहे. आपल्या जीवाचीसुद्धां पर्वा न करता तू हे साहस करतो आहेस. पण कां? यातून तुला काय मिळणार आहे? कां तू इतके कष्ट घेत आहेस? अखेर तू एक राजा आहेत. तुझ्याजवळ अमाप संपत्ती आहे, धन-दौलत आहे. तुझ्या यशाची कीर्ती चारी दिशांना पसरली आहे. सारी जनता तुझ्यावर अपार प्रेम करते, त्यांची तुझ्यावर श्रद्धा आहे, भक्ती आहे. कुणीही तुझ्याशी शत्रुत्व करायला धजत नाहीत.

असे आता असताना आणखी तुला आता काय हवे? कीं तू मंत्र-तंत्र शक्ती अवगत करून घेण्याच्या प्रयत्नांत आहेस? तसे असेल तर तू अतिशय सावध असायला हवेस. कारण ती विद्या अवगत करून घेऊन त्याचा उपयोग करण्यांत धोकेच येतात. धारदार तलवारीवर कसरत करण्याइतके ते अवघड आहे. सिद्धेंद्र नांवाच्या पंडिताने आपला शिष्य विजयसिंहला निक्षून सांगितले होते, कीं आपल्या स्वार्थासाठी या विद्येचा उपयोग करूं नये.
पण त्याने आपल्या स्वार्थपूर्तीसाठी या शक्तींचा उपयोग केला. परंतु दुसर्‍या एका पंडिताने विजयसिंहला पाठिंबा दिला व अशी घोषणा केली की तो स्वार्थ किंवा अधर्म होऊंच शकत नाही. त्या पंडिताने असे सांगितले की घोर परिश्रम करून ज्या विद्या आपण अवगत करून घेतो, त्यांचा उपयोग केला तर त्यांत काय चूक आहे? मी तुला उदाहरणार्थ रविवर्मा व विजयसिंह यांची गोष्ट सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. कारण त्यामुळे तुझे कल्याण होईल.’’ असे म्हणून वेताळाने गोष्ट सांगण्यास सुरवात केली.

महापंडित सिद्धेंद्र जंगलात एक गुरुकुल चालवत होता. विद्याभ्यास पूर्ण झालेल्या शिष्य-वृंदाला निरोप देण्यापूर्वी त्यांनी त्यांना सांगितले, ‘‘मला जी जी विद्या येत होती, ती ती मी तुम्हाला शिकवली आहे. पण तुम्ही सर्वांनी एक मुख्य गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. मनुष्य जी विद्या प्राप्त करून घेतो, त्यासाठी खूप परिश्रम, कष्ट, मानसिक व शारीरिक बळ एकत्र करून साध्य करून घेतो. परंतु कांही वेळा खूप कष्ट करूनही फळ मिळत नाही, किंवा जितके श्रम करतो, त्यामानाने फलप्राप्ती होत नाही. तेव्हां, अशा स्थितीतच ज्या गहन विद्या, मंत्र-शक्ती अवगत केलेल्या आहेत, त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. पण असे न करता, कसलेही प्रयत्न न करताच फलप्राप्ती व्हावी या उद्देशाने या शक्तीचा उपयोग केलात, तर तुमचे भले होणार नाही.’’
सिद्धेंद्र गुरुंचा हितोपदेश त्यांचे शिष्य रविवर्मा व विजयसिंह या दोघांनाही अतिशय योग्य वाटला. ते दोघेजण चांगले मित्र होते. दहा वर्षापासून गुरुकुलांत विद्याभ्यास करीत होते. त्या दोघांनाही सिद्धेंद्र गुरुंचे प्रेम व माया सारखीच मिळाली होती. दोघेही विद्याभ्यास करून आपल्या गांवी परत निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी गुरुना साष्टांग नमस्कार केला. आशिर्वाद देत त्यांनी एक मृदू हास्य केले त्यांतून ते सूचित करीत होते कीं सांगितलेला उपदेश लक्षांत ठेवा!

आपल्या गांवी परत जाताना वाटेत त्यांना गोपुर नांवाचे एक गांव लागले. गांवाच्या मध्यभागी एक धर्मशाळा होती, तिथे ते राहिले. जेवणानंतर ते धर्मशाळेच्या चबुतर्‍यावर बसले. तेव्हां कांही ग्रमीण लोकांच्या बोलण्यातून त्यांना समजले की त्याच दिवशी संध्याकाळी तिथे मल्लयुद्ध स्पर्धा आहेत. त्या गांवात त्रिनेत्र नांवाचा एक बलदंड इसम होता.
त्याला आपल्याला कोणीही पराभूत करूं शकत नाही म्हणून आत्मविश्‍वास व गर्व होता. गांवात जाहीर केलेले होते की त्याला जो कुणी पराभूत करेल त्याला एक हजार सोन्याच्या मोहरा ग्रमाधिकारी देईल.

ते ऐकून रविवर्मा विजयसिंहला म्हणाला, ‘‘विजय, आपण गुरुकुलांत मल्लयुद्ध शिकलोय. केवळ सोन्याच्या मोहरा मिळवण्यासाठीच नव्हे, तर या विद्येंत आपण किती पारंगत आहोत ते पाहण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेऊं या. तिकडे मी सर्वांना पराजित करीत होतो. इकडे मी स्वतः त्रिनेत्रशी मल्लयुद्ध करेन.’’
त्यावर विजयसिंह आपली बाजू मांडत म्हणाला, ‘‘मित्रा, ही संधी तू मला दे. तू श्रीमंत आहेस, तुला संपत्तीची जरूरी नाही. पण मी गरीब आहे. एक हजार सोन्याच्या मोहरा कमवायची ही सुवर्णसंधी तू मला दे.’’
रविवर्माने लगेच त्याला होकार दिला. दोघेही संध्याकाळी जिथे मल्लयुद्ध होणार होते त्या ठिकाणीं पोहोचले. तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. ग्रमाधिकारी आणि गांवातले इतर प्रमुख लोक समोर मंचकावर बसले होते. थोड्या वेळांतच मल्लयुद्ध सुरु झाले. पाहता पाहता त्रिनेत्रने अनेक मल्लयोद्ध्यांना पराजित केले.
शेवटी विजयसिंहची पाळी आली. विजयसिंहने असे प्रहार करायला सुरवात केली कीं त्रिनेत्र घाबरुन गेला. लौकरच विजयसिंहने त्रिनेत्रला जमिनीवर उलटे पाडले, आणि त्याचे दोन्हीं पाय धरून त्याला फिरवायला सुरवात केली.

लोकांनी अत्यानंदाने भरपूर टाळ्या वाजवल्या. ग्रमाधिकारीही खूष झाले, त्यांनी त्याची भरपूर प्रशंसा केली व हजार सोन्याच्या मोहरा त्याला दिल्या. दोन्हीं मित्रांनी रात्र धर्मशाळेतच घालवली व पहांटे ते तिथून निघाले. संध्याकाळ झाली तेव्हा ते एका जंगलात पोहोचले होते. दोघांनाही वाटले की अंधारात आणखी पुढे जाणे योग्य नाही. म्हणून जवळच असलेल्या एका वृक्षाच्याखाली ते झोपले.
मध्यरात्री कुणीतरी त्यांना झोपेतून जागे केले. डोळे उघडून पाहिले तर त्यांच्या समोर तीन धट्टेकट्टे, भले मोठे धटिंगण उभे होते. त्यांच्या हातांत मोठ- मोठ्या तलवारी होत्या. त्यांना पाहून न घाबरता विजयसिंह कठोर स्वरांत म्हणाला, ‘‘कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला?’’

त्यांतल्या एकाने खदाखदा हसत म्हटले, ‘‘दिसत नाही काय तुला आम्ही कोण ते? मुकाट्याने ग्रमाधिकार्‍याने दिलेल्या एक हजार सोन्याच्या मोहरा इकडे दे. नाहीतर आम्ही तुम्हा दोघांच्या चिंघड्या चिंघड्या करून टाकू.’’ तलवारीचे पाते विजयसिंहाच्या गळ्यावर धरून तो म्हणाला.

बस, विजयसिंहने एक चुटकी वाजवली आणि तलवार धरलेल्या चोराच्या गळ्यांतून रक्त वाहायला लागले आणि तो जमिनीवर उलटा पडला. ते दृश्य पाहून इतर दोघे चोर ‘‘मांत्रिक मांत्रिक!’’ म्हणून ओरडत धाबायला लागले. रविवर्माला आश्‍चर्य वाटले. त्याने विजयसिंहला विचारले, ‘‘खरं सांग, तू या चोरावर मंत्राचा उपयोग केला होतास ना?’’
हा प्रश्‍न ऐकताच विजयसिंह एकदम गांगरून गेला. तो म्हणाला, ‘‘क्षमा कर रवि, याच्यावरच नव्हे तर नेत्रवर सुद्धा मी मंत्राचा उपयोग करून कसलेही श्रम न करता स्पर्धा जिंकली.’’‘‘याचा अर्थ असा होतो की स्वार्थासाठी तू कुकर्म केलेस. गुरुजींनी सांगितलेल्या उपदेशाचे पालन तू केलं नाहीस.’’ रविवर्मा जरा रागानेच म्हणाला.

‘‘मित्रा, यांत स्वार्थ कसला? कुठल्या परिस्थितीत मंत्रशक्तींचा उपयोग केला पाहिजे या बाबतीत आपली मते एक नाहीत. आपण प्रथम आपल्या गांवी पोहोचू या. तिथे गेल्यानंतर आपले लहानपणाचे गुरू विश्‍वनाथशास्त्री यांना या विष-यावर मत विचारूंया. मला वाटते कीं ते योग्य तेच सांगतील.’’ विजय म्हणाला.
रविवर्मा कांहीच बोलला नाही. दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर दोघेही विश्‍वनाथशास्त्रींच्या आश्रमांत गेले. त्यांचा आश्रम गांवाजळून वाहणार्‍या नदीच्या किनार्‍यावर होता. त्यावेळी ते एका डेरेदार वृक्षाखाली बसून तालपत्रांचे वाचन करत होते.
रविवर्मा आणि विजयसिंहने त्यांच्या पायांना स्पर्श करून प्रणाम केला. त्यांना आशिर्वाद देत ते म्हणाले, ‘‘तुमच्या वडलांच्याकडून मला समजले कीं विद्याभ्यास करून तुम्ही परत येत आहात. सिद्धेंद्र गुरुजी ठीक आहेत ना?’’

दोघांनी सिद्धेंद्र गुरुजींची हालहवाल सांगितली आणि तसेच त्यांनी दिलेल्या हितोपदेशाविषयीही सविस्तर सांगितले. त्यावर विश्‍वनाथ शास्त्री म्हणाले, ‘‘सिद्धेंद्र गुरूजींचा हितोपदेश तुमच्या जीवनांत चिर-स्मरणीय आहे.’’ रविवर्माने लगेच म्हटले, ‘‘गुरुजी, परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की गुरुकुल सोडल्याबरोबर विजयसिंह हितोपदेश विसरला.’’

विश्‍वनाथ शास्त्री चकित झाले व विजयसिंहला निरखून पाहू लागले. विजयसिंह म्हणाला, ‘‘रविवर्मा, तुला जे सांगायचे आहे, ते तूच सांग.’’ रविवर्मा म्हणाला, ‘‘स्वार्थाने प्रेरित होऊन विजयसिंहने मल्लयोद्धा त्रिनेत्रवर आणि चोरावरही मंत्रशक्तीचा उपयोग केला. असे करण्यांत त्याचा स्वार्थ व अधर्म होत नाही कां? गुरुंच्या आज्ञेचा हा भंग नव्हे कां?’’
‘रवि, मला नाही वाटत की यात विजयचा स्वार्थ आहे किंवा त्याने अयोग्य कार्य केले आहे म्हणून. नीट विचार केलास तर तुलाच सत्य काय ते कळेल.’’ वेताळाने ही गोष्ट सांगून झाल्यावर राजाला म्हटले, ‘‘राजा, विजयसिंह गुरूवचन विसरला यात शंकाच नाही. संपत्तीच्या आशेने त्याने त्रिनेत्रवर आणि नंतर चोरांवरही अवगत केलेल्या मंत्रशक्तीचा उपयोग केला. माझ्या दृष्टीने हा स्वार्थ व अथर्म आहे. पण विश्‍वनाथ शास्त्रींच्या म्हणण्यानुसार विजय स्वार्थी नाही व अधर्मीही नाही. हे योग्य आहे कां? माझ्या शंकांचे उत्तर माहित असूनही जर तू गप्प बसलास तर डोक्याचे तुकडे तुकडे होतील.’’ विक्रमार्क म्हणाला, ‘‘विजयच्या व्यवहारांत स्वार्थही नाही आणि अधर्मही नाही असे विश्‍वनाथ शास्त्री म्हणाले ते योग्यच आहे.
स्वार्थाचीसुद्धा एक सीमा आहे, एक मर्यादा आहे. मल्लयोद्धा त्रिनेत्रला आपल्या सामर्थ्याचा गर्व होता. त्याला मंत्रशक्तीने पराजित करणे म्हणजे कांही स्वार्थ नव्हे. जर तो या स्पर्धेत विजयी झाला असता तर आपल्यावर मात करणारे कुणी नाही असे त्याला वाटले असते. त्याचा गर्व दुप्पट वाढला असता, लोकांवर अन्याय व अत्याचार करण्यात त्याने मागेपुढे पाहिले नसते. स्पर्धा जिंकून विजयसिंहने लोकांवरचे संकट टाळले. त्यासाठी त्याने मंत्रशक्तिचा प्रयोग केला तर त्यांत काय चुकले?

आता चोरांच्या बाबतीत म्हणशील तर हे चोर, डाकू कुठलेही क्रूर कार्य करायला तयार असतात. खून, रक्तपात करायलादेखील ते डगमगत नाहीत. हिंसा करणे, दुसर्‍यांना वेदना देणे, हे त्यांचे रोजचे काम असते. त्याशिवाय या चोरांना संपत्ती दिल्याबरोबर ते यांना सोडून देतील याची कांही खात्री नाही. विजयबरोबरच त्याच्या मित्राचे प्राणही त्यांनी घेतले असते. हे सर्व जाणूनच विजयसिंहने मंत्रशक्तिचा उपयोग केला. आपले व आपल्या मित्राचे संरक्षण करण्यासाठी शत्रूला मारले तर त्यांत स्वार्थ आहे असे कसे म्हणता येईल?

अधर्म म्हणशील तर सर्व काळांत, सर्व परिस्थितींत, कुठलाही अपरिवर्तनीय धर्म असूंच शकत नाही. युगायुगांपासून सामाजिक परिस्थितींच्या बदलानुसार धर्मही बदलत राहिला आहे. इथे आणखी एका मुद्यावर लक्ष द्यायला हवे. रविवर्माने विजयसिंहवर आरोप केला कीं त्याने गुरुपदेशाचे पालन केले नाही, हितोपदेश तो विसरला, पण त्यावेळीं विजयसिंहाने मौन धारण केले व तो त्याला गुरूकडे घेऊन गेला.
कारण त्याला माहित होते कीं आपण कितीही समजावून सांगितले तरी रविवर्मा त्यावर विश्‍वास ठेवणार नाही व कायमचा त्याला स्वार्थी व अधर्मी समजेल. त्यामुळे धर्म-अधर्माचे सखोल ज्ञान असलेल्या विश्‍वनाथ शास्त्रींकडे त्याला तो घेऊन गेला. विजयने रविवर्मालाच घडलेला सर्व वृत्तांत कथन करायला लावला. हे सुद्धा त्याची धर्म-बुद्धीच सूचित करते.’’ राजाने मौनभंग केल्यामुळे यशस्वी वेताळ शवासह अदृश्य झाला व पुन्हां झाडावर जाऊन बसला.         
                                                                                                                                                                                                 आधार : पवनकुमारांची कथा

No comments:

Post a Comment