Thursday 7 February 2013

सत्यशोधक

निश्‍चयी विक्रमार्क परत झाडाजवळ गेला. त्याने झाडावरून शव काढले, आपल्या खांद्यावर घेतले व नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने तो चालू लागला. तेव्हां शवाच्या आत असलेल्या वेताळाने बोलायला सुरवात केली, ‘‘राजा, अज्ञान आणि मूर्खपणा यांच्याही काही सीमा असतात. पण तू या सीमांच्या पार पलिकडे जात आहेस. मी तुला पुनःपुन्हा विचारलं की तुझं ध्येय काय आहे, पण तू कधीच उत्तर दिलं नाहीस.

मी कितीतरी ज्ञानी, विवेकी व तपस्वी व्यक्तिंना पाहिले आहे ज्यांनी काहीतरी चुका केलेल्या आहेत, नीट विचार न करता चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आपल्या ध्येयापासून ते दूर जातात व त्यांच्या जीवनाचा चक्काचूर होतो. तुला योग्य मार्गावर आणणं माझं कर्तव्य आहे. ह्या कर्तव्याने प्रेरित झाल्यामुळे शशांक नावाच्या एका तपस्वीची कथा मी तुला सांगणार आहे.’’ असे म्हणून वेताळाने शशांकाची गोष्ट सांगायला सुरवात केली.
शशांक सुवर्णपुरीच्या राजपुरोहिताचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच शशांकला सांसरिक विषयांची आवड नव्हती. हळूहळू तो विरक्त बनत गेला व लौकिक सुखांचा त्याग करून जवळच्या अरण्यात तपश्‍चर्या करू लागला.

काही वर्षें त्याने घोर तपश्‍चर्या केली. त्यानंतर त्याने कंदमूळे, फळे इत्यादि खाणेसुद्धा थांबवले. फक्त तुळशीचे पाणी पिऊन तो राहू लागला. तपश्‍चर्या करून त्याने अनेक गोष्टींवर ताबा मिळवला, अनेक विद्या अवगत करून घेतल्या, अलौकिक सामर्थ्य प्राप्त करून घेतले. तो पाण्यावर चालू शकत असे, हवेत त्याला उडता येत असे. पण या सर्वांना तो महान शक्ती मानायला तयार नव्हता. त्याला वाटे की या सर्व विद्या क्षणभंगुर आहेत, व मृत्यूवर जय मिळवणे, ती जी शक्ती आहे ती सर्वात उच्च आहे व शाश्‍वत आहे. ही शक्ती मिळवण्यासाठी तो पुन्हा घोर तपश्‍चर्या करू लागला.
शशांकच्या या तपश्चर्येमुळे गंधर्व लोकात खळबळ माजली. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. गंधर्व राजाला वाटले की आपले सिंहासन मिळावे म्हणूनच तो ही तपश्चर्या करत आहे. म्हणून त्याने निश्‍चय केला की शशांकच्या हातून काहीतरी पाप घडवावे व त्याची तपश्चर्या निष्फळ करावी. त्यासाठी त्याने एक उपायसुद्धा शोधला.

गंधर्व राजा दैवजाचे रूप धारण करून सुवर्णपुरी गावात गेला व तिथल्या राजाला भेटून म्हणाला, ‘‘महाराज, आपला पुत्र, स्वर्णकीर्ति-मध्ये संपूर्ण जगाचा सम्राट होण्याची क्षमता आहे. पण त्यात अडचण आहे, आणि पिता या नात्याने ती दूर करणे तुमचे कर्तव्य नाही कां?’’ ‘‘अवश्य, अवश्य. काय करायला पाहिजे सांग, मी ते करीन.’’ राजा म्हणाला.

‘‘सर्वजीवकोटि यज्ञ करायला हवा. म्हणजे तुमच्या राज्यात जितके पशू, पक्षी आहेत ते सर्व यज्ञात बळी द्यावे लागतील.’’ दैवज्ञ म्हणाला, ‘‘पण यात एक अट आहे,’’ तो पुढे म्हणाला, ‘‘काय, कसली अट?’’ राजा म्हणाला.
‘‘पशू-पक्ष्यांचा बळी साधारण माणसाच्या हाताने नव्हे तर एका तपस्व्याच्या हाताने द्यायला हवा आणि हा तपस्वी इंद्रियांवर विजय मिळवलेला व ज्याने एक वर्षभर सतत तुळशीचे पाणी पिऊन तप केलं आहे असा तपस्वी हवा.’’

‘‘अरे बापरे, असा तपस्वी कुठे मिळणार?’’ राजा म्हणाला. ‘‘प्रयत्न केला तर अवश्य मिळेल. तुमच्या इच्छा-आकांक्षा सफल होऊं देत. विजयी भव.’’ असे म्हणून दैवज्ञ निघून गेला.

राजाला आपला मुलगा सम्राट होणार म्हणून अतिशय आनंद झाला होता. एका पित्याला, एका राजाला याहून अधिक काय हवे असते? त्याने निश्‍चय केला की कसेही करून हा यज्ञ करायचाच. त्याने राज्यात दवंडी पेटवली की राज्यात असतील तितक्या प्रकारचे पशू-पक्षी पकडून ठेवा व यज्ञात त्यांचा बळी द्यायची तयारी ठेवा, हा सर्वजीवकोटि यज्ञ जनतेच्या कल्याणासाठी केला जात आहे व त्यासाठी अशा एका तपस्व्याची जरूर आहे की ज्याने आपल्या इंद्रियांवर काबू मिळवलेला आहे. या घोषणेद्वारे लोकांना विनंती केली गेली की असा तपस्वी कुणाला माहिती असल्यास त्यांनी राजाला कळवावे.

या घोषणेनंतर पाचव्या दिवशी एक भिल्ल राजाला भेटायला आला. त्याने राजाला सांगितले की जंगलात तुळशीचे पाणी पिऊन तप करणारा एक तपस्वी त्याने पाहिला आहे.
राजाने मंत्र्याला बोलावून लगेच तपस्व्याला कसेही करून घेऊन यायला सांगितले. मंत्र्याने तपस्वी शशांकला सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला व म्हटले - ‘‘या यज्ञामुळे राज्याचे व सर्व जनतेचे कल्याण होणार आहे, व ते फक्त आपल्या हातांनी यज्ञ केला तरच साध्य आहे. राजा आपल्याला त्यासाठी हवे ते द्यायला तयार आहे. ते आपल्याला प्रमुख सल्लागाराची जागासुद्धा देतील.
भविष्य निर्माण करणार्‍या नव्या पिढीला आपण ज्ञानदान करूं शकता, त्यांना चांगले नागरिक बनवूं शकता, त्यासाठी आपल्या आश्रमाजवळ गुरूकुलाची स्थापना करतील.’’ पण शशांकने सर्वाला नकार देत म्हटले - ‘‘यज्ञाच्या नांवाने सजीव प्राण्यांचे बलिदान देणे पाप आहे. हे माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे.’’
‘राजा आपल्यासाठी प्रशांत उद्यानाच्या मध्यात एक भव्य अलिशान बंगला बांधून देतील व त्यात सर्व प्रकारच्या सुखसोई उपलब्ध असतील.’’ मंत्री म्हणाला. ‘‘मी एक तपस्वी आहे आणि या जीवनातच मला खरा आनंद मिळतो. माझ्या ध्येय-सिद्धीसाठी हे जंगलच सर्वात अनुकूल स्थळ आहे.’’ शशांकने ठामपणे म्हटले.

या तपस्व्याला समजावणे सोपे नाही असे दिसताच मंत्री परत राजधानीला आला. राजाला सर्व समजताच तो म्हणाला, ‘‘जा, त्या तपस्व्याला सांगा की मी माझ्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देईन आणि माझे राज्यही त्याला देईन.’’

राजाचे ते बोलणे ऐकून राजकुमारी भार्गवीला आश्‍चर्याचा धक्का बसला. तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून राजा तिला म्हणाला, ‘‘घाबरूं नकोस मुली! प्रथम यज्ञ तरी होऊ दे. नंतर काय करायचं मी पाहून घेईन.’’ वडिलांचे हे बोलणे भार्गवीला आवडले नाही. पण जनकल्याणाचा विचार मनात धरून ती गप्प बसली.
राजकुमारी भार्गवी देखील मंत्र्याबरोबर जंगलात गेली. मंत्र्याने तपस्व्याला म्हटले ‘‘साधुमहाराज, जर आपण येऊन यज्ञ केला तर ही राजकुमारी भार्गवी आपली धर्मपत्नी होईल. राजा मार्तण्डवर्मानंतर सुवर्णपुरीचे राजे आपणच व्हाल, हे राजाचे वचन आहे.’’
शशांकने राजकुमारीला पाहिले आणि तो पाहातच राहिला. तिचे मुग्ध करणारे सौंदर्य पाहून तो आपल्या जीवनाचे उदात्त, उच्च ध्येय विसरला व तो म्हणाला, ‘‘या सौंदर्यसम्राज्ञीशी लग्नही करीन आणि राज्याचा राजाही होईन.’’ सुवर्ण रथात बसून तिघेही स्वर्णपुरीला निघाले.

महान यज्ञाची तयारी केली गेली. हजारो पशू-पक्षी मोठ्या प्रांगणात आणले गेले. राजा आणि मंत्र्याबरोबर शशांकही हातात खड्ग घेऊन यज्ञाच्या जागी आला. यज्ञकुंडात पहिला बळी द्यायला एक हत्ती आणला होता. त्याचा बळी द्यायला शशांकने हातातले खड्ग वर उचलले आणि घाबरलेला हत्ती मोठ-मोठ्याने
विचित्र आवाज करू लागला. तेव्हां तिथे असलेले बाकीचे सर्व प्राणीही दीनपणे विचित्र आवाज करूं लागले.
शशांकची तंद्री एकदम भंगली व त्याने खड्ग दूर फेकून दिले. राजाला तो म्हणाला, ‘‘क्षमा करा महाराज, मी हे पाप करणार नाही. उलट पाप करण्याची प्रवृत्ती माझ्यात निर्माण झाली म्हणून त्याचे प्रायश्‍चित घेईन. कृपया मला परवानगी द्या.’’ असे म्हणून शशांक भरल्या जनतेच्या सभेतून निघून गेला.

वेताळाने शशांकची गोष्ट सांगून झाल्यावर म्हटले - ‘‘राजा, शशांक राजकुमारीचे अप्रतिम सौंदर्य पाहून बेहद्द खुष झाला. राजा होण्याच्या मोहाने तो प्राण्यांचे बलिदान द्यायलाही तयार झाला. पण प्राण्यांचे बलिदान देण्यापूर्वी अचानक त्याच्या मनात परिवर्तन कां झाले? माझ्या प्रश्‍नाचे उत्तर माहित असूनही तू गप्प राहिलास तर तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील.’’

राजा विक्रमार्क म्हणाला, ‘‘शशांकच्या मनात अकस्मात परिवर्तन झालं पण त्याला कारण कुठलंही भय नव्हे की त्याच्या मनाची चंचलता नव्हे, पण इथे एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की शशांकला सांसरिक विषयात प्रथमपासूनच अभिरुचि नव्हती. तो एक सत्यशोधक होता. असा एक विरक्त माणूस राजकुमारीला पाहून मोहित झाला आणि राज्य मिळणार व मोठा राजा होणार या आशेने मंत्री व राजकुमारीसह सुवर्णपुरीला गेला, या सर्वांमागे गंधर्वांचे मायाजाल होते. याचा अर्थच असा होतो की गंधर्वांनी त्याच्या मनात भ्रम निर्माण केला.

परंतु हत्तीचा चित्कार व इतर प्राण्यांच्या दीन रूदनाने त्याचा भ्रम दूर केला गेला, मायाजालातून तो बाहेर आला. त्याच क्षणी त्याला कळलं की आपण कित्ती मोठा अपराध करायला जात होतो. म्हणून लगेच त्याने राजाची क्षमा मागितली व आपले जीवन-ध्येय साधण्यासाठी तो परत तपस्या करण्याकरता जंगलात निघाला.’’ राजाने मौन-भंग करताच वेताळ आपला विजय सिद्ध करण्यासाठी शवासमेत अदृश्य झाला व पुन्हा झाडावर जाऊन बसला.

No comments:

Post a Comment