Saturday, 16 February 2013

जेव्हां मूर्ख प्रश्न विचारतात

 यश हे नेहमी यशस्वी माणसाला उल्हसित करते. त्यामुळे त्याच्याकडे जे मित्र व सहकारी येतात, त्यांपैकी कांहीजण निर्भेळ आनंद वाटून घेतात, तर उरलेले मनांतल्या मनांत द्वेष करतात. हे अगदी बिरबलच्या काळांत सुद्धा होते.
जेव्हां तेव्हां बादशहाकडून प्रशंसा, शाबासकी मिळे तेव्हां कांही मानकरी त्याचा मत्सर करीत. त्यांना वाटे की, बादशहापुढे त्याचा पाणउतारा केलाच पाहिजे!
ते सर्व एकत्र आले व त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून लागले. शेवटी एका मोठ्या योजनेची तयारी झाली! ही योजना जर यशस्वी झाली, तर आपण त्याचा आनंद कसा उपभोगायचा याचा विचार ते करुं लागले.
दुसर्‍या दिवशी सैतानखान-त्याच्या साथीदारांसह दरबारांत आला. बिरबल तिथे उपस्थित होता. दिवसाचे काम संपल्यावर बादशहा निवांतपणे लोकांकडून नवीन कल्पना, युक्त्या, सूचना ऐकण्यास तयार झाला.
सैतानखान उभा राहिला, खाली वांकला व अनुमतीची वाट पाहूं लागला. ‘‘बोल’’, बादशहा म्हणाला.
‘‘शहेनशहा, आपल्या सर्वांना माहीत आहे की बिरबल फारच हुशार आहे. हे जरी खरी असले तरी त्याच्या बुद्धीशी मी कशी बरोबरी करू शकेन, ह्याचा विचार मी करतो आहे, आमच्यापैकी कोणीही कठीण व क्लिष्ट प्रश्न सोडवूं शकत नाहीत, हे मला मान्य आहे’’, सैतानखान बिरबलाकडे कौतुकाने पाहात म्हणाला.
 ‘‘शहेनशहा, बिरबल जर एवढा हुशार असेल तर त्याचे वडील त्याच्यापेक्षां कितीतरी पटीने हुशार असतील! शहेनशहा! आम्हाला बिरबलच्या वडिलांना भेटायची इच्छा आहे. जर तो त्यांना ह्या राजदरबारी घेऊन येईल तरच त्यांना आपल्याला भेटता येईल,’’ असे बोलून सैतानखान थांबला.
बिरबल जरा सांवरून बसला. कांहीतरी शिजत असल्याचे त्याला कळले. सैतानखान हुशार आहे.
पण ही हुशारी तो योग्य कामासाठी कधीच वापरत नाही. त्याच्या मनाचा कल नेहमीच नकारार्थी असतो. बिरबलाने विचार केला, व त्याला एक गोष्ट दिसली. ‘त्याला माहित आहे की माझे वडील कांही खूप शिकलेले नाहीत. प्रामाणिक व सरळ मार्गावरुन चालणारे गृहस्थ आहेत. दरबारी व साशंक लोकांसमोर ते अनभिज्ञ आहेत. त्यांना ह्या लोकांपुढे व बादशहासमोर आणून उघडे पाडायचे व त्याबरोबर मलाही खाली पाडायचे आहे. मूर्ख! त्याला माहित नाही की कुठल्याही क्षणी मी एखादी गोष्ट त्याच्यावर सहज उलटवूं शकतो!’’
‘‘बिरबल’’, बादशहाच्या आवाजाने बिरबलच्या मनांतील विचारचक्रे जरा थांबली. ‘‘आम्हाला तुझ्या वडिलांना भेटायचे आहे.’’
‘‘हो, शहेनशहा!’’
‘‘रथ घेऊन तुमच्या गांवी जा. आणि वडिलांना घेऊन परवाच्या दिवशी दरबारांत उपस्थित रहा,’’ बादशहा म्हणाला.
‘‘शहेनशाह, जशी तुमची इच्छा! मी आत्ताच निघूं शकतो कां?’’
‘‘हो, वेळ कशाला वांया घालवतोस?’’ बादशहा म्हणाला.
शाही रथ गांवाकडे पळू लागला. बिरबलच्या पूर्वजांनी बांधलेल्या घरासमोर सारथ्याने रथ थांबवला. बिरबल पळतच वडिलांकडे गेला. ‘‘आप्पाजी.’’ असे म्हणून त्याने वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ‘‘अरे वा! तुला बघून मला खूप आनंद झाला. तू कसा आहेस? सर्व ठीक आहे ना?’’ असे म्हणून त्या म्हातार्‍या गृहस्थाने बिरबलला जवळ घेतले व घट्ट मिठी मारली.
दोघांनी बर्‍याच गोष्टींवर खूप चर्चा केली. त्या रात्री जेवण झाल्यानंतर बिरबलने आपल्या वडिलांना राजदरबारांत घेऊन जाण्याविषयी सांगितले.
‘‘मी? पण मला माहित नाहीत राजदरबारातील चालीरीती,’’ जरा साशंक होऊन ते म्हणाले.
‘‘आप्पाजी, मी तुम्हाला शिकवतो. जेव्हां तुम्ही दरबारांत याल, तेव्हां खाली वाकून आपले कपाळ जमिनीला लावायचे. मान कायम ताठ ठेवा. जर, तुम्हारा तुमचे नांव, राहाता कुठे, विचारले किंवा तुम्ही जगण्यासाठी उदरनिर्वाह काय करता, असे विचारले तर अगदी संक्षिप्त उत्तर द्यायचे. दुसर्‍या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही. फक्त मान हलवायची किंवा हंसायचे. पण एक शब्दही उच्चारायचा नाही.’’
‘‘मौनम् सवार्थसाधनम्,’’ वृद्ध माणसाने संस्कृत श्लोक सांगितला, अर्थात- शांतता हे सर्वांचे सार आहे.
‘‘आणि हो आप्पाजी, अजून एक म्हणजे जेव्हां सर्व संपेल आणि त्यांनी तुम्हाला विचारले की तुम्ही ह्याला उत्तरे कां दिली नाहीत, तेव्हा सांगा...’’, बिरबल वृद्ध वडिलांच्याजवळ जाऊन त्यांच्या कानांत कांहीतरी कुजबुजला.
ते ऐकून ते जोरजोरात हंसत सुटले. बिरबल राजदरबारांत त्याच्या वडिलांबरोबर आला. बिरबलाने खाली वाकून जमिनीला आपले कपाळ टेकविले. तो उभा राहिला व स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. त्या वयस्क माणसाने तसेच केले.
‘‘आदरणीय महोदय, आपले स्वागत आहे, आपण आसनस्थ व्हावे,’’ बादशहा हंसून म्हणाला. ‘‘शहेनशहा!’’ असे म्हणून म्हातारा गृहस्थ आदरपूर्वक खाली वांकला व बिरबलाशेजारी जाऊन बसला. ‘‘तुम्हाला येथे बघून आम्हाला खूप आनंद झाला. माननीय महोदय! तुमचा मुलगा म्हणजे एक रत्न आहे. तो खूप हुशार आहे, कठीण प्रसंगातून तो चटकन मार्ग काढतो. तुम्हाला त्याचा अभिमान असायला हवा.’’
वृद्ध गृहस्थ हंसला, त्याने नम्रतेने मान हलवली पण तो एक शब्दही बोलला नाही.
‘‘शहेनशहा! आम्हालाही या पूजनीय गृहस्थांना भेटून तेवढाच आनंद झाला. हे गृहस्थ आम्हास पित्यासमान आहेत,’’ असे म्हणून वृद्ध गृहस्थाशी बोलण्याची अनुमती मिळवण्याकरता थांबला.
बादशहाने हाताने संमती दिली.
सैतानखान बिरबलाकडे मत्सराने कटाक्ष टाकूं लागला. त्याने स्वतःला जरा सांवरले व वृद्ध गृहस्थाच्याजवळ जाऊन त्याने खाली वांकून त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला.
‘‘मुला, दीर्घायुषी हो,’’ असे म्हणून वृद्धाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला.
‘‘बाबाजी, तुमचा मुलगा अत्यंत हुशार आहे. आणि तुम्ही त्याचे वडील असल्यामुळे त्याच्या-पेक्षां तुम्ही कितीतरी पटीने हुशार असणार!’’ असे म्हणून सैतानखान क्षणभर थांबला. वृद्ध गृहस्थ हंसला व आपली मान त्याने एका विशिष्ट दिशेला धरली. ‘‘बाबाजी, तो लहानपणी अकाली प्रौढत्व आलेले मूल होते कां?’’ त्याने विचारले.
पुन्हां एकदा वृद्ध हंसला व त्याने आपली मान दुसरीकडे फिरवली.
‘‘तो एक निष्ठावान मुलगा होता कां? तो तुमची काळजी घ्यायचा कां?’’
सैतानखानाला पुन्हां एकदा वृद्ध गृहस्थाने हास्याने ने उत्तर दिले.
‘‘तुम्हाला आमच्या बादशहाबद्दल काय वाटते?’’ असे म्हणून तो त्यांना अडचणींत आणण्याचा प्रयत्न करूं लागला.

वृद्ध गृहस्थ हंसला व शांत राहिला.
सैतानखानाने पुन्हां प्रश्न केला.
पुन्हां एकदा वृद्ध गृहस्थ मान फिरवून हंसला. पण त्याने एक सुद्धां शब्द तोंडातून काढला नाही.
बिरबल बादशहाकडे वळला आणि म्हणाला, ‘‘शहेनशहा! ते तुमचा खूप आदर करतात. त्यांना तुमचे अस्सल गुण माहित आहेत. पण ते कांहीही बोलणार नाहीत. ते अतिशय विनयशील आहेत. ते मुघल घराण्याचा आदर करतात! माझे वडील थोडे देवभोळे आहेत.! इतरांविषयी पटकन मत बनवीत नाहीत, जसे आपण देवाबद्दल मत बनवीत नाही, तसेच त्यामुळे ते एकही शब्द बोलत नाहीत.’’
‘‘मला माननीय महोदयांचा स्वभाव आवडला,’’ असे म्हणून बादशहाने स्मितहास्य केले.
सैतानखानाला कळून चुकले की त्या माणसाला अशिक्षित सिद्ध करण्याचा त्याचा उद्देश फसला आहे. त्याच्यामुळे इतर सहकार्‍यांना तो वृद्ध खरंच कसा आहे, हे जाणून घेण्याची संधी चालून आली. त्यांनी प्रयत्न केला. पण ते सुद्धां हारले. वृद्ध माणूस फक्त हंसायचा, मान हलवायचा, व नंतर एका विशिष्ट कोनांत ती रोखून धरायचा. पण एक शब्दही बोलायचा नाही.

‘‘शहेनशहा!’’ सैतानखान उठून उभा राहिला.

‘‘बोल, सैतानखान,’’ असे म्हणून बादशहाने बोलायला संमती दिली.

‘‘शहेनशहा, मला शंका येते की ह्या वृद्धाला कांही येते की नाही? हा माणूस शांत राहून त्याचे अडाणीपण लपवून ठेवतो आहे.’’
हे ऐकून सर्व दरबाराला धक्का बसला. बादशहा ओरडला,’’ ‘‘सैतानखान, ह्या गृहस्थाबद्दल तू अनादराने असा कसा बोलूं शकतोस?’’

त्यानंतर बादशहाने वृद्ध माणसाला मान उंचावताना, व बोलण्याची परवानगी मागताना बघितले.

‘‘बोला महोदय.’’

‘‘शहेनशहा! मला नम्रपणे सांगायचे आहे की, शांतता हेच मूर्खांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर आहे.’’ वृद्ध माणसाच्या शब्दांना सळसळत्या पात्यासारखी धार होती.
‘‘महोदय, फक्त हुशार माणसांनाच शांततेची ताकद माहिती असते,’’ बादशहा म्हणाला आणि बिरबल कडे वळला.’’ लायक वडिलांचा लायक सुपुत्र.’’ सैतानखानला कळून चुकले की तो खेळ हरला आहे. त्याच्या सहकार्‍यांना तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे असेच वाटत होते.

जेव्हां बादशहाने सोन्याचे कडे हातांतून काढून त्या वृद्ध गृहस्थाला भेट दिले, तेव्हा सैतानखानाचा राग पराकोटीला गेला होता. वृद्ध माणूस नम्रपणे खाली वाकला व आपले कपाळ जमिनीला टेकवून नंतर उभा राहिला.
‘‘शहेनशहा!’’ बिरबल म्हणाला, ‘‘माझे वडील वृद्ध आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. मला त्यांना घेऊन जाण्याची परवानगी मिळेल का?’’
‘‘हो, बिरबल, त्यांची काळजी घे. ते खरेच खूप हुशार आहेत. त्यांना शांततेची ताकद माहित आहे.’’ असे म्हणून बादशहा बराच वेळ हंसत राहिला

No comments:

Post a Comment