Thursday, 7 February 2013

शिव्यांची राक्षसीण


अंधारी रात्र होती आणि वातावरण भेसूर होते. मधूनमधून पाऊस पडत होता. सोसाट्याच्या वार्‍याने अरण्यांतली झाडें हलत होती. विजांचा गडगडाट आणि कोल्हेकुई यांत मधेच भुतांचा हंसण्याचा आवाज येत होता. पण राजा विक्रम डगमगला नाही. निर्धाराने तो प्रेत घेऊन पळालेल्या वेताळाचा पाठलाग करीत होता. वेताळ प्रेत घेऊन झाडावर पुन्हां लपला होता. राजा त्या जुन्या झाडावर परत चढला आणि त्याने ते प्रेत खाली आणले. आपल्या खांद्यावर ते प्रेत घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला.

तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन, मला तुझा हेतू काय आहे ते कांही उमजत नाही. हे इतके कष्ट तूं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्र झाली आहे, गडद अंधार आहे, कांहीही दिसत नाही आणि तुला भिती वाटत नाही कां? वन्य श्वापदांच्या, विषारी जनावरांच्या आणि भुताखेतांच्या या अरण्यांत तू तुझे प्राण धोक्यांत कां घालतो आहेस? तुझ्या मनांत काय आहे ते तरी मला सांग.

अनेकवेळा असं दिसतं कीं आपली आकांक्षा पूर्ण करण्याच्या आवेगांत माणूस इतका दमतो कीं आपण कां व कशासाठी हा प्रयत्न करतोय तेच तो विसरतो. अरूणा नांवाच्या मुलीला एका महर्षीकडून एक वर मिळाला होता. तिची कथा मी तुला सांगतो. तिने या वराचा उपयोग स्वतःसाठी न करता कोणताही विचार न करता इतरांसाठी केला. या गोष्टीवरून तरी तू तसाच मूर्खपणा करणार नाहीस. आता ही गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक.’’ वेताळाने आपली कथा सुरूं केली.
‘‘गंगा ही एक तोंडाळ आणि भांडखोर स्वभावाची बाई होती. इतरांचा अपमान करण्याची, त्यांना उणेंदुणें बोलण्याची एकही संधी ती वांया दवडीत नसे. तिचा पती, बिरबल, हा एक सज्जन गृहस्थ होता. तिचे सर्व बोलणें तो निमूटपणें सहन करीत असे. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नांव होते भीम! भीमही शांत व सालस स्वभावाचा होता. त्याच्या आईखेरीज त्याला इतरांची कुणाचीही भिती वाटत नसे.
एक दिवस भीम गंगापूरला त्याच्या आईसाठी रेशमी साडी आणायला गेला. गंगापूर गांवच्या रेशमी साड्या अतिशय प्रसिद्ध होत्या. दूरदूरचे लोक तिथें साड्यांची खरेदी करण्यासाठी येत असत. इथली साडी गंगाला खूप दिवसांपासून हवी होती. तिने भीमाला तिला हवा असलेला रंग व साडीवरची नक्षी याबद्दल सविस्तर वर्णन सांगितले होते.

भीम अनेक विणकरांकडे जाऊन पाहून आला. पण त्याच्या आईला हवी असलेली साडी कांही त्याला मिळेना. साडीची खरेदी न करता जर तो घरी परतला असता, तर त्याच्या आईने प्रहरभर त्याच्यावर आग पाखडली असती हे त्याला ठाऊक होतं. काय करावं ते त्याला सुचेना. निराश होऊन तो नदीच्या कांठावरच्या एका झाडाच्या सांवलीत बसला.

त्याच वेळेला तिथून एक मुलींचा घोळका जात होता. रोज त्या सार्‍याजणीं आपली पाण्याची भांडी घेऊन नदीवर जात असत. स्नान करून पाणी भरून त्या घरीं परत जात. त्यांच्यापैकीं एक मुलगी होती अरुणा! तिने भीमला जरा दरडावूनच विचारलं, ‘‘अहो, तुम्ही इथें कां बसलात? तुम्हाला माहीत नाही कां इथें आम्ही रोज स्नानासाठी येतो ते?’’

तिचा कठोर स्वर ऐकून भीम जरा दुखावला गेला. त्याने आपण तिथें कां बसलो ते सविस्तर सांगितलं. ते ऐकल्यानंतर अरूणा जोरजोराने हंसत सुटली आणि म्हणाली, ‘‘तुमची आई तरी एक चमत्कारिक बाई दिसतेय! तिने स्वतः तरी यायचं, किंवा कुणा बाईमाणसाला पाठवायचं! आता बघा, तुमच्यासारख्या भाबड्या आणि अनुभव नसलेल्या माणसाला कसं पाठवलं हो तिने? असूं दे. तुम्ही चिंता करूं नका.
मी तुम्हाला मदत करीन. तुम्ही गांवात जा आणि शिवराजचं घर कुठे आहे ते विचारा. तिथे माझ्यासाठी थांबा. मी तुमच्या आईच्या पसंतीची साडी घेऊन येईन. त्यावर तुमची आई तुमचं कसं कौतुक करते ते पहाच!’’ म तिथून निमूटपणें उठला आणि शिवराजचे घर शोधून तिथें अरुणासाठीं थांबला. थोड्याच वेळानंतर अरुणा तिथें आली. तिने गंगा कशी दिसते त्याची माहिती विचारली. नंतर तिने एक कमी किंमतीची साडी पसंत केली व भीमला दिली.
 ‘‘ही घेऊन घरी जा आणि तुमच्या आईला द्या. तिला सांगा ‘विणकर म्हणाला कीं अगदी अश्शीच साडी पांच वर्षापूर्वीं राणीसाहेबांनी विकत घेतली होती. तुमच्या आईला हेही सांगा कीं दोन भिन्न स्त्रियांची पसंती सारखी आहे हे पाहून विणकराला फार आश्चर्य वाटले. तुमच्या आईची बरोबरी राणीसाहेबांशी केली गेली म्हणून ती खूष होईल बघा! तुम्ही निश्चिंत राहा. ही साडी तुमच्या आईला पसंत पडेलच.’’

भीम साडी घेऊन गांवी गेला आणि अरुणाने सांगितल्याप्रमाणें त्याने तिचे शब्द आपल्या आईला सांगितले. आई ते ऐकून भलतीच आनंदून गेली. अशी साडी आणल्याबद्दल तिने भीमाचे खूप कौतुक केले.

नंतर भीमाने ही सारी कथा आपल्या पित्याला सांगितली. त्यांना वाटले कीं जर भीमाचे अरुणाशी लग्न झाले तर आपल्या पत्नीचा आक्रस्ताळा स्वभाव बदलेल.
दुसर्‍या दिवशी कांहीतरी कारण काढून भीम पुन्हां गंगापूरला गेला आणि अरुणाची वाट बघत थांबला. तिने भीमाला पाहिल्याबरोबर ती उत्सुकतेने पुढें आली व तिने विचारले, ‘‘तुमच्या आईला साडी आवडली नाही कां? ती तुम्हाला रागावली कां?’’
‘नाही, माझ्या आईला ती साडी फारच आवडली. मी इथें आलोय ते दुसर्‍याच महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायला! मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे.’’ भीम जरा चांचरतच म्हणाला. ‘‘मग हे तुम्ही मला कशाला विचारता? तुमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांशी बोलायला सांगा.’’ अरुणाने उत्तर दिले.
‘‘ते येतीलच. पण त्याअगोदर याबाबतींत तुझं मत काय आहे ते मला विचारायचं होतं. म्हणून मी तुला भेटायला आलो.’’
अरुणा क्षणभर विचारांत पडली. तिने लगेच उत्तर दिले, ‘‘तुम्ही सज्जन आणि सौम्य स्वभावाचे आहात म्हणून तर मी तुम्हाला साडी पसंत करायला मदत केली. मला तुम्ही आवडला आहात.’’ त्यानंतर भीमने तिला आपल्या आईबद्दल सारं कांही सांगितलं आणि त्याने विचारलं, ‘‘माझ्या आईचा असला स्वभाव तुझ्या हुशारीने आणि चतुराईने बदलता येईल कां?’’
अरुणाला निर्णय घ्यायला उशीर लागला नाही. तिला महर्षी विलंब यांची आठवण झाली. ते देशभर भ्रमण करीत असताना गंगापूरला आले होते. नदीच्या कांठावर एकदा निसरड्यावर त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. त्यांना उठून उभे राहाता येईना इतकी पायाला दुखापत झाली होती. इतर मुली नदीवर आलेल्या होत्या, त्यांना हंसायला कारण पुरले. पण अरुणाने त्या मुलींना दटावले आणि महर्षींना उठून चालायला मदत केली. महर्षी तिच्या चांगुलपणामुळें प्रसन्न झाले. त्यांनी तिला सांगितले, ‘‘तू मला मदत केली आहेस म्हणून मी प्रसन्न झालो आहे. तुझी कांही इच्छा असेल तर सांग.’’

त्याक्षणीं अरुणाला काय सांगावं ते उमजेना तिने नंतर सांगायचे ठरवले. त्यावर महर्षी म्हणाले, ‘‘जेव्हां केव्हां तुला कांही मागावेसे वाटेल, त्यावेळेस डोळे मीट आणि माझे नांव तीनवेळां उच्चार. मी तुझ्याकडे येईन आणि तुझी मागणी पूर्ण करीन.’’ त्यानंतर ते दुसर्‍या गांवी निघून गेले.
अरुणाने हा प्रसंग भीमला सांगितला आणि ती म्हणाली, ‘‘हे पहा, तुमच्या आईचा स्वभाव बदलायचा, हे कांही सामान्य माणसाचे काम नव्हे. आपल्याला महर्षी विलंब यांची मदत घ्यायला लागेल.’’ असं म्हणून तिने त्यांच्या नांवाचा तीन वेळा उच्चार केला.

विलंब त्यांच्याकडे आले. त्यांनी अरुणाकडून सारी कहाणी ऐकली आणि ते भीमला म्हणाले, ‘‘चल मुला, आपण तुझ्या मातोश्रीला भेटायला जाऊं या.’’
ते भीमच्या गांवी पोंचले महर्षी भीमच्या घरांत शिरले. पलंगावर लोळत पडलेल्या गंगाला ते म्हणाले, ‘‘आई, मला कांही भिक्षा घाल.’’

गंगा दचकून उठली आणि कर्कशपणें त्यांच्यावर ओरडली, ‘‘भिक्षा मागायला इथें आला आहेस. अशी भिक्षा मागतात कां घरांत शिरून?’’ आणि तिने तोंडाचा पट्टा सुरुं केला. पुन्हां विलंब म्हणाले, ‘‘आई, तुझी इच्छा असेल तर मला भिक्षा वाढ, नाहीतर मला जायला सांग. तुझ्या कठोर शब्दांचं एका राक्षसिणींत रूपांतर होईल, आणि ती तुला छळेल.’’
‘‘मी लहानपणापासून अस्संच बोलतेय. मला त्याची संवय आहे. मी माझे आईवडील, सासूसासरे, सगळ्यांना चांगलं दटावलंय बरं ! माझा नवरा आणि मुलगा यांची माझ्यासमोर तोंड उघडायची ताकद नाही. ते ‘ब्रू’ देखील काढीत नाहीत, मी कांही म्हटलं तरी! या बोलण्याने माझं कांहीही आजपर्यंत बिघडलं नाही. ‘‘गंगाने महर्षींना उर्मटपणे उत्तर केले.

‘‘हे बघ, माझ्या हातून जर कांही पाप घडले असेल तर तुझे कठोर शब्द, शिव्या, यांची शापवाणी माझ्यावर पडेल. पण तू कारण नसताना माझ्यावर आग पाखडलीस. तर मात्र तुझे शब्द परत तुझ्यावर शाप होऊन आदळतील. हे सत्य तुला कळलेच पाहिजे. कुणालाही जर तू विनाकारण ओरडत सुटलीस, तर तुझ्या शिव्यांची राक्षसीण बनून तुझ्यासमोर येईल.’’ महर्षी विलंब यांनी सांगितलं.

त्यानंतर क्षणांतच एक भीतीदायक दिसणारी भयानक आकृती गंगाच्यासमोर येऊन उभी राहिली. ती आकृती म्हणाली, ‘‘गंगा, मी आहे. शिव्यांची राक्षसीण. चार वर्षांत तुला लुळंपागळं करून टाकायची कामगिरी माझ्यावर सोंपवली होती. नंतर त्याच्यावर कांहीही उपाय चालला नसता. पण ऋषींच्या शापामुळें मला आता राक्षसिणीच्या रूपांत तुझ्याकडे यावं लागलंय.

तुला जर कुणाचा सत्यानाश करायचा असेल तर ते अगोदरच सांग. नाहीतर मीच तुझा नाश करीन.’’ गंगा खूप घाबरली. तिला कांहीच सुचेना. तिने महर्षींचे पाय धरले आणि त्यांना ती अजीजीने म्हणाली, ‘‘गुरुदेव! मला क्षमा करा. माझी फारच मोठी चूक झालीय.’’
त्यावर महर्षीं म्हणाले, ‘‘ही राक्षसीण तुझ्याजवळच्याच कुणाचातरी नायनाट करील. तुझ्या मागील दारच्या अंगणात एक आंब्याचे झाड आहे. तुझे ते फार आवडते आहे ना? त्या झाडाचा नाश करायला ह्या राक्षसीला सांग, म्हणजे ती तुझा पिच्छा सोडील.’’ गंगाने त्याप्रमाणें केले आणि राक्षसीण ताबडतोब अदृश्य झाली. अंगणातले ते आंब्याचे झाडदेखील नाहीसे झाले.
महर्षींनी अत्यंत प्रेमळ आवाजांत गंगाला सांगितले, ‘‘गंगा, आजपासून कारणाशिवाय तू कुणालाही रागवूं नकोस. जर तूं तसं केलंस, तर ही राक्षसीण तुझ्यासमोर येईल आणि तुला शिक्षा करील. गंगापुरमधे अरुणा नांवाची एक मुलगी आहे. तिला तुझी सून करून घे. ती एक हुशार, गुणी मुलगी आहे. तू जर तिच्याशी चांगली वागलीस आणि तिची काळजी घेतलीस तर या राक्षसिणीची दुष्टशक्ती निस्तेज होईल आणि हळूंहळूं नष्ट होईल. तुझं सुख तुझ्या हातांत आहे.’’
कांही दिवसानंतर अरुणा व भीम यांचा विवाहसोहळा पार पडला.’’

ही कथा सांगितल्यानंतर वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, असं वाटतं कीं महर्षी विलंब यांनी दिलेल्या वरदानाचा चांगला उपयोग अरुणाला करता आला नाही. या वरदानामुळें तिला कुणा श्रीमंत माणसाची सून होता आलं असतं आणि आयुष्य चैनींत घालवता आलं असतं. तिने या वरदानाचा उपयोग स्वतःसाठी किंवा तिच्या घरांतल्या मंडळींसाठी केला नाही. तिने त्याचा उपयोग भीमच्या भल्यासाठीं केला. मला तर वाटतं यांत तिने शहाणपणा केला नाहीच. तुला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलंस, तर तुझ्या मस्तकांचे असंख्य तुकडे होतील.’’

राजा विक्रम म्हणाला, ‘‘कोणत्याही आई-वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी लग्न झाल्यानंतर सुखाने संसारात रमावी असंच वाटत असतं. मला वाटतं कीं अरुणाने ह्या वरदानाचा उपयोग आपल्या मातापित्याला आनंद देण्यासाठीं केला. साधारणतः, पुरुष हे जरा लवकर चिडतात. पण भीमचा स्वभाव अगदी विरुद्ध होता. तो अतिशय शांत आणि विवेकी होता. कोणत्याही मुलीला अशा पुरुषाशी विवाह करायला आवडलं असतं.
भविष्यांत अशा व्यक्तीचा स्वभाव फारसा बदलला नसता अरूणाने या वरदानाचा उपयोग आपल्या सासूचा स्वभाव बदलण्यासाठीं केला. त्यामुळें घरांत शांती आणि आनंद, दोन्हीही टिकली असती. हे सगळं सार्‍या कुटुंबपरिवाराच्या सुखासाठी अरुणाने केलं होतं. म्हणून तिचा निर्णय चुकीचा किंवा मूर्खपणाचा नव्हता.’’
राजा विक्रमचा मौनभंग झाल्यामुळें प्रेत अदृश्य होऊन पुन्हां त्या जुन्या वृक्षावर जाऊन लटकले. राजाने आपली तलवार उपसली आणि तो त्या प्रेताच्या पाठोपाठ निघाला.
 


No comments:

Post a Comment