Thursday, 7 February 2013

मौन योगी


निश्‍चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हां झाडावर चढला. त्याने झाडावरून शव खाली उतरवले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊं लागला. प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन, या रात्रींच्या वेळीं गडद अंधार आहे, भुतेप्रेते, विषारी सर्प, हिंस्त्र श्‍वापदें इकडेतिकडे दिसत आहेत. पण त्याची क्षिती न बाळगता तू पुढे चालतो आहेस. हे बरोबर आहे कां?

साहस, परिश्रम, निश्‍चय यांची पण एक सीमा असते. तू जर कुणा महात्मा किंवा महायोगी यांना मदत करायची म्हणून हे कष्ट सहन करतो आहेस कां? तर तुझी ही घोडचूक ठरेल. कारण हे लोक राजाच्या आश्रयाने राहून सुख उपभोगत असतात.

अशा संधीचा ते पुरेपूर फायदा उठवतात. ते अतिशय स्वार्थी असतात. तुला मी उदाहरण म्हणून कनकसेन राजाची गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकून तुझा थकवा दूर होईल व तुझा विचारही बदलूं शकेल.’’ वेताळाने त्या दोघांची गोष्ट सांगायला सुरवात केली.
ममतापुरी नगर करुणा नदीच्या कांठावर होते. तिथें एक मोठे वडाचे झाड होते. त्या वृक्षाच्या छायेंत एक योगी राहात होता. लोकांना प्रथम तो वेडा आहे असं वाटत असे. पण तो वेडा नव्हता, त्याची बुद्धि भ्रष्ट झाली होती. त्याने कुणाचेही अकल्याण केले नव्हते. तेव्हां नंतर लोक म्हणूं लागले कीं हा वेडा नसून एक योगी आहे.
तो नेहमी मौन पाळी. कोणत्याही प्रश्‍नाला तो उत्तर देत नसे. कुणी फळें आणली तर ती तो खात असे. कांही जण तर म्हणत, कीं तो मुका व बहिरा आहे.

एकदा एक बैल त्या भागांत घुसला. आपल्या शिंगाने तो लोकांना जखमी करूं लागला. त्याला पकडायला लोक जमले व त्याचा पाठलाग करुं लागले. बैल धांवत येऊन वडाच्या झाडाजवळ आला. योगी तिथें बसलेला होता. लोक घाबरले. व ओरडूं लागले, ‘‘योगी महाराज, पळा, पळा! नाहीतर बैल तुमच्यावर चालून येईल.’’

पण योगी हलला नाही कीं डुलला नाही. बैल दमलेला होता. तो योग्याजवळ आला, दोन क्षण उभा राहिला आणि तिथेंच जमिनीवर बसला. त्या छायेंत जणूं तो विश्रांति घेत होता.
बैल खाली बसला यांत योग्याचा कांहीच प्रभाव नव्हता. पण ते दृश्य पाहून लोकांनी निराळाच अर्थ काढला. एक म्हणाला, ‘‘हा योगी नुसता मुका व बहिराच नाही, तर तो आंधळा देखील आहे. नाहीतर धांवत येणारा बैल पाहून तो स्वस्थ कसा बसला असता?’’

दुसरा म्हणाला, ‘‘हे एक महायोगी आहेत. त्यामुळें हा उन्मत्त बैलदेखील त्यांच्यासमोर शांतपणें बसला आहे. यांच्याजवळ अद्भुत व अमोघ शक्ती आहेत. हे इथे राहिले तर आपल्या शहराला त्याचा फायदाच होईल.’’ अशा रितीने त्या योग्याचे महत्व गांवात पसरले.

त्या दिवसापासून योग्याला पाहाण्यासाठीं मोठ्या संख्येने लोक येऊं लागले. येतांना ते कांही ना कांही भेट घेऊन येत. पण त्या वस्तू तो योगी स्वतःसाठी ठेवत नसे. त्याच्या दर्शनाला येणार्‍या इतर भक्तांना तो त्या वस्तू वाटून टाकी. योग्याच्या त्यागी स्वभावाची प्रशंसा होऊं लागली. योगी असावा तर असा त्यागी असावा, असं लोक सतत म्हणूं लागले.
कांही लोक योग्याला आपल्या समस्या सांगू लागले. पण तो कांहीही उत्तर देत नसे. समस्या सांगणाराच मग आपल्याला सोईस्कर असा त्यांतून अर्थ काढीत असे आणि नंतर म्हणे, ‘‘हे करणं बरोबर आहे ना महाराज? असं केलं तर आमचं भलं होईल ना?’’

योग्याची वागण्याची पद्धत फार विचित्र होती. असं वाटे, कीं तो ऐकतोय किंवा कधी वाटे तो ऐकतच नाही. अधूनमधून त्याचं डोकं होकार दिल्यासारखं हालतंय असं वाटे. कधीकधी नकार दिल्यासारखी मान हालतेय असंही वाटे. म्हणून लोक त्याला नंतर संकेत योगी म्हणूं लागले.

ममतापुरी व आसपासच्या गांवात योग्याची खूप प्रसिद्धी झाली. आता भक्तांची रीघ सुरुं झाली व ते किंमती भेटवस्तू देऊं लागले. कांही लबाड लोकांनी आपला फायदा करण्याचा एक नवीन उपाय शोधला. वटवृक्षाच्या चारी बाजूंना त्यांनी कुंपण घातले. जे लोक योग्याचे दर्शन घ्यायला येत, त्यांच्याकडून त्यांनी पैसे गोळा करायला सुरवात केली. ते सांगायला लागले कीं योगीबाबांच्या संमतीने एक आश्रम स्थापन होणार आहे. त्यासाठीं ते देणग्या जमवायला लागले होते. ते पैसे ते आपसांत वांटून घेत असत. शेवटी तर योग्याच्या आहाराविषयीदेखील कांही ना कांही खोटंनाटं सांगून ते पैसे उकळायला लागले. रात्रीं योग्याला दोनतीन रोट्या फक्त खायला देत होते. तरीही योगी मौनव्रत धरुन होता. असेच दिवस चालले होते.
कनकसेन राजाला योग्याच्याबद्दल माहिती समजली कीं तो मुका, बहिरा व आंधळा आहे. हा योगी एकदा आपण पहावा असे राजाच्या मनांत आले. एक दिवस सगळे भक्तगण परत गेल्यानंतर राजा वेष पालटून तिथें आला.
योग्याच्यासमोर एका पानावर फक्त दोन लहान रोट्या होत्या. थोड्या अंतरावर एक मशाल जळत होती. त्या उजेडांत राजाला योग्याच्या डोळ्यांत अश्रू आलेले दिसले. योग्याच्या आयुष्यांत कांहीतरी दुःखद घटना घडलेली असावी असा राजाने तर्क केला.
‘‘महाराज, मी या देशाचा राजा आहे. लोकांच्या दृष्टींत आपण मूक, बधिर आणि अंध असालही.  त्यांना आपले मन समजले नसेल म्हणून त्यांनी हे पंगुत्व आपल्यावर लादले, आहे. मला तर वाटतं कीं आपण विकलांग नसून हे लोक विकलांग आहेत. पण आता आपण कांहीतरी बोलावं अशी वेळ आलेली आहे. कृपा करुन आपण मला आपल्याबद्दल कांहीतरी सांगावं.’’ कनकसेन राजाने योग्याला विनंती केली.

‘‘महाराज, आपले बोलणें ऐकून मी आता मौनव्रत सोडायचा निश्‍चय केला आहे. आपणे कांही बोलण्यापूर्वींच आपण कुणी महान व्यक्ती आहात हे मी ताडलं होतं. सत्याची ताकद विलक्षण असते. त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारचे मौन किंवा असत्याचे अस्तित्व टिकत नाही.’’ योग्याने गंभीर स्वरांत म्हटले.

हा योगी एक असाधारण व्यक्ती आहे हे राजाने ओळखलं. त्यांच्याविषयीं त्याच्या मनांतली आदराची भावना वाढली. योगी पुढें बोलूं लागला, ‘‘महाराज, खरी दृष्टी तर आपल्या मनाची दृष्टी असते. म्हणून मी निश्‍चय केला कीं जे डोळे सत्य पाहूं शकत नाहीत. त्यांचा काय उपयोग? तेव्हांपासून मी डोळे मिटून घ्यायचे ठरवले. त्या दिवसपासून मी जे कांही या डोळ्यांनी पाहातो. त्याचा परिणाम माझ्या मनावर अजिबात होत नाही. म्हणून दृष्टी असूनदेखील मी आंधळा आहे.
‘‘महात्मन्, जनता आपल्याला केवळ अंधच नव्हे, तर मूकबधिर आहात, असं समजते. आपल्या या वागण्याचं कांही विशेष कारण आहे कां?’’ राजाने विचारलं.

होय महाराज! माझ्या पत्नीचा एक लाडका भाऊ होता. त्याने व्यापार केला आणि सारे कांही गमावले. कर्जाच्या डोंगराखाली तो दबून गेला होता. माझ्या पत्नीला त्याची ही दुरावस्था सहन होईना. तिच्या मनधरणीवरून मी माझ्या पांच-एकर शेतीमधली तीनएकर जमीन गांवातल्या सावकाराकडे गहाण ठेवली व ती रक्कम माझ्या मेव्हण्याला दिली. त्याने मला वचन दिलें कीं तो शहरांत जाऊन व्यापार करेल आणि जो फायदा होईल त्यांतून वर्षांच्या आंत माझी जमीन सावकाराकडून सोडवेल. पण एक वर्ष पूर्ण झालं तरीही त्याने रक्कम परत दिली नाही, किंवा तोंडही दाखवले नाही. त्या दरम्यान सावकाराने माझ्यामागे तगादा लावायला सुरवात केली. दुसरा कांही मार्ग सुचेना म्हणून मी एका जवळच्या नातेवाईकाकडे जाऊन उसने पैसे मागितले. पण देण्यास त्याने नकार दिला. मी जेव्हां आठवड्या-नंतर गांवी परत आलो.
तेव्हां तो सावकार गांवातल्या पारावर बसला होता. कांही गांवकरी व पाटीलही बरोबर होते. मला पाहिल्याबरोबर त्या सर्वांनी मिळून मला बजावले कीं पंधरा दिवसांच्या आंत सारी रक्कम चुकती केली नाही तर शेताबरोबर घरावरही कबजा केला जाईल.

‘‘महाराज, सामान्य गृहस्थाला काय किंवा देशाच्या राजाला काय, आपली प्रतिष्ठा व स्वाभिमान तितकीच महत्वाची असतात. मी घरांत पाऊल ठेवताच माझी पत्नी हंसतमुखाने समोर आली. तिला कांहीतरी सांगायची इच्छा होती. पण त्यावेळीं पारावर माझा जो सर्वांसमक्ष अपमान झाला होता, त्यामुळें मी संतापलो होतो. मी तिच्या माहेरच्या सर्वांना व भावाला यथेच्छ शिव्या दिल्या. ती रडत रडत घराच्या मागील दारी गेली. मी तिच्या जाण्याकडे दुर्लक्ष केले. मी मुकाट्याने घरांत गेलो. तर तिथे मला एक पत्र दिसलं. त्यांत तिच्या भावाने लिहीलं होतं कीं आठवडाभरांतच पूर्ण रक्कम घेऊन तो परत येणार होता.’’ असं म्हणून योगी डोळे टिपूं लागला.

‘‘तुमच्या पत्नीने मागील दारच्या विहिरींत उडी टाकून आत्महत्त्या केली. होय ना स्वामीजी?’’ राजाने विचारलं ‘‘हो तसंच झालं. ते पाहिल्यानंतर घराचे दारदेखील लोटून न घेता मी घर सोडले. असाच भटकत राहिलो. शेवटी नदीकिनार्‍यावरच्या या वडाच्या झाडाखाली मौन धारण करुन बसून राहिलो.’’
‘‘स्वामीजी, लोक म्हणतात कीं आपण फार थोर आहात. आपल्याजवळ अद्भुत सिद्धी आहेत. हे खरं आहे कां?’’ राजाच्या स्वरांत उत्सुकता पुरेपूर भरलेली होती.

‘‘कांही लबाड, स्वार्थी आणि धोकेबाज मंडळी आहेत. ते असा खोटा प्रचार करीत असतात. आपले खिसे भरत राहातात. रात्रंदिवस या समस्येमुळें मी त्रस्त असतो. पण मला ही समस्या सोडवता येत नाही. मी असहाय्य आहे.’’ योग्याने दुःखित अंतःकरणाने सांगितले.

दुसर्‍या दिवशी जे भक्त मौनी योग्याच्या दर्शनासाठीं आले, त्यांना निराश व्हावे लागले. त्यानंतर तो योगी कुणालाही कधीही दिसला नाही. फक्त राजालाच ठाऊक होतं कीं त्याचा खासगी सल्लागार म्हणजेच तो मौनी योगी होता.

ही गोष्ट सांगून वेताळ पुढें म्हणाला, ‘‘राजन्, दीर्घकाळ पर्यंत तो योगी आंधळा, मुका व बहिरा बनून राहिला होता. पण राजाला बघून त्याच्या डोळ्यांत अश्रू कां आले? योगी बनून तो जनतेची निःस्वार्थपणें सेवा करत होता. आणि नंतर राजाचा सल्लागार बनला. हा तर स्वार्थ आहे, जनतेची सेवा नव्हे. योग्याचे भणंग आयुष्य जगण्याचा त्याला उबग आला होता. राजाजवळ राहून सुखांत राहण्याच्या इच्छेनेच तो राजाचा सल्लागार बनला होता कां? याचं उत्तर माहीत असूनही तू मौन पत्करलेस तर तुझ्या मस्तकाची शकले होतील.’’

विक्रमार्काने म्हटले, ‘‘राजा कनकसेनाने जे प्रश्‍न त्याला विचारले, त्यावरून राजा ज्ञानी, विवेकी आणि जिज्ञासू आहे हे योग्याने ओळखले. त्याने स्वतःवर आंधळेपण, मुकेपण आणि बहिरेपण लादून घेतले होते. कारण त्याच्यामुळें कोणतीही एखादी वाईट गोष्ट घडूं नये असे त्याला वाटत होते. स्वार्थी व लबाड लोकांची चलाखी त्याला सहन होईना. म्हणून त्याच्या डोळ्यांत पाणी आले. ते बघून योग्याचं मन अशांत आहे व त्याला शांती हवी आहे हे राजाच्या ध्यानांत आलं. राजाच्या मनांत असतं तर तो त्या लबाड लोकांना पकडूं शकला असता. पण ती समस्या तशा तर्‍हेने सुटली नसती. त्यांना पकडले तरी दुसर्‍या प्रकारचे लबाड लोक तिथें जमले असते, आणि त्यांनी आपला फायदा केला असता. म्हणून राजाला वाटले कीं योग्याने तिथें राहूं नये आणि शांततेत जीवन घालवावे. योग्याच्या मनांत सुखासीन आयुष्याची अभिलाषा मुळीच नव्हती.’’
राजाचे मौन भंगल्यामुळें वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

-महेश राठीच्या रचनेवर आधारीत
 

No comments:

Post a Comment