Thursday, 7 February 2013

वारस


निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. त्याने झाडावरुन शव खाली उतरवले, खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला. तेव्हां शवांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन्, तुझी जिद्द व सहनशक्ती असामान्य आहे यांत शंकाच नाही.

परंतु यांत योग्य-अयोग्य काय, त्याचा निर्णय करण्याची शक्ती तुझ्यामधे कितपत आहे, ते सांगता येणार नाही. कारण सत्ता व धन हे रास्त प्रमाणांत जवळ असणारी व्यक्तीच सुखासमाधानाने नांदू शकते, आणि शांतचित्ताने विचार करूं शकते, कारण तिच्यांत सहनशक्ती असते. पण सत्ताधीश व धनवंत अहंकारी असतात आणि आपले नैतिक संतुलन घालवून बसतात. तू राजा आहेस, मनांत येईल ते करुं शकतोस. न्यायाला अन्यायदेखील ठरवूं शकतोस.
म्हणून माझ्या मनांत शंका येते, कीं इतक्या असीम संपत्तीचा स्वामी असूनही तू मध्यरात्रीं असा कां भटकतो आहेस? कांही वेळां अनुचित निर्णय कसे घेतले जातात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वज्रनाथ. त्याची गोष्ट ऐकताना तुझा थकवाही दूर होईल.’’ आणि वेताळाने आपली गोष्ट सुरुं केली. ‘‘वज्रनाथ विक्रमपूरला राहात होता. तो धनाढ्य होता पण अतिशय दयाळू होता. कुणीही त्याच्याकडे मदत मागितली कीं तो जराही आढेवेढे न घेता त्याला मदत करीत असे. थोडक्यांत तो उदार होता.

परंतु धनवंत असूनही तो उदास होता, कारण त्याला मूलबाळ नव्हते. त्यांच्यापश्चात या संपत्तीचे रक्षण करुन तिचा सदुपयोग कोण करुं शकेल ही काळजी सतत त्याला व त्याच्या पत्नीला पोखरत होती. जेव्हां त्यांच्या नातलगांना समजलं कीं त्यांना आता मूल होणार नाही, तेव्हां त्या संपत्तीच्या लोभाने ते ह्या दोघांची वारेमाप स्तुती करायला लागले. ते पाहून वज्रनाथला जास्तच वाईट वाटले.
एक दिवस वज्रनाथचा एक दूरचा नातेवाईक नागेंद्रवर्मा त्याला भेटायला आला. जेवण झाल्यानंतर तो वज्रनाथला म्हणाला, ‘‘माझा मुलगा चंद्रशेखर अतिशय बुद्धिमान आहे. गांवच्या शाळेंत त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता वाणिज्यशास्त्राचा पुढचा अभ्यास करायचा तर त्याला मणिद्वीपला पाठवायला हवं. तेवढी माझी आर्थिक कुवत नाही. आपण जर कृपा केलीत तरच हे जमण्यासारखे आहे.’’

‘‘सरस्वतीची कृपा असली तर हे जरूर जमेल. आता पैशाबद्दल म्हणशील तर मी त्याची व्यवस्था करीन. त्याचा सारा शिक्षणखर्च मी देईन. तू त्याला मणिद्वीपला पाठवायची तयारी सुरुं कर.’’ असं म्हणून वज्रनाथने त्यासाठी आवश्यक तेवढी रक्कम नागेंद्राला दिली. ही बातमी वज्रनाथच्या इतर नातेवाईकांना कळली. वज्रनाथ चंद्रशेखरच्या बुद्धिमत्तेवर भाळला आणि त्याने सारा शिक्षणखर्चाचा भार उचलला, म्हणून त्या सर्वांना वाटलं कीं आता चंद्रशेखरच वज्रनाथचा वारस होणार!

एकदा वज्रनाथ पत्नीबरोबर मंदिरात जात होता, तेव्हां एका तरुणाने दीनवाण्या स्वरांत म्हटले, ‘‘महोदय, मी भुकेने तडफडतो आहे, मला मदत करा हो!’’ वज्रनाथने त्याला कांही रुपये दिले. त्या मुलाचे डोळे आनंदाने चमकायला लागले.
आठवडाभरानंतर वज्रनाथ पुन्हां त्या मंदिरात गेला तेव्हां तो तरुण मुलगा त्याला दिसला. तो भीक मागत नव्हता, तर फुलें विकत होता. वज्रनाथला पाहून त्याने आदराने हात जोडले व तो म्हणाला, ‘‘महोदय, आपल्यासारख्या उदार मंडळींच्यासमोर हात पसरुन मी आपले पोट भरत होतो. पण त्या दिवशीं तुम्ही मला बरेच रुपये दिलेत. त्या रकमेंतून मी फुलें खरेदी केली आणि भक्तगणांना विकली. आता या धंद्यात मला पुरेसे पैसे मिळतात. आपण दिलेली रकम मी पुढे केव्हांतरी जरूर परत देईन.’’

त्याचे उद्गार ऐकून वज्रनाथला आनंद झाला. वज्रनाथ जेव्हां त्या मंदिरात जाई, तेव्हां त्या मुलाकडून फुलांच्या माळा खरेदी करीत असे. असे कांही दिवस गेले. त्या दिवशी मध्यरात्र झाली. तरी वज्रनाथ जागाच होता. त्याच्या पत्नीने जेव्हां त्याच्या चिंतेचे कारण विचारले व ती म्हणाली, ‘‘देवाने आपल्याला फक्त मूलबाळ दिले नाही. तेव्हां मला वाटतं कीं आपल्या नात्यांतलेच एखादे चांगले मूल आपण दत्तक घेऊं या. म्हणजे मोठा झाल्या-नंतर तो आपल्या व्यापारांतही मदत करील. माझा विचार ठीक आहे ना?’’
‘‘हो तर! माझ्या मनांतही तोच विचार आहे.

ज्यांना दैवाचा धाक वाटतो, तेच धनाचा चांगला उपयोग करुं शकतात, अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून ज्याला दैवाबद्दल वचक असतो व धर्माबद्दल जाण असते, अशाच व्यक्तीच्या शोधांत मी आहे.’’ वज्रनाथने सांगितलं. ‘‘तुम्ही हा निर्णय परमेश्वरावर सोंपवा आणि आता निश्चिंत मनाने झोंपा.’’ एक प्रदीर्घ श्वास घेऊन त्याच्या पत्नीने त्याला दिलासा दिला.

दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं वज्रनाथ नेहमीप्रमाणें मंदिरात गेला. तिथें एका युवकाकडे त्याचे लक्ष वेधले गेले. मंदिराच्या एका कोंपर्‍यांत तो तरुण पद्मासन घालून बसला होता व ध्यानमग्न होता. ओळीने चारपांच दिवस त्याच जागीं तो बसलेला वज्रनाथला दिसला. त्याने डोळे उघडल्यानंतर वज्रनाथने त्याला विचारलं, ‘‘मुला, तुझं नांव काय? कोण आहेस तूं? आणि काय करतोस?’’
‘‘मी अनाथ आहे. मला सत्यवान म्हणतात. मी नेहमी भगवंताचे ध्यान करण्यांत गुंतलेला असतो. हेच माझं काम!’’ त्या तरुणाने नम्र स्वरांत सांगितलं. ‘‘तू कांही खात पीत नाहीस कां?’’ वज्रनाथने त्याला विचारलं. ‘‘परमेश्वराचं चिंतन करण्यांत जेव्हां मी मग्न होतो, तेव्हां तहानभूक लागत नाही. तो सर्वांचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या दयेवर सारेजण जगतात. असा दयाळू देव माझी भूक भागवणार नाही कां?’’ तरुणाने उत्तर दिले.

त्याचे विचार ऐकून वज्रनाथ प्रभावित झाला. आपण अशाच तरुण मुलाच्या शोधांत आहोत असे त्याला वाटले. कदाचित देवाची देखील हीच इच्छा असेल. घरीं परतल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला त्या तरुणाची सारी माहिती सांगितली. तिलाही फार आनंद वाटला. त्या तरुणावर नजर ठेवून त्याच्याबद्दल जास्त माहिती शोधून काढायची असे या पतीपत्नीनी ठरवले.

त्या दिवसापासून वज्रनाथचे नोकर तिन्ही वेळां त्या तरुणासाठी जेवण नेऊं लागले. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने आणखी कांही माणसें नेमली. कांही दिवसानंतर त्या माणसांनी वज्रनाथला सांगितले, ‘‘महाशय, त्या तरुणाच्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहात असतात.’’ वज्रनाथला चैन पडेना. संध्याकाळीं तो मंदिरात गेला आणि त्याने त्या युवकाला विचारले, ‘‘मला कळलंय कीं तू गप्प राहातोस आणि तुझ्या डोळ्यांचे पाणी खळत नाही. तुला कसली अडचण आहे कीं त्यामुळें तुला सारखे रडूं येते? तुझे दुःख; चिंता जर तू मला सांगितलीस तर मी कांहीतरी उपाय त्यावर शोधण्याचा प्रयत्न करीन.’’
सत्यवानाने वज्रनाथाच्या पायावर लोटांगण घातले आणि रडतरडत तो म्हणाला, ‘‘आपण मला अगोदर क्षमा करा.’’ ‘‘मी तुला क्षमा करुं? तू मला सांग कीं खरी गोष्ट काय आहे?’’ वज्रनाथने त्याला उठवत विचारले. ‘‘आपण समजता त्याप्रमाणें मी कांही देवाचा भक्तबिक्त नाही. मी एक चोर आहे. आपल्या घरीं एका रात्रीं मी चोरी करण्यासाठीं शिरलो होतो. त्यावेळेला आपल्या पत्नीबरोबर आपण एखाद्या भाविक, श्रद्धाळू तरुणाला दत्तक घ्यावे असा विचार करीत होतात. ते ऐकून मला मोह झाला.
आपल्या संपत्तीचा वारस व्हायला ही एक सुवर्ण संधीच मला मिळाली होती. मुकाट्याने मी तुमच्या वाड्याबाहेर पडलो. दुसर्‍या दिवशी आपण मंदिरांत देवदर्शनाला येणार हे मला ठाऊक होतं. मी भक्ताचा वेष घेतला आणि मी परमेश्वराचे ध्यान करतो आहे अशी बतावणी केली. आपण मला बघितलंत. आणि नंतर जे मला हवं होतं, तसंच घडत गेलं. परंतु, हळूंहळूं, तिथें बसून माझी देवावरची श्रद्धा वाढत गेली. जेव्हांजेव्हां मला माझ्या जुन्या पापांची, दुष्ट कर्मांची, व केलेल्या चोर्‍यांची आठवण येई, तेव्हां तेव्हां मला माझीच घृणा येऊं लागे, आणि माझ्या डोळ्यांतून अश्रुसरी वाहायला लागत.’’

त्याचा खुलासा ऐकून क्षणभर वज्रनाथ स्तंभित झाला. सत्यवान पुढें सांगायला लागला, ‘‘आपण तर धर्मात्मा आहात. मी पापी आहे. आपल्याला फसवण्यासाठीं मी ही चाल केली. आपण जी शिक्षा मला द्याल, ती मी भोगायला तयार आहे. शिक्षेची मुदत संपली कीं हे शहर सोडून मी निघून जाईन.’’ वज्रनाथने विचार केला आणि स्वतःच्या मनाशीच एक निर्णय त्याने ठरवला. तो म्हणाला, ‘‘सत्यवान, हे शहर सोडून जायची तुला कांही आवश्यकता राहाणार नाही. तूच माझा वारस होणार आहेस.’’ आणि त्याने सत्यवानाला उठवून आपल्या घरीं नेले.’’
ही गोष्ट सांगून वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन्, स्वतःला चोर, पापी समजणार्‍या सत्यवानाला वज्रनाथने आपला वारस म्हणून जाहीर केले. मला तर वाटतं कीं, अफाट संपत्तीचा मालक असल्यामुळें त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. योग्य-अयोग्य काय याचा निर्णय करण्याची विचारशक्ती त्याच्याजवळ उरली नव्हती. त्याने घेतलेला हा निर्णयच सांगतोय कीं तो श्रीमंत आहे, परंतु बुद्धिहीन श्रीमंत! आता चंद्रशेखर हा हुशार विद्यार्थी आहे, उच्च शिक्षण घ्यायची त्याला तीव्र इच्छा आहे. शिक्षण घेतल्यावर तो वाणिज्यशास्त्रांत पारंगत झाला असता आणि वज्रनाथाला त्याने व्यापारांत मदत केली असती.
फळें विकून चरितार्थ चालवूं शकणारा तो मुलगासुद्धां समर्थ होता, आत्मनिर्भर होता. त्याची कमाई बेताची असली तरी तो आपल्या पायावर उभा राहण्याची इच्छा धरुन होता. या दोन तरुणांना सोडून एका खोटारड्या चोराला आपला वारस नेमणे हे कांही बरोबर आहे कां? यांत वज्रनाथचा मूर्खपणाच दिसून येतो कीं नाही? माझ्या या शंकांचं उत्तर तुला माहीत असेल आणि तरीही तू गप्प बसलास तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलें होतील.’’

वेताळाची शंका दूर करण्यासाठी राजा विक्रमार्कने उत्तर दिलं, ‘‘वज्रनाथने आपला वारस निवडण्याच्या विषयांत चूक केली नाही किंवा उतावळेपणाही केला नाही. त्याने योग्य निर्णय घेतला. तो स्वतः उदार होता, इतरांना मदत करण्याची त्याची वृत्ती होती, म्हणून त्याने चंद्रशेखरला उच्च शिक्षणासाठीं पैशाची मदत केली. तो आपला वारस होईल या अपेक्षेने मदत दिली नव्हती. दुसरा होता भिकारी, तो बनला व्यापारी! त्याला पैशाची किंमत समजली होती व पैसे कसे मिळवावेत याचीही कल्पना होती. परंतु वज्रनाथची संपत्ती जर त्याला लाभती, तर त्याच्या वृत्तींत बदल होऊं शकलाही असता.
आता सत्यवानाने वज्रनाथला फसवायचं ठरवलं होतं खरं, पण परमेश्वराचं निरंतर ध्यान आणि वज्रनाथाचा चांगला स्वभाव यामुळें त्याची वृत्ती बदलली. त्याला पश्चात्ताप झाला. म्हणून त्याने सत्य परिस्थिती सांगून शिक्षा देण्याची विनंती केली. आपल्या पापांचे त्याने परिमार्जन केले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला होता तसा सत्यवानही आता खराच देवभक्त झाला होता. वज्रनाथाला विश्वास वाटला कीं तो आपली संपत्ती न्याय्य मार्गाने खर्च करील व धर्माचरण करील. म्हणूनच त्याने सत्यवानाला आपला वारस निवडला. त्यांत त्याचा मूर्खपणा दिसत नाही.’’ राजाचे मौन-भंग करण्यांत वेताळ यशस्वी झाला, व शवासहित अदृश्य होऊन तो पुन्हां झाडावर जाऊन बसला.
 

No comments:

Post a Comment