Saturday, 16 February 2013

ऊन-सावली

त्या दिवशी बादशहा अकबर खूप चिंतित तसेच खूप रागावलेलाही दिसत होता. त्याची काळजी दूर करण्यासाठी बिरबल हळूच म्हणाला, ‘‘खाविंद, आपण असे काळजीग्रस्त, रागावलेले चांगले दिसत नाही. तसेच ते आपल्याला शोभतही नाही.’’

‘‘कधी चांगल्या मनःस्थितीत असावे, कधी नाही, कधी हंसावे, कधी हंसू नये, हे आम्हाला चांगले समजते. मी बादशहा आहे, हे विसरूं नकोस. मी मला वाटेल तेच करीन. तुझ्या सल्ल्याची मला अजिबात गरज नाही.’’ अकबर रागाने म्हणाला.

‘‘रागावल्यामुळे आपला चेहरा खूप विकृत व कुरूप दिसतो आहे. खूप विचित्रही दिसतो आहे, जहाँपन्हाँ!’’ बिरबल म्हणाला. त्यावर जास्त चिडून बादशहा म्हणाला, ‘‘काय म्हणालास? माझा चेहरा विकृत व कुरूप दिसतो आहे? माझ्यासमोरच माझी अवहेलना करण्याची तुझी ही हिम्मत?’’

‘‘मला असे म्हणायचे नव्हते, खाविंद!’’ असे म्हणून बिरबल आणखी कांही म्हणणार तोच अकबर म्हणाला, ‘‘तुला आणखी कांही बोलण्याची आता गरज नाही. माझ्यासमोरून चालता हो. पुन्हा कधीही तुझे हे तोंड मला दाखवू नकोस.’’

अकबराच्या हुकुमाप्रमाणे बिरबल कांही न बोलता तेथून निघून गेला. ‘‘थोडेसे जवळ केले तर डोक्यावर चढून बसतात.’’ असे पुटपुटत, चरफडत अकबर दिवसभर गप्पगप्पच होता. तो खूप रागात दिसत होता.

दुसर्‍या दिवशी अकबर दरबारांत आला तेव्हां बिरबलाशिवाय सर्व दरबारी उपस्थित होते. त्याचे रिकामे आसन पहाताच अकबर म्हणाला, ‘‘बिरबल कुठे आहे?’’

‘‘खाविंद, ते म्हणत होते कीं, आपण त्यांच्यावर खूप रागावला आहात. आपण त्यांना इथून निघून जाण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळ  आपल्या आज्ञेवरून हे शहर सोडून जात असल्याचे ते म्हणाले.’’ एकजण म्हणाला.

तेव्हां अकबराला कालच्या वादविवादाची आठवण झाली. आता तो विचारांत पडला. काल तो खूप घुश्श्यांत होता, ही गोष्ट खरी होती. तसेच त्याने बिरबलाला निघून जाण्याविषयीही सांगितले होतेच. त्याक्षणी त्याला वाटले कीं, बिरबलाचा अवमान करून आपण फार मोठी चूक केली आहे. त्याच्याशी आपण इतक्या कठोरपणे वागायला नको होते. त्यामुळे तो दुखावला असेल आणि इथून निघून गेला असेल. त्याला एकदम बिरबलविषयी सहानुभूती वाटू लागली.

कधीकधी अकस्मात एखादी घटना घडून जाते. कालची घटना तशीच होती. कोणाला कांही न सांगता बिरबल निघून गेला होता. बरेच दिवस लोटले पण त्याच्याविषयी कांही कळले नाही. त्याच्याशिवाय दरबार सुनासुना वाटत होता. अकबराला अगदीच राहवेना म्हणून त्याने बिरबलाच्या शोधार्थ शिपायांना पाठवले. परंतु त्याचा कांही पत्ता लागला नाही. कांहीही झाले तरी अकबराला बिरबलाचा शोध घेऊन त्याला परत बोलवायचे होते.

एके दिवशी तो मंत्रिगणांना म्हणाला, ‘‘संपूर्ण राज्यात दवंडी पिटा कीं, कडकडीत उन्हांत जी व्यक्ती छत्री न घेता राजमार्गावरून चालत येईल, त्याला शंभर मोहरांचे बक्षिस देण्यात येईल.’’

‘‘जहापन्हां, हे तर अशक्य आहे. छत्रीशिवाय कडकडीत उन्हांतून चालणे कोणाला तरी शक्य होईल का?’’ एक वयस्कर मंत्री आश्चर्याने म्हणाला.

‘‘असे असले तरीही दवंडी द्या. त्यामुळे नुकसान नक्कीच होणार नाही’’ बादशहाने प्रत्युत्तर दिले.

मग मंत्र्यांना गप्प रहावे लागले. त्यांनी बादशहाच्या आज्ञेनुसार दवंडी दिली.

दवंडी ऐकून लोक त्यावर उलटसुलट मतप्रदर्शन करूं लागले. ते म्हणूं लागले, ‘‘राज्यकर्त्यांच्या इच्छा किती विचित्र असतात!’’

कुग्रमचा एक गरीब गांवकरी ही दवंडी ऐकल्यावर म्हणू लागला, ‘‘रणरणीत उन्हांत छत्रीशिवाय चालले तर शंभर मोहरा मिळणार, वा !’’ मनांतल्या मनांत हे घोकत तो घरी आला.

त्याने आत्तापर्यंत एखादी मोहोरही कधी पाहिली नव्हती. दवंडीप्रमाणे तो वागू शकला तर त्याची गरीबी दूर होईल, त्याच्या सर्व गरजा भागू शकतील. त्याने आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगितली.

पत्नी म्हणाली, ‘‘नुकतेच आपल्या शेजारी राहायला आलेल्या वीरेंद्रांचा सल्ला घ्या. ते खूप हुषार वाटतात.’’

‘‘त्यांना हे समजले असेल तर ते स्वतःच जाऊन हे बक्षिस पटकावू शकतात. असो, तरीही तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना भेटतो’’ असे म्हणून तो गरीब माणूस वीरेंद्रला भेटला.
त्याचे बोलणे ऐकून स्मितहास्य करीत वीरेंद्र म्हणाला, ‘‘हे कांही फार कठीण नाही!’’

‘‘तुम्हाला माहिती आहे, हे कसे करता येईल ते? माहिती असेल तर मला सांगा ना.’’ गायावया करीत तो गरीब म्हणाला.

वीरेंद्रने सांगितले कीं, ‘‘डोक्यावर पलंग धरून चालत जा म्हणजे डोक्यावर छत्री नसली तरी पलंगाच्या सावली मुळे तुझे उन्हापासून संरक्षण होईल. आणि पलंगाची सावली प्रत्येक क्षणी तुझ्याबरोबर असेल.’’

‘‘वा ! तुम्ही किती चांगला उपाय सांगितलात ! मला हे अजिबात सुचले नसते. आत्ताच आगर्‍यासाठी निघतो आणि बादशहांना भेटतो. आता मलाच शंभर मोहरा मिळतील’’ तो गरीब आनंदून म्हणाला.

तो लगेच निघाला व आगर्‍याला येऊन पोचला. मग अकबराची भेट घेऊन त्याने सांगितले, ‘‘खाविंद, मी उन्हांतून चालतच आपल्याकडे आलो आहे, तेही छत्रीशिवाय! सावलीतून चालत उन्हापासून बचाव करून घेत आलो आहे.’’

‘‘सर्वजण म्हणत होते कीं, हे अशक्य आहे. पण तुला हे कसे शक्य झाले?’’ बादशहाने विचारले.

‘‘डोक्यावर पलंग धरून चालत आलो आहे’’ तो गरीब म्हणाला.

‘शाब्बास, तुला शंभर मोहरा नक्की मिळतील. पण एक सांग ही कल्पना तुझी की आणखी कोणाची?’’ अकबराने विचारले.

‘‘नुकतीच आमच्या शेजारी आगर्‍याहून  वीरेंद्र नांवाची एक व्यक्ती रहायला आली आहे. ते खूपच हुशार आहेत. त्यांनी मला हा उपाय सांगितला’’ गरीब म्हणाला.

ती व्यक्ती म्हणजे बिरबल असणार, हे बादशहांनी ताडले. त्यांनी त्या गरीब माणसाला लगेचच शंभर मोहरा दिल्या आणि म्हणाले, ‘‘तुला सुखरूप घरी पोचविण्याकरीत माझे दोन शिपाई तुझ्याबरोबर येतील. ते दोघे परत येतील तेव्हां तुझ्या शेजार्‍यालाही त्यांच्याबरोबर पाठवून दे.’’

खूप आनंदलेला तो गरीब माणूस शिपायांसोबत गांवी परतला.

आठवड्याभराने वीरेंद्रला घेऊन शिपाई अकबराकडे आले. त्यावेळी वीरेंद्रने रूमालाने आपला चेहरा झाकून घेतला होता. अकबराने त्याला विचारले, ‘‘रूमालाने तू आपले तोंड का झाकून घेतले आहेस?’’

‘‘आपणच आज्ञा केली होती कीं, पुन्हा तोंड दाखवू नकोस. राजाज्ञेचे पालन करणे माझे कर्तव्य आहे’’ वीरेंद्र नम्रपणे म्हणाला.

‘‘बिरबल, आता मात्र मला तुझा चेहरा पाहायचा आहे’’ असे म्हणून अकबराने त्याच्या तोंडावरचा रूमाल बाजूला केला आणि हंसतमुखाने त्याला आलिंगन दिले.

No comments:

Post a Comment