Thursday 7 February 2013

फायनान्स क्षेत्रातील शेखर जोशी यांची गरुड झेप

नाशिकच्या गोदावरीकाठी बालपण गेलेले शेखर जोशी कॉन्टिनेंटल युरोप मधल्या दहा देशांच्या विविध कंपन्यांचे फायनान्स समर्थपणे सांभाळत आहेत. मराठी माणसाची ही यशोगाथा जाणून घेण्यास मराठीवर्ल्डने त्यांच्याशी संपर्क साधला. शेखर जोशी त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दात वाचकांसाठी सांगत आहेत.
माझे बालपण जून्या नाशकात, गाडगे महाराज पूलाजवळ वाडयात, गोदावरी काठी गेले. शालेय शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूल येथे पूर्ण केले. वडिल एस. टी. मधे काम करत व आई शिक्षिका होती. लहानपणापासूनच शिक्षणाबरोबरच व्यवहारी ज्ञानही मिळाले पाहिजे ह्यावर पालकांचा भर होता. त्यामुळे शाळा सांभाळून फावल्या वेळात शिकवण्या घेणे, डाय-या विकणे असे व्यावसाय करीत असे. नंतर काही दिवस औषधांच्या दुकानात तसेच किरणा मालाच्या दुकानात काम करण्याचाही अनुभव घेतला. ह्या सगळया कामांमधून पैसा किती मिळाला ह्यापेक्षा पैसे कमवणे किती मेहनतीचे काम असते हे कळले. थोडक्यात पैशांची किंमत लहान वयातच कळली. कालांतराने नोकरी सांभाळून बी. कॉम. करता करता सी. ए पूर्ण केले. त्या नंतर आय. सी. डबल्यु. ए. ही अवघं २३ व्या वर्षी पूर्ण केले.
अनपेक्षीतपणे परदेशात मॉस्को येथे नोकरी करण्याची संधी चालून आली. फारसे बाहेर कुठेच न गेल्यामुळे नाशिक ते मॉस्को हे स्थित्यंतर माझ्या करता खूपच मोठा बदल होता. भौगोलिक भाषेत सांगायचे तर नाशिकचे तापमान होते + ३५ आणि मॉस्कोला - २५. ह्या व्यतिरिक्त नवीन भाषा, वेगवेगळया देशाची लोकं, नवीन काम ह्यामुळे नोकरीच्या पहिल्या दिवशीच हबकून गेलो. पण एका आठवडयातच ब-यापैकी स्थिरावलो. आपण मिळवलेले ज्ञान व आपल्यावरचे संस्कार ह्यांच्या जोरावर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
रशियात संपूर्ण कंपनी उभारण्याचे आव्हानात्मक काम ज्या तीघांवर सोपवले गेले त्या तिघांपैकी मी एक होतो. १२-१३ तास कामात सहज निघून जात. ही जबाबदारी पेलतांना मी शिकून अनुभव संपन्न झालो. ह्या अनुभवांच्या जोरावर अशाच प्रकारचे नवी कंपनी उभी करणे, आहे ती बंद करणे, कंपनीमधल्या संकटांचे निरासन करणे, दोन कंपन्या एकत्र आणणे, एखादी कंपनी चालवायला घेणे, एकत्र उद्योग स्थापीत करणे अश्या महत्वाच्या तसेच जबाबदार कामांकरिता युरोप मधल्या बेल्जीयम, जर्मनी, फ्रांस वगैरे बऱ्याच देशात जाण्याचा, राहण्याचा अनुभव आला. सुदैवाने अजून मोठया पदावर लंडनला पोस्टींग मिळाले.
सध्या मी लक्झम्बर्गला असतो, आणि कॅन्टिनेंटल युरोप मध्ये येणाऱ्या जवळ पास दहा देशांच्या विविध कंपन्यांचे फायनान्सेस् सांभाळतो. त्यातल्या ५ देशांत आमचे स्वत:चे कारखाने आहे तर इतर देशात सेल्स ऑफिसेस् आहेत. आमच्या पूर्ण कंपनी मध्ये जवळ जवळ १००० कामगार आहेत, त्यात मी भारतीय एकटाच. माझ्यामुळेच असेल असे नाही, पण इथल्या लोकांना भारतीय लोकांविषयी, संस्कृती विषयी आदर आहे. भारतीय डॉक्टर, सॉफ्टवेअर प्रोफेश्नलस् आणि अकॉन्टंट ह्यांचा संपूर्ण जगात आदर होतो.
मी भारतात असतांना वर्ण-भेद ह्यावर खूपकाही ऐकले होते पण, माझ्या मते ते दिवस गेलेत, मला स्वत:ला तरी असा काही अनुभव आला नाही. मला जवळ पास जगातल्या सगळयाच राष्ट्रांबरोबर काम करण्याचा अनुभव आला. माझे प्रांजळ मत आहे की it is the personality and not the nationality which counts !!.
फावल्या वेळात मी अजून ही अभ्यासाची, प्रोफेशनशी संबंधित अशी पुस्तके वाचतो. मला बुध्दी वापरावी लागेल अश्या गोष्टी करण्यात मजा वाटते, उदा- कोडी सोडवणे, बुध्दिबळ खेळणे इ. तसेच शूर विरांच्या साहस कथा, यशस्वी लोकांच्या यशोगाथा सांगणाऱ्या गोष्टी मी आगदी मन लावून वाचतो आणि त्यातून आपल्याला काही शिकता येईल का असे बघतो.
एक मराठी माणूस म्हणून ह्या पदावर काम करतांना, आपल्या संस्कृतीचा, देशाचा खूपच अभिमान वाटतो. परदेशात इतकी वर्षे असूनही आम्ही आपली मराठमोळी संस्कृती जपलेली आहे. दररोज संध्याकाळी देवा पुढे दिवा लावून मोठयांना नमस्कार करण्याची प्रथा पुढच्या पिढीतही जपली गेली आहे. आम्ही दरवर्षी गौरीगणपती करता नाशिकला येतो. वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला न चूकता जातो. माझी देवीवर निस्सीम श्रध्दा आहे. परदेशात राहून माझे मातृभूमीचे प्रेम कमी होण्याऐवजी, दिवसेंदिवस वाढत चालले आहे. चांगली संधी मिळाली तर परत भारतात येऊन, परदेशात मिळवलेल्या अनुभवाचा आपल्या देशाकरिता, देश बांधवांकरिता काही तरी उपयोग करायचा माझा मानस आहे.
मराठीवर्ल्ड वाचकवृंदांकरिता संदेश-
आपण मराठी माणसे ब-याचदा विनाकारण घाबरतो. माझ्यामते यशस्वी होण्याकरीता, बुध्दी पेक्षा जास्त गरज ही धाडसाची असते. आपण आपले गाव, आपले नातलग, आपले मित्र सोडायलाच तयार नसतो. 'मी तिकडे जाईन तर माझे कसे हाईल ?' तिकडे न जाता आपण ठरवून टाकतो की ते आपल्याला शक्य नाही म्हणून.
मी जेव्हा आपल्या नाशिकहून मॉस्कोला गेलो, तेव्हा मी ह्या सगळयातून गेलो. तिथली भाषा येईल का, माझे इंग्रजी फारच कच्चे आहे, गोरे लोक मला कमी लेखतील, अशी भिती मला होती. पण हे सर्व माझे अज्ञान होते. खरंतर ब-याच देशांमध्ये, इंग्रजी ही भाषा बोललीच जात नाही ! ! ! उदा.- रशिया, उजबेकिस्तान, पॉलन्ड, फ्रांस, जर्मनी.
मी असे केले तर लोक काय म्हणतील, नातलग काय म्हणतील ह्याचा फार जास्त विचार आपण करतो. मला वाटते की ते आपण सोडले पाहिजे. आपल्या मनाला काय पटते ते, आपले अंतरमन काय सांगते ते आणि तेच केले पाहिजे. अतिशय भावना प्रधान होणे सोडून, कुठल्याही गोष्टीचा, व्यवहारिक व प्रत्यक्ष दृष्टीकोण ठेवायला हवा.
लहानपणी वाचलेला एक सुविचार अजूनही आठवतो 'पुस्तकी ज्ञानाने मनुष्य पोपट बनतो, तर व्यवहारी ज्ञानाने गरूड !!'
आपण पुस्तकी ज्ञानाला, टक्केवारी आणि पदवी मिळवायला फार जास्त महत्त्व देत असतो असे मला वाटते. आपल्याला वाटते की पदवी मिळाली, की आपण सर्व काही मिळवले, शेवट घडला ! !. पण तो शेवट नसून ती खरंतर सुरूवात असते.
त्या बरोबरच जर आपण व्यवहार, वास्तविक जीवनावर जास्त भर दिला, आपले पुस्तकी ज्ञान व्यवहारात कसे वापरता येईल असा नेहमी दृष्टीकोनातून ठेवला, तर नक्की यशस्वी होऊ शकतो.
'स्वदेशी पुज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्ययेत'. मराठीवर्ल्ड वाचणा-या माझ्या मराठमोळया बंधू-भगिनींना मी सांगू इच्छितो की, नेहमी भविष्याचा विचार करा, स्वत:ला कमी समजू नका, नेहमी सकारात्मक मनोवृत्ती ठेवा, स्वत:वर आणि देवावर श्रध्दा ठेवा. श्रध्देने माणूस काहीही करू शकतो ! हे लिहितांना एका सुंदर मराठी गाण्याच्या ओळी आठवतात 'आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने.'
शब्दांकन
सौ भाग्यश्री केंगे

No comments:

Post a Comment