Sunday, 10 February 2013

हेही गेले, तेही गेले !

एक म्हातारी होती. एकटीच असली, तरी सुखवस्तू होती. ती काशीयात्रेला जायला निघाली. यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्यांचं डबोलं घेऊन, गावाबाहेर कुटीत रहाणाऱ्या एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाला, 'गोसावीबुवा ! मी काशीहून घरी परत येईपर्यंत हे दागिन्यांचं गाठोडं तेवढं सांभाळून ठेवा.'

गोसावी तिला म्हणाला, 'आजीबाई ! मी दुसऱ्याच्या धनदैलतीला स्पर्श करीत नसतो. तू या माझ्या कुटीसमोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्यांचं गाठोडं पुरुन, तो खड्डा बुजवून टाक.' गोसाव्याच्या त्या निरिच्छपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या समक्षच त्या कुटीसमोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले.

तीनएक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटीसमोरील खड्डा उकरुन पाहू लागली, तेव्हा तिला ते दागिने नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं. तिने प्रथम त्या गोसाव्याची मनधरणी केली, आणि नंतर बरीच कान उघाडणीही केली, पण तो गोसावी मख्खपणे तिला एकच उत्तर देई. 'मी तुझ्या दागिन्यांना स्पर्शही केला नाही.' 


नाइलाज होऊन ती म्हातारी चरफ़डत घरी गेली व दु:ख करु लागली. तिच्या दु:खाचे कारण कळताच, शेजारी रहाणारा माणूस तिला धीर देऊन म्हणाला, 'आजी ! तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करु नका. तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो.' अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला, आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डाबे घेऊन याच गोसाव्याकडे गेला. ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून, तो त्याला म्हणाला, 'साधूमहाराज ! दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलयं, तेव्हा घर बंद करुन, सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे. म्हणून माझी आपल्याला एकच विनंती, की आपण हे सर्व दागिने आपल्याजवळ जपून ठेवावे.'

जवळजवळ शंभर सव्वाशे तोळ्यांचे ते दागिने पाहून, त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की, ' हे दागिने आपल्या ताब्यात देऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला, की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठे तरी दूर पळून जायचं.'

याप्रमाणे विचार करुन तो भोंदू बैरागी त्या गृहस्थाला म्हणाला, ' मी बोलून चालून सन्यासी. मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करु ? तुम्हीच या माझ्या कुटीसमोर खोल खड्डा खणा, आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डाबे पुरुन टाका.'

त्या बैराग्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला. तेवढ्यात त्या गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडाआड दडून राहिलेली म्हातारी तिथे आली. 


आता या म्हातारीनं जर तिचे दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली, तर हा गृहस्थ बिथरेल व शेसव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल. तेव्हा आता या म्हातारीच्या वीस-पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेच शहाणपणाचे आहे, 'असा विचार करुन तो लुच्चा बैरागी त्या म्हातारीला म्हणाला, 'अगं आजीबाई ! मला वाटतं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी, आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोदलीस भलत्याच ठिकाणी. तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू ?' म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली, पण काही एक न बोलता तिने त्या जागी जमीन खोदताच, तिला तिथे पुरलेले तिचे दागिने मिळाले.

हा सर्व प्रकार त्या म्हातारीच्या-आता आपल्या दागिन्यांचे दोन डबे पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या-शेजाऱ्याचा दहा बारा-वर्षाचा मुलगा एका झुडपाआडून बघत होता. आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून, तो बापाच्या पूर्वसुचनेनुसार तिथे आला हळूहळू खड्डा खणत असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला, ' बाबा ! दिल्लीच्या काकांचं पत्र आत्ताच डाकवाल्यानं आणून दिलंय. त्या पत्रात काकांनी लिहिलंय, 'माझी प्रकॄती आता चांगली सुधारत असल्यानं, तुम्ही सर्वांनी दिल्लीस येण्याची आवश्यकता नाही.'

मुलानं याप्रमाणे सांगताच, त्या गृहस्थानं खणलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यासंह त्याने घरचा रस्ता धरला. 


त्याच्या पाठोपाठ आपल्या दागिन्यांच्या गाठोड्यासह जाता जाता ती म्हातारी त्या नाराज झालेल्या लुच्च्या बैरग्याला उद्देशून म्हणाली, ''अरे, बोकेसंन्याशा ! ध्यानधारणेचा आणि बैराग्याचा आव आणून, दुसऱ्यांना लुबाडू पाहातोस काय ? चार दोन दिवसात तू हे गाव सोडून इथून कायमचा नाहीसा हो; नाहीतर तुला हाकून देण्याचे काम मला गावातल्या तडफ़दार तरुणांच्यावर सोपवावे लागेल.'

No comments:

Post a Comment