Sunday 10 February 2013

राक्षसाच्या तावडीतून सुटका!

निशिंग खेड्यांत दोन गोंडस मुले राहात होती. थोरला निमा चलाख होता पण निया हा धाकटा भाऊ मात्र जरा उतावळा व भोळा होता - सगळी लहान मुले असतात ना, अगदी तसाच!

एक दिवस त्यांचे आईवडील शिकारीला गेले होते, आणि एक दुष्ट राक्षस त्यांच्या घरी त्यांची डुकरे चोरायला एक मोठा बांबूचा पिंजरा घेऊन आला. राक्षसाला ही दोन लहान मुले एकटीच घरांत खेळताना दिसली.

‘‘किती कोवळी छान आहेत! यांचं मांस तर फारच चविष्ट असेल.’’ राक्षसाच्या तोंडातली लाळ गळायला लागली. ‘‘पण या मुलांना पकडायचं तर शेजारी कुणाला कळता कामा नये.’’ त्याला एक कल्पना सुचली. ‘‘सगळ्या मुलांना केळी आवडतात.’’ त्याने एका केळीच्या झाडावरचा एक पिकलेला घड तोडला आणि आपल्या खांद्यावरच्या पिंजर्‍यांत ठेवला. 



तो निमा व नियाजवळ आला. ‘‘बाळांनो, मी तुमचा म्हातारा काका आहे बरं कां! पहा तरी मी तुमच्यासाठी काय आणलंय ते!’’ राक्षसाने हंसत म्हटलं. निमाचा विश्वास बसला नाही. ‘‘काका? आम्हाला असला धिप्पाड, कुरूप काका आहे हे ठाऊकच नव्हतं.’’ त्याच्या मनांत आलं. तितक्यात नियाने दार उघडलं आणि राक्षसाला घरात घेतलं. ‘‘आमच्यासाठी तुम्ही काय आणलं आहेत, काका?’’ नियाने विचारले. राक्षसाने पिंजर्‍याने दार उघडले. ‘‘आत पहा बरं! मी तुमच्यासाठी झकास केळी आणलीत. तुम्हाला केळी आवडतात ते मला माहीत आहे.’’

केळी पाहिल्याबरोबर निया धांवतच पिंजर्‍यांत शिरला. निमाला जरा धास्ती वाटत होती, पण ती रसरशीत केळी पाहून त्याला मोह आवरेना. तोही पिंजर्‍यांत शिरला. राक्षसाने ताबडतोब बाहेरुन दार बंद केले ‘‘पकडले रे मी तुम्हाला आता!’’ तो मनांत खूष झाला होता. पिंजरा घेऊन तो डोंगरापलीकडच्या गुहेत आपल्या घरी गेला. ‘‘मोठसं पातेलं घे आणि आता ती मोठी चूल पेटव.’’ त्याने मोठ्या आनंदाने बायकोला सांगितले. ‘‘आपल्याला आज मस्त जेवण मिळणार आहे.’’

या दोन मुलांना पाहून राक्षसीण इतकी खूष झाली की तिने हातातले काम टाकून प्रथम मोठे पातेले घेतले, त्यांत पाणी भरले आणि चूल पेटवली. नंतर राक्षसाने तो पिंजरा पातेल्यांत रिकामा केला.  


निमा व नियाला पोहायला येत होते म्हणून ते त्या पाण्यांत तरंगत राहिले, ‘‘अग ए, पाणी तापलंय की नाही ते बघ बरं जरा!’’ राक्षसाने बायकोला सांगितलं. हे ऐकताच निमाला एक युक्ती सुचली. त्याने नियाला सांगितलं आणि दोघांनी पाण्यांत बुडी मारली. राक्षसीणबाईने जेव्हां पातेल्यांत पाहिलं तेव्हां तिला पाण्यावर बुडबुडे दिसले. खरं म्हणजे ती मुले पाण्यांत श्वास घेत होती.

पण तिला वाटलं की पाण्याला आता उकळी फुटायला लागलीय. ‘‘तुमचं जेवण लवकरच तयार होईल, बरं कां!’’ तिने ओरडून सांगितले, ‘‘पाण्याला आत्ता आधण येतंय आणि मांसही लौकर शिजेल.’’ राक्षस आणि राक्षसीण, दोघेही स्वच्छतेचे भोक्ते होते. जेवणापूर्वी हातपायतोंड स्वच्छ धुण्यासाठी ते बाहेर गेले. जेव्हां या मुलांनी पाहिलं की तिथे ही दोघेही नाहीत, तेव्हा मुलांनी भांड्याच्याबाहेर उड्या टाकल्या. कोपर्‍यात एका बाजूला राक्षसीणीने आपल्या दोन्ही बाळांना झोपवलं होतं. या मुलांनी ती बाळे उचलली आणि भांड्यात टाकली. पाणी हळूहळू गरम होऊ लागलं आणि ती मुले मोठ्याने रडायला लागली.

‘‘राक्षस नि राक्षसीण इथे यायच्या आत आपण इथून पळून जाऊ या, निया’’ निमा ओरडला. त्या अरण्यात ते नदीच्या दिशेने पळायला लागले. तेवढ्यांत राक्षस जोडपे गुहेत परत आले. लुसलुशीत मटणाच्या कल्पनेने ती दोघे जिभल्या चाटत होती. पण भांड्यातून येणारे रडण्याचे आवाज ऐकून ते गोंधळले. त्यांनी भांड्यात वाकून पाहिलं तो काय, त्यांची स्वतःची मुलेच अर्धमेली होऊन त्या पाण्यांत गटांगळ्या खात होती.  


किंचाळत राक्षसीणबाईने आपली बाळे त्या कोमट कढत पाण्यांतून बाहेर काढली. घाबरुन गेलेल्या त्या पोरांना तिने पोटाशी धरले. ‘‘बिचारी माझी मुलं! तुम्ही चांगलेच भाजले गेलात की रे! कळलं नसतं तर आम्ही तुम्हालाच खाऊन टाकलं असतं रे बाबांनो!’’ ती रडायला लागली. ‘‘हे त्या पोरांचंच काम आहे.’’ तिचा नवरा संतापाने फुणफुणत होता. ‘‘चल आता, आपण त्यांना पकडू या. आता तर त्यांना पकडून आपण खाल्लंच पाहिजे. त्यांनी जे केलंय त्याचा सूड घेतला पाहिजे आपण!’’

मुलांच्या पावलांसे ठसे दिसत होते. राक्षस त्या मागावरुन त्यांचा पाठलाग करु लागले. त्यांनी त्या मुलांना अखेरीस गांठले. जेव्हां मुले नदीच्या काठावर पोचली आणि त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हां ही दोघेही धावत येताना त्यांना दिसली. ‘‘पळ निया! आपण काठावरच्या त्या उंच झाडावर चढून जाऊ, म्हणजे त्यांना आपण सहज सापडणार नाही.’’ निमा ओरडून म्हणाला. दोघेही सरसर झाडावर चढले. राक्षस झाडाजवळ येऊन थबकले. ‘‘चढा, चढा झाडावर’’ राक्षसीण नवर्‍याला सांगू लागली.

‘‘अग, मला झाडावर चढता येत नाही’’ दातओठ खात राक्षस म्हणाला. ‘‘मी या मुलांनाच विचारतो; त्यांनाच सांगतो मला शिकवायला. त्याची युक्ती त्यांच्याकडून काढून घ्यायला हवी.’’ त्याने मुलांना गोड आवाजांत हांक मारली, ‘‘अरे बाळांनो, तुम्ही किती हुशार, चुणचुणीत नि चलाख आहात रे! किती झटकन चढून गेलात इतक्या उंच झाडावर! कुणी शिकवलं ते तुम्हाला झाडावर चढायला?’’  


‘‘आजोबा’’ नियाने उतावळेपणाने हांक मारली. पण निमाने त्याला सणसणीत चिमटा काढून गप्प बसायची खूण केली. ‘‘फारच छान हं!’’ राक्षस उद्गारला. ‘‘तुम्हाला झाडावर चढण्याबद्दल सगळी नीट माहिती आहे की नाही, त्याची परीक्षा घेऊ या हं! सांगा पाहूं, गुळगुळीत बुंध्याचे झाड असेल तर वर कसे चढायचे?’’ ‘‘मला माहिती आहे’’ वेडा निया लगेच सांगायला लागला, ‘‘झाडाच्या बुंध्यावर वेली उगवतात ना, त्या शोधून काढायच्या.’’

निमाने त्याला निमूट बसायला सांगितले पण आता उशीर झाला होता. गुपित उघड झाले होते. मुलांना खरोखरीच एक बळकट, जाजडजूड वेल मिळालेली होती आणि तिच्या साहाय्याने ते चटकन वर जाऊ शकले होते. राक्षसाने इकडेतिकडे पाहिले व ती वेल त्याला दिसली, ‘‘आ हा हा, आता मी आलोच तुमच्याजवळ!’’ तो खूष होऊन नंतर बायकोला हळूच म्हणाला, ‘‘मी आता झाडावर जाऊन त्या दोघांना खाली फेकतो. तयारीत राहा. कुर्‍हाडीने त्यांची डोकी उडवून टाक. यावेळेला त्यांनी आपल्या हातून निसटता कामा नये.’’ तिने होकार दिला आणि हातांतली कुर्‍हाड वर उंच धरुन ती अगदी तयार उभी राहिली. पण हुशार निमा काही स्वस्थ बसला नव्हता. त्याच्याजवळही छोटासा सुरा होताच. त्याने ती वेल वरुन हळूहळू कापायला सुरवात केली. वेलीच्या मदतीने तो अगडबंब राक्षस वरती चढत होता ना! राक्षस अर्ध्या उंचीवर धडपडत गेला असेल तितक्यांत वरुन वेल तुटली, आणि तो केकाटतच खाली कोसळला.  


तो जेव्हां जमिनीवर आदळला तेव्हां त्याची बायको कुर्‍हाड उंच धरुन उभी होतीच. सांगितल्याप्रमाणे तिने त्याच्याच डोक्यावर कुर्‍हाडीचा घाव घातला. अरे बापरे! त्याच्या ओरडण्याने जमीन कांपायला लागली नि झाडे वादळांत असल्यासारखी हलायला लागली. आता राक्षस मंडळी ही काही सहजासहजी मरत नसतात, म्हणून तो जखमी झाला होता तरी मेला नाही.

राक्षसाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला, त्याचे डोके गरगरत होते आणि त्याचा तोल जात होता. जरा वेळानंतर त्याला थोडे बरे वाटायला लागले आणि तो उठून बसला व बायकोवर खेकसला. त्याच्या जखमेतून भळाभळा रक्त बाहात होते पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याने तिच्या हातांतून ती कुर्‍हाड हिसकली आणि तो संतापाने त्या उंच झाडाच्या बुंध्यावर घाव घालूं लागली. ‘‘मी तुम्हाला आता सोडणार नाही’’ झाडावर थरथरत बसलेल्या त्या दोघा मुलांना तो म्हणाला.

‘‘निमा, आपण आता खलास होणार. आता मात्र नक्की मरणार!’’ निया रडायला लागला. पण निमा धाडसी होता. ‘‘छे, आपण नाही रे मरणार. देव चांगल्या माणसांना वाचवतो. आपण काही पाप केलेलं नाही. आपण या वृक्षदेवाची आणि या सरितादेवीची प्रार्थना करुं या. म्हणजे ते आपल्याला मदत करतील.’’

दोन्ही मुले मोठ्याने प्रार्थना म्हणायला लागली. राक्षसाच्या दर घावागणिक झाड लवत, हालत होते. पण त्यांची प्रार्थना देवाने ऐकली. कारण झाड पडले; पण पडले ते मुलांसकट नदीत पडले आणि प्रवाहाबरोबर भराभर पुढे वाहात गेले. राक्षसाला काही त्यांना उचलून घेता आले नाही. त्याच्या तावडीतून वाचून दोघेही सुखरूप घरी परत पोचले.  


No comments:

Post a Comment