Sunday, 10 February 2013

जगावेगळी पैज

इसापला ज्याने गुलाम म्हणून विकत घेतले होते, त्या झांथसला दारु पिण्याचं व्यसन होत. एकदा त्याचा मित्र म्हणवून घेणा-या एका लुच्चा माणसानं त्याला रात्रीच्या वेळी आपल्या घरी नेऊन चिक्कार दारु पाजली. दारु प्यायल्यामुळं पूर्ण गाफ़ील झालेल्या झांथसला तो लुच्चा गृहस्थ म्हणाला, ''दोस्त ! आपण पैज मारु. तयार आहेस का?'' 

झांथस म्हणाला, ''मारु या की ! अरे, पैज मारायला मी घाबरणारा आहे की काय ? बोल, काय पैज मारायची ?'' 

लुच्चा मित्र म्हणाला, ''पृथ्वीच्या पाठीवर जो महासागर आहे ना, तो एका बैठकीत पिऊन दाखवायचा. आता तुझ्या मानाने मी गरीब आहे, तेव्हा समुद्र पिऊन दाखविण्यात जर मी अयशस्वी झालो, तर मी माझ्या बोटातली ही सोन्याची अंगठी तुला द्यायची. मात्र तू जर का संपूर्ण समुद्र पिण्यात अयशस्वी झालास, तर तू मला तुझा राहता वाडा आणि तुझ्याजवळ असलेलं सर्व सोनं नाणं द्यायचंस, आहे कबूल?''  

दारुच्या नशेत झांथस म्हणाला, ''कबूल म्हणजे कबूल. तहान लागली, की पाच पाच सहासहा प्याले पाणीसुध्दा जर मी एका बैठकीत पिऊन टाकतो, तर केवळ एक दर्या पिऊन टाकणं माझ्यासारख्याला काय कठीण आहे?''

याप्रमाणे बोलणं झाल्यावर, त्या कपटी गृहस्थानं त्या पैजेबद्दलचा करार स्पष्ट अक्षरात लिहिला आणि त्यावर स्वत: सही करुन, झांथसचीही सही घेतली. एवढं झाल्यावर त्याने ती कराराची प्रत स्वत:जवळ ठेवून घेतली आणि झांथसला त्याच्या घरी पोहोचवले.

सकाळी तो नीच गृहस्थ झांथसच्या घरी आला आणि त्याला रात्री झालेला करार दाखवून म्हणाला, ''चल समुद्रावर. रात्री आपण मारलेली पैज पूर्ण करुन दाखवायची आहे ना?''

झांथसनं तो करार वाचला आणि दारुच्या नशेत आपण भलतंच काहीतरी करुन बसलो हे लक्षात येऊन त्याला घाम फ़ुटला. पण इसापला त्या प्रकारची कल्पना येताच त्याने आपल्या मालकाला घरात बोलावले. त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऎकून झांथसचं मन आनंदित झालं. त्याने पटकन हाती एक प्याला घेतला, सोबत इसापला घेतलं आणि तो त्या कपटी मित्रासह समुद्रावर गेला.

समुद्रावर जाताच झांथस त्या कपटी मित्राला म्हणाला, ''हे बघ, ही पैज मारण्याची कल्पना प्रथम तुझ्याच डोक्यातून निघालेली असणार, तेव्हा हा महासागर प्रथम तू पूर्णपणे पिऊन दाखव, नाहीतर सरळ 'पैज हरलो' असं कबूल करुन तुझी सोन्याची अंगठी मला दे.' 


त्या लुच्चा माणसाने विचार केला 'आपली अंगठी गेली तर गेली, पण झांथस हरल्यावर आपल्याला तर त्याचा टोलेजंग वाडा आणि कितीतरी सोनंनाणं मिळणार आहे' असे मनात म्हणून त्याने आपल्या बोटातली सोन्याची अंगठी काढली आणि ती झांथसच्या स्वाधीन केली.

एवढे होताच तो झांथसला म्हणाला, ''हूं ! आता तू पिऊन दाखव हा महासागर, नाहीतर आपला पराभव मान्य करुन, तू आपला वाडा सर्व संपत्ती माझ्या स्वाधीन कर.''

इसापने कानमंत्र दिल्याप्रमाणे झांथस त्या लुच्च्याला म्हणाला, ''पराभव पत्करण्याचा प्रश्न कुठे येतो? मी हा महासागर संपूर्णपणे पिणार. मात्र सध्या या महासागरात जेवढं पाणी आहे, तेवढंच पिऊन दाखवणार बर का?''

''तेवढंच! मी तरी तुला कुठे जास्त पाणी प्यायला सांगतोय ?'' लुच्च्या माणूस म्हणाला.

यावर झांथस म्हणाला, ''तर मग अगोदर या महासागराला मिळणा-या जगातल्या सर्व नद्यांचे प्रवाह बंद कर पाहू ? म्हणजे या महासागरात सध्या जे आहे तेवढं पाणी मी तुला पिऊन दाखवतो.''

झांथसच्या या उत्तरानं तो कपटी मनुष्य एकदम खजील झाला, आणि 'दुस-याची मालमत्ता लबाडीनं मिळवायला गेलो, पण आपली अंगठी मात्र गमावून बसलो' या दु:खानं तडफ़डत तो घरी गेला.

No comments:

Post a Comment