Thursday, 7 February 2013

राजभक्ति


निश्‍चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ आला. त्याने झाडावरुन शव खाली उतरवले आणि खांद्यावर घेतले. तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला. तेव्हां प्रेतांत लपलेल्या वेताळाने म्हटले, ‘‘राजन, तुझा आग्रह आणि पराक्रम वाखाणण्याजोगा आहे. म्हणून तुझे अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. तुझ्यांत जसे कांही सद्गुण आहेत, तसेच कांही दोषदेखील आहेत. ते दोष जर तू सुधारले नाहीस तर त्यांत तुझेच नुकसान आहे. मला इतकंच वाईट वाटतं कीं जिथें तुझ्यांत चिकाटी आहे, शौर्य आहे, प्रेमाची भावना आहे, तिथें जरा तर्क-शक्तीचा अभाव आहे. कोणताही विषय तर्काच्या कसोटीला लावून पाहिला पाहिजे. आणि नंतरच त्याविषयीची कार्यसिद्धी केली पाहिजे.

नाहीतर अनर्थ ओढवेल. कुणाचेतरी भले होण्याऐवजी त्याचे नुकसान होईल. मला वाटतं वीरदत्ताप्रमाणें तुझ्यामधेही खोलवर विचार करण्याची वृत्ती नाही. कोणत्याही विषयाचा अगदी सखोल विचार करणें अतिशय जरूरीचे असते. नाहीतर खरं काय आहे ते समजतच नाही. मी तुला तुझे विचार सुधारण्याची संधी देतो आहे. त्याच वीरदत्ताची गोष्ट तुला सांगतो. मात्र नीट लक्ष देऊन ऐक.’’ आणि वेताळाने पुढील गोष्ट सांगितली.

फार पूर्वींची गोष्ट आहे ही. केयूर देशांत वीरदत्त नांवाचा एक तरुण होता. तो एक श्रेष्ठ योद्धा होता. सर्व प्रकारच्या युद्ध विद्यांमधें तो निपुण होता. मल्लयुद्ध, धनुर्विद्या, गदायुद्ध वगैरे सर्व क्षत्रियांच्या विद्यामधें तो प्रवीण होता.

त्याखेरीज शास्त्रांचादेखील त्याचा उत्तम अभ्यास होता.
केयूर राज्याच्या सेनापतीचा अकाली मृत्यू झाला. त्या पदावर योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी शोध सुरुं झाला. त्यासाठी राजधानीमधें एक खास स्पर्धा ठरविण्यांत आली.
या स्पर्धेंत भाग घेण्याचे वीरदत्तने ठरवले. राज्याच्या या महत्वाच्या जागेवर आपली नेमणूक व्हावी अशी त्याची महत्वाकांक्षा होती. जेव्हां त्याच्या वडिलांना मुलाची ही इच्छा समजली तेव्हां त्यांनी वीरदत्ताला म्हटले, ‘‘मुला, राजाची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी! लहानशा चुकीसाठी तुला प्राणांची किंमत मोजावी लागेल. सांपाच्या फण्याखाली तुला आयुष्य घालवायचे आहे कां? इथेंच रहा आणि शेती कर. आरामांत जगता येईल त्याबद्दल निश्‍चिंत राहा.’’

वीरदत्ताला आपल्या वडिलांचा उपदेश कांही आवडला नाही. त्याने आपली नापसंती दर्शवून म्हटले, ‘‘मी इतक्या विद्या शिकण्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती. त्यांत मी प्राविण्य मिळवलंय. तेव्हां जर माझी राजाच्याकडे वर्णी लागली तर या कष्टांचे सार्थक होईल.’’ पित्याने त्याला खूप समजावले, परंतु त्याने आपला हट्ट सोडला नाही. तो स्पर्धेंत भाग घेण्यासाठीं राजधानीला निघून गेला.

तिथें भाग घेण्यासाठी कितीतरी शूरवीर आलेले होते. पहिली फेरी होती शारिरीक बल आणि सामर्थ्य, व्यायाम, योगविद्याज्ञान, व पारंपारिक क्षात्रविद्या! त्यामधे वीरदत्त सहज जिंकला. अशा प्रकारचे स्पर्धेचे इतरही अनेक सामने होते, त्यांत त्याने इतरांना हरवले आणि सर्व स्पर्धांमधे तो पहिला आला.
त्यानंतर होती तोंडी परीक्षा! केयूर देशाच्या शेजारची मित्रराष्ट्रें व शत्रूराष्ट्रांबद्दल अनेक प्रश्‍न त्याला विचारण्यांत आले. वीरदत्ताने सार्‍या प्रश्‍नांची योग्य उत्तरें दिली. आता मात्र त्याला वाटायला लागलं कीं त्याचीच नेमणूक सेना-पतीच्या जागी होणार. जेव्हां त्याची राहाण्याची व्यवस्था एका मोठ्या वाड्यांत केली गेली. तेव्हां तर त्याची खात्रीच पटली.
दुसर्‍याच दिवशी केयूर देशाचे प्रधानमंत्री त्रिनाथ स्वतः वीरदत्तला भेटायला त्याच्या वाड्यावर आले. प्रथम त्यांनी त्याचे शौर्य व बुद्धिमत्ता याची भरपूर स्तुती केली. नंतर ते म्हणाले, ‘‘आम्हाला खात्री वाटते कीं सेनापती होण्यासाठी लागणारे सारे गुण तुझ्यांत आहेत. देशाचे रक्षण करणारे हे पद अतिशय जोखमीचे आहे. ते पद सांभाळण्याची योग्यता तुझ्यांत आहे कीं नाही, त्याची चांचणी अजून व्हायला हवी. त्यासाठीं तुला आणखी कांही दिवस इथें राहावे लागेल. पुढील सहा महिने तुला महाराजांच्या दरबारांत काम करायला हवे. जी कामें तुझ्यावर सोंपवली जातील, ती दिलेल्या अवधींत पुरी करावी लागतील. तुला आत्ता कोणतेही पद मिळणार नाही. परंतु त्यानंतर मात्र मी सांगितल्यावर तुला सेनापतीचा मान दिला जाईल.’’

त्यानंतर दोन महिने तसेच गेले. वीरदत्तावर कोणतेच काम सोंपवले गेले नव्हते. एक दिवस अचानक त्रिनाथांकडून त्याला बोलावणें आले. तो मंत्रींना भेटायला गेला.
त्रिनाथने वीरदत्ताचे सादर स्वागत केले आणि म्हटले, ‘‘वीरदत्त, गुप्तचरांच्या प्रमुख अधिकार्‍यां कडून आत्ताच एक महत्वाची बातमी मिळाली आहे. आमचे महाराज केयूरसिंह यांची एक जुनी संवय आहे. ते महाराणींना घेऊन नित्यनेमाने रोज उद्यानवनांत फिरायला जातात. त्यांच्या अंगरक्षकांनादेखील तिथें जाण्याची अनुमती नसते. शत्रूला ही माहिती मिळालीय, आणि त्यांनी महाराजांना तिथेच मारण्याची योजना तयार केली आहे. आजपासून महाराज व महाराणींच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर सोंपवलेली आहे. त्यावेळेस तू उद्यानवनांत राहिलं पाहिजेस. पण तू तिथें आसपास आहेस हे राजदांपत्याला मुळींच कळता कामा नये. जर त्यांना कळलं कीं त्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कुणीतरी त्या उद्यानांत आहे, तर तुला कठोर शिक्षा दिली जाईल. तेव्हां सावध रहा.’’
वीरदत्ताने ही जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या दिवसापासून तो महाराज व महाराणींच्या पाठीमागून हिंडत राहूं लागला. परंतु त्याचे अस्तित्व त्यांना जाणवणार नाही याची काळजी तो अवश्य घेत होता. चार दिवस उलटले.

पांचव्या दिवशी अकस्मात राजदांपत्याला चौघा जणांनी येऊन घेरले. महाराज केयूरसिंह त्यांच्याशी सामना करणार इतक्यांत वीरदत्ताने आपली तलवार उपसली आणि त्यांच्यावर तो चालून गेला. ते हल्लेखोर घाबरुन पळाले.

वीरदत्ताने राजदंपतीला प्रणाम केला आणि त्याने गेले चार दिवस तो त्यांच्या नकळत कसा त्यांच्या पाठीशी रक्षणार्थ सज्ज होता, हे त्यांना सांगितले. हे ऐकून केयूरसिंहाने ताबडतोब वीरदत्ताला तुरुंगात टाकण्याची आज्ञा दिली.
वीरदत्ताला भेटायला त्याच रात्रीं महामंत्री त्रिनाथ तुरुंगात आले. सगळी हकीकत समजून घेतल्यानंतर त्यांनी वीरदत्ताला सहानुभूती दाखवत म्हटले, ‘‘वीरदत्त, तुला उद्यां दरबारांत उपस्थित व्हावे लागेल. महाराज तुला कठोर शिक्षा देतील, हे निश्‍चित आहे. दरबारांत असली घोर संकटे नेहमीच येत असतात. झालं ते झालं, तुझ्यावरही सध्यां जे संकट कोसळलं आहे, त्याला एका दृष्टीने मीच कारणीभूत आहे. म्हणून मी तुला सल्ला देतो कीं तू इथून पळून जा. त्यासाठीं मी आवश्यक ती व्यवस्था केलेली आहे. महाराज रागावले तरी मी कांहीतरी सांगून त्यांचा राग शांत करीन व समजूत घालीन.’’
वीरदत्तने क्षणभर विचार केला आणि म्हटले, ‘‘महामंत्रीजी, आपण जी जबाबदारी माझ्यावर सोंपवली होती, ती मी योग्य रितीने निभावली आहे. महाराज मला उद्यां काय शिक्षा देतील त्याची मी चिंता करणार नाही, मी कांही पळूनबिळून जाणार नाही. कारण मी चूक केलेलीच नाही. आपण मला उदार मनाने ही पळवाट देऊं केलीत, त्याबद्दल धन्यवाद!’’ हे ऐकून मंत्रीजी मनांतल्या मनांत समाधानाने हंसले आणि वीरदत्ताच्या खांद्यावर थोपटल्या-सारखे करून ते तिथून निघून गेले.
वेताळाने ही गोष्ट सांगितली आणि विक्रमार्काला म्हटले, ‘‘राजन्, असं शक्य आहे कीं वीरदत्त जरी अगदी शूरवीर असला तरी त्याबरोबर तो महामूर्खदेखील आहे असं मला वाटतं. वडिलांचा सल्ला न मानता त्याने राजदरबारांत नोकरीसाठीं जायचे ठरवले, हा विचारही मूर्खपणाचाच होता. महामंत्र्यांचा सल्लाही त्याने धुडकावून लावला आणि तुरुंगातच थांबण्याचा निर्णय घेतला, हा ही मूर्खपणाच! ज्या महाराजांचे प्राण त्याने वांचवले, त्याच महाराजांनी त्याला कैदेत टाकले. अशा कठोर व कृतघ्न राजावर त्याने कसा विश्‍वास टाकला? तो दरबारांतल्या न्यायनिवाड्यासाठीं कां तयार झाला? याचे उत्तर माहीत असूनही तू जर गप्प बसलास तर तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील.’’

विक्रमार्क राजाने वेताळाच्या प्रश्‍नांची उत्तरें देत म्हटले, ‘‘वीरदत्त हा एक निश्‍चितच श्रेष्ठ वीर आहे. त्याला मूर्ख समजणें हाच मूर्खपणा आहे. असा गुणवंत राजाच्या दरबारांत काम करायला योग्य आहे. याच कारणामुळें सेनापती बनण्याची आकांक्षा मनांत धरुन वीरदत्ताने स्पर्धांमधे भाग घेतला. महामंत्री त्रिनाथांनी जे म्हटलं होतं कीं केवळ पराक्रम व युद्धतंत्राचे ज्ञान या दोन गोष्टी म्हणजे सेनापती बनण्यासाठीं पुरेसे मापदंड नाहीत.

राजदंपतीच्या रक्षणासाठी तो एकटाच चार दुष्टांच्यावर चालून गेला. राजदंपतीची शांतता वीरदत्ताने बिघडवली ही केवळ एक सबब आहे. वीरदत्ताला बंदिशाळेंत ठेवणें, दुसर्‍या दिवशी न्याय करणें ही राजा व मंत्री यांची एक खेळी होती. त्याची स्वामीभक्ती, देशभक्ती व कर्तव्यपरायणता पाहाण्यासाठीं त्यांनी हा एक मार्ग अनुसरला. मंत्र्यानी त्याची तुरुंगातून पलायन करता येईल अशी व्यवस्थादेखील केली होती, तरीसुद्धां वीरदत्ताने पळून जायला नकार दिला. त्यामुळें त्याची राजभक्ती सिद्ध झाली. म्हणून मंत्री मनांत खूष झाले व त्यांनी वीरदत्ताची पाठ थोपटली. याचा एकच अर्थ निघतो कीं सेनापती बनण्यास वीरदत्त सर्वस्वी पात्र होता आणि त्यासाठी घेतलेल्या सर्व कसोट्यांमधें तो यशस्वी झाला होता.’’

राजाचे मौनभंग झाल्यामुळें वेताळ शवासहित अदृश्य झाला व पुन्हां झाडावर जाऊन बसला.

(आधार - शैलजा व्यास यांची रचना)

No comments:

Post a Comment