Thursday 7 February 2013

राजगुरुचा सल्ला


निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडावर चढला. ते प्रेत खाली उतरवून त्याने आपल्या खांद्यावर घेतले व निमूटपणें स्मशानाकडे जाण्यास सुरवात केली. प्रेतांत लपलेल्या वेताळाने म्हटले, ‘‘राजन, मी तुझा हितचिंतक आहे. तुला समजावयाचा मी अनेकवेळां प्रयत्न केला कीं तू तुझा मूल्यवान वेळ यांत व्यर्थ दवडूं नकोस. राजाची कांही प्रमुख कर्तव्ये नेमलेली असतात. ती पूर्ण करणें हा त्याचा धर्म आहे.

पण हे सारं विसरुन तू स्मशानाकडेच वळतो आहेस. हे अयोग्य नाही कां? कधीकधी मंत्र्यांच्या सल्ल्यापेक्षां राजगुरुचा विचार योग्य मानला जातो. पण कांही गुरु, राजाची विनंती टाळता आली नाही तर कांहीतरी विक्षिप्त सल्ला देऊन टाकतात. मी तुला विक्रमसिंग नांवाच्या राजाची कथा सांगणार आहे; त्याला त्याच्या राजगुरुने एक हास्यास्पद सल्ला दिला. ही गोष्ट ऐकताना तुझा थकवाही दूर होईल.’’ आणि वेताळाने गोष्ट सांगायला सुरवात केली.

‘‘त्या देशाच्या प्रजेचं मत होतं कीं राजा विक्रम सिंग एक कर्तव्यनिष्ठ धर्मात्मा आहे, म्हणून तो प्रजेवर आपल्या पुत्रापेक्षांही जास्त प्रेम करतो. परंतु त्याचा पुत्र अवक्रमसेन, त्याच म्हणणं होतं कीं पिता त्याला दत्तकपुत्राप्रमाणें वागवतो. राजाच्या हृदयांत मुलासाठी एक रतीभर देखील प्रेम नाही. पण याचं एक खास कारण होतं. जरी युवराज सगळ्या शास्त्रांत पारंगत होता, तरीही राजा रोज कांही ना कांही चूक काढून त्याला रागावत असे.


‘‘प्रत्येक माणसाकडून कांहीतरी चूक होता असतेच. आपण फक्त माझ्यांतले दोषच पाहाता, माझे गुण पाहात नाही.’’ युवराजाने राजाला सांगितले. ‘‘तू युवराज आहेस. तुझ्यांत थोडे जरी गुण असले तरी तुझी स्तुतिस्तोत्रें गाणारे अनेकजण तुला भेटतील. मी तुझा पिता आहे म्हणून तुझे दोष दाखवणें हा माझा धर्म आहे. मी तुझे गुण ओळखत नाही असं समजूं नकोस. फक्त मी जे दोष दाखवतो त्यांत खरेपणा आहे कीं नाही तेवढें तू बघ. आणि जर तो दोष खराच असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न कर.’’ विक्रमसिंगने मुलाला समजावले.
असेच दिवस जात होते. एके दिवशी विक्रमसिंग अचानक आजारी पडला. राजवैद्यांनी तपासून सांगितले कीं दोन महिन्यांची विश्रांति राजाने घेतली पाहिजे. तेव्हां राजाने युवराजाला बोलावून सांगितले, ‘‘पुत्रा, कांही काळ तुला राज्याचा कारभार सांभाळला पाहिजे.’’

‘‘मी तर रोज कांहीतरी चूक करतो! आपण अशा माणसावर कारभार सोंपवावा, कीं जो कधी चुकत नाही. त्याच्यावरच ही जबाबदारी सोंपवा!’’ युवराजाने कडवट उत्तर दिले.

‘‘बाळ, राज्याचे शासन सांभाळण्याची क्षमता तुझ्यापेक्षां जास्त इतर कुणांतही नाही. म्हणून मी तुझी निवड करतो आहे. नाहीतरी पुढेमागे हा भार तुलाच सांभाळायला हवा ना?’’ विक्रमसिंगाने त्याची समजूत घातली व त्याच्यामधले चांगले गुण व राजलक्षणें यांचाही सविस्तर खुलासा केला, कौतुक केले.
पित्याकडून ही स्तुति ऐकल्यावर युवराज आनंदाने मोहरुन गेला. तो लगेच म्हणाला, ‘‘मी जरुर हा कारभार सांभाळीन. या दोन महिन्यांत माझी कुशलता व सामर्थ्य मी सिद्ध करुन दाखवीन. जर या दोन महिन्यांत माझ्याकडून एक चूक झाली, तर मी या देशाचा राजा होणार नाही.’’ अशी प्रतिज्ञा करुन तो तिथून निघून गेला.

राजा बुचकळ्यांत पडला. त्याने राजगुरुला बोलावले. सगळी हकीकत ऐकल्यानंतर राजगुरु म्हणाले, ‘‘अवक्रमसेनचे बोलणें व त्याची वृत्ती मला आवडली. राज्याचा कारभार त्याला बिनचूक सांभाळण्याची इच्छा आहे. आपणदेखील युवराजाला त्याच्या चुका दाखवण्याचे थांबवावे.’’ ‘‘गुरुवर्य, जर युवराजाने जाणूनबुजून चुकीचे पाऊल उचलले, तर मला ते कसे सहन करता येईल?’’ राजाने आपली चिंता व्यक्त केली.

त्यावर राजगुरुंनी हंसून उत्तर दिलं, ‘‘पोहायला शिकायचं असेल तर कांठावर बसून कांही होणार नाही. पाण्यांत उतरुनच शिकायला हवं. आपण त्याची प्रतिज्ञा व अट निःसंकोचपणें मान्य करा. आपले मन शांत ठेवावे. देवाचे ध्यान आणि योगविद्या यांत लक्ष घालावें. म्हणजे आपली सहनशक्ती वाढेल.’’
राजगुरुचे सांगणे मान्य करुन राजाने युवराजावर कारभार सोंपवला. त्या दिवसापासून राजाला युवराज रोज दिवसभरातल्या कामाची माहिती देऊं लागला. त्याच्या सावधपणाची व धोरणी वागण्याची राजाने खूप प्रशंसा केली. असे दोन महिने उलटले. अवक्रमसेन एक समर्थ राजा आहे हे सर्वांना पटले. राजगुरुचा सल्ला घेऊन राजाने युवराजाला राज्याभिषेक केला.

दोन वर्षें आनंदात गेली. कारभार अतिशय योग्य तर्‍हेने चालला होता. युवराजाची स्तुति न करणारा माणूस एकही नव्हता. परंतु त्याला शंका होती कीं त्याच्याकडून कांही लहानमोठ्या उणीवा राहात असाव्यात आणि त्या त्याच्या लक्षांत येत नाहीत. आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्याने आपल्या अनुचरांना विचारलं, मंत्र्यांचा सल्ला मागितला, पित्याला विचारलं, पण अवक्रमसेनाच्या राज्याकरण्याच्या पद्धतीमधें किंवा विचारशैलीमधें कांही त्रुटी राहित्या आहेत, असं कुणीही म्हटलं नाही. त्याने आपल्या पित्याला, विक्रमसेनला विचारलं, ‘‘मला नीट समजलं नव्हतं म्हणून मी मूर्खासारखी एक आपल्यापुढें प्रतिज्ञा केली आणि एक अट ठेवली. आता मला माझ्या चुका जाणून घ्यायच्या आहेत. म्हणून पूर्वींसारखेच आपण मला माझ्या चुका सांगत जा.’’
त्यावर विक्रमसेनने म्हटलं, ‘‘मुला, जेव्हां तुझ्याकडून चुका होत होत्या, तेव्हां मी त्या निःसंकोचपणे सांगितल्या. आता तुझ्यांत दोष राहिलेले नाहीत. जे आहेत ते फक्त गुणच आहेत. तू अट घातलीस म्हणून मी दोष सांगत नाही असं नाही. माझ्यावर विश्वास ठेव.’’ अवक्रमसेन या उत्तरावर संतुष्ट झाला नाही. तो आपल्या मातेकडे गेला; महाराज त्याच्या चुका सांगतील असा कांहीतरी उपाय तिने सुचवावा असा हट्ट त्याने धरला. महाराणीने उत्तर दिले, ‘‘पुत्रा, प्रत्येक मनुष्याकडून कधी ना कधी, कांही ना कांही चुका होतातच. तुझे पिताश्री मला नेहमी माझ्या चुका दाखवून देत असत, पण त्यामुळें माझा बराच फायदा होत गेला. पण हल्लीं बरेच दिवस त्यांना माझ्यांतही कांही उणीवा आढळत नाहीत. तेव्हां या संबंधात तू राजगुरुंनाच जाऊन विचार.’’

अवक्रमसेनाने राजगुरुंना आपली समस्या सांगितली. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘जो आपल्या चुका जाणून घेण्यास उत्सुक असतो, त्याचे भविष्य नेहमीच उज्वल असते. आता तुमच्या बुद्धीचा चांगला विकास झालेला आहे. पण जेव्हां तुमचे पिताश्री तुमच्या चुकांकडे बोट दाखवत, तेव्हां ते तुम्हाला सहन होत नव्हतं. म्हणून तुमचे मंत्रीगण व अनुचर तुमच्या चुका दाखवून देण्यास संकोच करीत आहेत. त्याला एक उपाय आहे. तुम्हाला आपल्या पित्याकडूनच आपली चूक जाणून घेतली पाहिजे. आणि जेव्हां तुम्ही त्यांना फार नाराज कराल, तेव्हांच हे शक्य होईल.’’
पित्याला नाराज कसे करायचे याबद्दल त्याने आपल्या मातेला विचारले. ती म्हणाली, ‘‘त्यांच्या प्रत्येक बोलण्याचे खंडन कर. देशांत जे कांही वाईट होत असेल, त्याबद्दल त्यांनाच दोषी ठरव.’’ अविक्रमसेनाने लागलीच मातेचा सल्ला अंमलात आणला. राजगुरुंची संमति मिळाली म्हणून महाराणी देखील महाराजाला नाखूष करण्याचा प्रयत्न करुं लागली. एका बाजूने मुलगा व दुसर्‍या बाजूने पत्नी, विक्रमसेनला चिडवायला लागली. आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी योगनिष्ठाही केली, पण त्याचा उपयोग झाला नाही.
अस्वस्थ होऊन राजगुरुंना भेटून महाराजांनी विचारले, ‘‘गुरुवर्य, मी अंतःपुरांत राहातो, तरी माझ्या रागावर नियंत्रण राहात नाही. माझा पुत्र राज्यकारभार समर्थपणें सांभाळतो आहे. म्हणून आता मला वाटतं कीं वानप्रस्थाचा स्वीकार करावा. जवळपास असलेल्या एखाद्या अरण्यांत जाऊन तपस्या करण्याची मला इच्छा होते आहे.’’

राजगुरुंनी सुहास्यमुद्रेने सांगितलं, ‘‘राजन्, इतक्या लौकर वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची घाई कशाला करायची? आपला राग आटोक्यांत आणण्याची वेगळी योगनिष्ठा करायची आवश्यकता नाही. आपण अंतःपुरांत सुखाने राहावे.’’

ही गोष्ट सांगून वेताळाने विचारले, ‘‘राजन्, राजगुरुने विक्रमसेनला दिलेला सल्ला विचित्र नाही कां वाटत? प्रथम त्यांनी महाराजांना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला सांगितलं व त्यासाठी योगनिष्ठा करण्यास सांगितलं. आणि नंतर सांगतात कीं क्रोध आवरण्याची कांही एक आवश्यकता नाही म्हणून! या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी व हास्यास्पद वाटत नाहीत कां? माझ्या या शंकेचं समाधानकारक उत्तर तुला माहिती असेल आणि तरीही तू मौन पत्करलेस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन पडतील.’’
विक्रमार्कने उत्तर दिले, ‘‘अहंकाराने भारलेला क्रोध सर्व प्रकारांनी मनुष्याचे नुकसान करतो. परंतु उचित कारणाने जर क्रोध आला असला तर त्यामुळें हानि होत नाही. कधीकधी सहनशक्तीमुळें वाईटपणादेखील चांगुलपणा वाटायला लागतो. आपल्या चुका इतरांकडून ऐकण्याची, जाणून घेण्याची अवक्रमसेनाला मनापासून इच्छा होती. अशा स्थितींत महाराजांनी त्याच्या चुका दाखवल्या असत्या तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग झाला असता. हे जाणून राजगुरुंनी विक्रमसेनला सल्ला दिला कीं आता त्याची सहनशक्ती वाढवण्यासाठी योगनिष्ठेची आवश्यकता नाही.’’ राजाचे मौन भंग झाल्यामुळें वेताळ शवा-सहित गायब झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला. (सुचित्राच्या रचनेवर आधारीत)  

No comments:

Post a Comment