Sunday, 10 February 2013

तेथे पाहिजे जातीचे

पूर्वी एकदा विरुपसेन हा मगधाचा राजा असताना बोधिसत्वाने एका हत्तीच्या रूपात जन्म घेतला होता. तो पांढराशुभ्र हत्ती ऐरावतासारखा दिसायचा. म्हणून मगधराजाने त्याला आपला प्रमुख हत्ती मानले. 

एका पर्व दिनी मगधाचे राज्य स्वर्गालाही लाजवील असे सजविले होते. राजधानीमध्ये एक वैभवसंपन्न मिरवणूक काढायचे आयोजन झाले होते. म्हणून त्या श्‍वेतहत्तीला चांगले नटविले होते. सुसज्ज सैनिक मागेपुढे असलेल्या, हत्तीच्या नटलेल्या अंबारीमध्ये बसलेल्या राजाची मिरवणूक निघाली.

राजमार्गाच्या दुतर्फा उभे असलेले लोक मोठ्या उत्साहाने, ‘‘अहाहा! या गजराजाची चाल तर बघा! याच्या दमदार चालीचा डौल पाहता, एखाद्या सार्वभौम राजाचे वाहन होण्यास साजेसा आहे!’’ असे त्या हत्तीच्या गुणांचे कौतुक करु लागले.

लोक हत्तीची स्तुती करीत असलेले पाहून राजाच्या मनात आले - ‘‘राजा म्हणून माझा गौरव करण्याऐवजी हे लोक हत्तीचीच स्तुती करीत आहेत म्हणायचे! एकही माणूस अंबारीत विराजमान झालेल्या माझ्याकडे पहायला तयार नाही! सर्वांची दृष्टी या हत्तीवरच खिळली आहे. याची शिक्षा म्हणून काहीतरी उपाय योजून या हत्तीची विल्हेवाट लावली पाहिजे.’’

दुसर्‍या दिवशी सकाळी राजाने माहुताला बोलाविले व त्याला विचारले, ‘‘काय रे, तो पांढरा हत्ती चांगला प्रशिक्षित आहे काय?’’ 


‘‘त्याला योग्य प्रशिक्षण देऊन अंबारीचा हत्ती मीच बनविले, प्रभू!’’ माहूत म्हणाला. ‘‘काय की! तुझ्या सांगण्यावर माझा विश्‍वास नाही. नुसता अहंकारी व मानी हत्ती असावा अशी मला शंका वाटते आहे.’’ राजा म्हणाला.

‘‘तसं काही नाही, प्रभू!’’ माहूत म्हणाला. ‘‘बरं, तू सांगितल्याप्रमाणे जर चांगल्या तालमीत वाढलेला तो हत्ती असेल तर तू त्याला समोरच्या पर्वतशिखरावर चढवू शकशील का?’’ राजाने विचारले. ‘‘चढवू शकतो, महाप्रभू!’’ असे म्हणून माहुताने क्षणभरात त्या अंबारीच्या हत्तीला पर्वतशिखरावर चढविले.

राजा काही दरबा-यांना बरोबर घेऊन मागाहून पर्वतावर चढला. शिखराचा थोडासा भाग सपाट होता व पुढे कुशाग्र सुळा होता. राजाने ‘‘हत्तीला तिथे थांबव,’’ असे माहुतास सांगितले.

‘‘तू याला कसे प्रशिक्षित केले आहेस, बघूया! हत्तीला तीन पायांवर उभे कर!’’ राजा म्हणाला.

लगेच माहुताने हत्तीच्या मस्तकावर अंकुश ठेवले व त्याला सावध करीत म्हणाला - ‘‘बाबा रे! महाराजांची आज्ञा आहे, तीन पायांवर उभा रहा बरे!’’ हत्तीने तसेच केले. राजा, ‘‘अहा! छान!’’ असे म्हणाला. व ‘‘आता पुढच्या दोन पायावर उभा राहू शकतो का बघ.’’ अशी आज्ञा दिली. माहुताचा इशारा मिळताच हत्ती पुढच्या दोन पायांवर उभा राहिला.  


‘‘हेही छान आहे! आता मागच्या दोन पायांवर उभे रहायची आज्ञा दे!’’ राजा म्हणाला. त्यासरशी हत्ती मागच्या दोन पायांवर उभा राहिला. ‘‘एका पायावर उभा राहू शकतो का?’’ म्हणून राजाने माहुताला विचारले. हत्ती एका पायावर सहज उभा राहिला. नाना त-हेने त्रास दिला तरी हत्ती पर्वतशिखरावरुन खाली पडला नाही, हे पाहून राजाच्या मनाचा जळफळाट झाला. ‘‘एवढीशी तालीम दिली तर कोणताही हत्ती हे सारे करु शकेल. आणखी एक परीक्षा घ्यावी म्हणतो!’’ राजा म्हणाला.

‘‘जशी आपली आज्ञा! ती परीक्षा कोणती, महाप्रभू?’’ माहुताने विचारले. ‘‘हत्ती जसा आपल्या पायांनी या पर्वत-शिखरावर चढला तसाच अधांतरी हवेत चालेल असे कर. ही माझा आज्ञा आहे!’’ राजा म्हणाला. ते ऐकताच राजाचा दुष्ट हेतू माहुताच्या लक्षात आला. परंतु थोडेसुद्धा न डळमळता माहुताने हत्तीच्या कानांत हळूच असे सांगितले - ‘‘बाबा रे! तू या पर्वतशिखरावरुन घसरुन खाली पडावेस म्हणून राजाने हा कट रचला आहे. त्याला तुझे मूल्यांकन करता आले नाही. तुझ्यात जर अद्वितीय शक्ती असेल, तर तू असाच या कड्यावरुन पुढे हवेत चालत जा.’’

अद्भुत् शक्तींचा महिमा असलेला तो हत्ती पर्वतशिखरावरुन तसाच पुढे गेला व अधांतरी तरंगत जाऊ लागला. तेव्हा माहूत असे म्हणाला - ‘‘हे राजा! हा हत्ती असामान्य अशा दैवीशक्तींचा अंश असून तुझ्यासारख्या गाजरपारख्याच्या अंबारीचा प्रमुख हत्ती होण्याच्या योग्यतेचा नाहीच नाही! किंमत न जाणणारे तुझ्यासारखे मूर्ख, अशा हत्तीलाच नव्हे तर, अमूल्य अशा कोणत्याही गोष्टीला गमावून बसतात. असे मूर्ख स्वतःच्या अविवेकाची प्रौढी दहा लोकांमध्ये मिरवीत असतात.’’  


हवेत चालत जात हत्ती काशी राजाच्या उद्यानात अधांतरी उभा राहिला. हे पाहून काशीचे पौरजन आनंदाने ते दृश्य पहाण्यासाठी उद्यानाभोवती गोळा झाले.

ही वार्ता राजाच्या कानी आली. काशीराज त्वरेने राजोद्यानात आला व हत्तीकडे पहात हात जोडून म्हणाला - ‘‘गजराजा! तुझ्या येण्यामुळे माझे राज्य पावन झाले. खाली उतरून ये, अशी मी प्रार्थना करतोय!’’

राजाने असे म्हणताच हत्तीच्या रूपांत असलेला बोधिसत्त्व खाली आला. राजाने विचारले असता माहुताने घडलेली हकिगत सांगितली. ती ऐकून काशी राजाला व तिथे जमलेल्या नागरिकांना अत्यानंद झाला. राजाने हत्तीला श्रृंगारले व त्याच्यासाठी सुंदर गजशाला बनविली व त्याची उत्तम व्यवस्था राखायची सोय केली.

त्यानंतर राज्याचे तीन समान भाग केले. एक भाग हत्तीच्या रूपात असणार्‍या बोधिसत्वाच्या पोषणाकरिता नेमून दिला. दुसरा भाग माहुताला दिला व तिसरा स्वतःसाठी ठेवला. बोधिसत्त्वाने काशीराज्यात पाऊल टाकताच काशी राजाचे ऐश्‍वर्य, धन-संपदा व वैभवाची दिवसेंदिवस अभिवृद्धी होऊ लागली. त्याची कीर्ती दशदिशांमध्ये पसरली.  


No comments:

Post a Comment