Sunday, 17 February 2013

डुक्कराचे वाघाला आव्हान!

डुकरे ही नेहमीच घाणेरडी गणली जातात. पण पूर्वीच्या काळी ती तशी नव्हती. अरण्यांतल्या इतर प्राण्यांसारखी तीही स्वच्छ असत. ही डुकरे घाणेरडी कशी झाली त्याची एक मजेदार गोष्ट आहे. मेघालयातल्या अरण्यांत सगळी जनावरे खेळीमेळीने राहात होती. अरण्यांत सर्वांना पुरेसे खाद्य, गवत, इत्यादि भरपूर होते. एके दिवशी एक वाघ भक्ष्य शोधण्यासाठी निघाला.

त्याला पोटभर प्राणी खायला मिळाले. जिभल्या चाटत तो पाण्याच्या शोधांत निघाला. इकडेतिकडे हिंडल्यानंतर त्याला एक लहानसा तलाव दिसला. तो काठाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. त्याच वेळी एक डुकराचे पिल्लू चिखलांत खूप वेळ खेळत होते. आणि समोरच्या बाजूला तेही पाण्यांत शिरुन पाणी पिऊ लागले. त्याने जेव्हा वाघाला पाहिले, तेव्हा ते भीतीने गारठले. त्याला पळून जाणे व बचाव करणे अगदी अशक्य होते.इकडे वाघाला इतकी तहान लागली होती की ते पिल्लू त्याला दिसलेच नाही. वाघ पाणी प्यायला खाली वाकला, आणि सटकन मागे सरला. पाणी अतिशय गढूळ होते आणि त्याला घाणेरडा वास येत होता. त्या पिल्लाच्या अंगावरचा चिखल पाण्यांत मिसळला गेला होता. दुर्गंधी तर इतकी भयंकर होती की ते पाणी सोडून वाघ दुसरीकडे पाणी शोधायला निघाला.

वाघाची ही माघार पाहून ते पिल्लू प्रथम गोंधळून गेले. पण ते जरा धीट होते त्यामुळे त्याला वाटलं की वाघ आपल्यालाच घाबरला! नाहीतर तो इतक्या घाईने परत कशाला जाईल? त्या लहानग्या डुकराला आपण हत्तीसारखे बलवंत आहोत असं वाटलं. ते वाघामागे पळायला लागलं. त्याने वाघाला म्हटलं, ‘‘वाघोबादादा, परत येऊन माझ्याशी दोन हात करा. घाबरट कुठले. पळून जाऊ नका असे!’’
वाघ तहानलेला होता. त्याला काही आत्ता भांडायची इच्छा नव्हती. नुसती मान मागे वळवून तो गुरगुरला, ‘‘मी आज तुझ्याशी लढणार नाही. याच वेळेला तू उद्यां इथें ये आणि मग आपला सामना होईल.’’ पिल्लाची मात्र समजूत झाली की वाघ घाबरलाय म्हणून तो संधी शोधतोय! डुकराला आणखीनच चेव चढला व तो फुशारुन गेला.

धावतच घरी जाऊन त्याने घरीदारी सर्वांना जाहीर केले, ‘‘वाघोबा मला घाबरतो. तेव्हां आता मी यापुढे वनराज होणार!’’ घरांतल्या सर्व डुकरांना बोलावून त्याने जे घडलं ते सविस्तर सांगितलं. ते ऐकून थक्क झाले. वाघाने तलावांतलं पाणी का प्यायलं नसेल व तो तिथून का निघून गेला असेल, त्याचे कारण त्यांनी लगेच ओळखले. त्या पिल्लाला असा अगोचरपणा केल्याबद्दल सगळेच रागावले. वाघाला आव्हान देण्यांत आपण केवढी मोठी चूक केलीय ते डुकराला समजलं.

आता मात्र त्याची बोबडीच वळली. दुसर्‍या दिवशी वाघाच्या जेवणासाठी आपला बळी ठरलेलाच आहे असं त्याला वाटलं. नातवाची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याचे म्हातारे आजोबा कासावीस झाले. छोट्या डुकराचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. आणि त्यांनी त्या लहान डुकराला सांगितले, ‘‘तू कबूल केलं आहेस ना? मग ठरल्याप्रमाणे वाघाला भेट. नाहीतर तो इथे येऊन आम्हाला सगळ्यांना मारुन टाकील. पण त्याला भेटण्यापूर्वी तू चिखलांत भरपूर लोळ, म्हणजे तुझ्या अंगाला घाणेरडा वास येईल.’’


आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते छोटे डुक्कर घाणीत लोळले, आणि चिखल, हत्तीचे शेण, गुरांचा कचरा, वगैरे रानांतल्या गलिच्छ जागी ते यथेच्छ बागडले. अंगभर चिकटलेली ती घाण घेऊनच ते वाघाच्या भेटीला गेले. इकडे वाघ त्या पिल्लाची वाट बघतच होता. सामना संपला की त्या पिल्लावर ताव मारायचा हे त्याने आधीच ठरवलेले होते.

जेव्हां डुकराचे पिल्लू जवळ आले, तेव्हां त्या घाणीचा दर्प सहन न होऊन वाघ मागे सरला. ‘‘हे रे काय? तुझ्या अंगाला किती घाण वास मारतोय! शी शी शी !!!’’ ‘‘तू सांगितल्याप्रमाणे मी आलोय इथे. मी आपला माझ्या आजोबांनी शिकवलेले शेणगोळे फेकण्याचे काही प्रकार करुन पाहात होतो.’’ असं म्हणून डुकराचे पिल्लू किंचित पुढे आले.

वाघाला तो दुर्गंध सहन होईना. त्याला मळमळायला लागले. ‘‘चालता हो! माझ्याजवळदेखील येऊ नकोस!’’ तो संतापाने गुरगुरला. डुकराने नाराज झाल्याचे नाटक केले, व विचारले, ‘‘आणि आपल्या सामन्याचे काय?’’

‘‘गप्प बैस! मी नाही तुझ्याबरोबर लढणार,’’ वाघ मागे फिरत ओरडला. घाणीचा वास असह्य होत होता त्याला. डुकराचे पिल्लू मात्र आनंदाने उड्या मारत घरी गेले. त्याच्या कुटुंबियांना समजलं की घाणीनेच त्याला वाचवलं होतं. त्या दिवसापासून घराबाहेर पडले की सारी डुकरे प्रथम घाणीत लोळायला लागली. आजही ती तेच करतात.

No comments:

Post a Comment