Thursday, 7 February 2013

राजाचा वानप्रस्थ


निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. झाडावरून त्याने शव खाली उतरवले. ते आपल्या खांद्यावर घेतले आणि स्मशानाची वाट धरली. तेव्हां प्रेतांत लपलेल्या वेताळाने म्हटले, ‘‘तू जिवावर उदार होऊन या भयंकर स्मशानांत एकटाच चालला आहेस. ही भुताप्रेतांची भूमी आहे. इथें असे जाणें अतिशय धोक्याचे आहे. तुझे हे वर्तन पाहून तुझे ध्येय काय असेल याबाबतीत मला शंका येऊं लागली आहे. माझ्या दृष्टीने तर हा निव्वळ मूर्खपणा आहे. कधीकधी अत्यंत हुशार माणसेंदेखील अशक्य परिस्थितींत अडकतात. आपण काय करतो आहोत आणि आपण काय करायला हवे हे त्यांच्या लक्षांतच येत नाही. उदाहरण म्हणून मी तुला सत्यकीर्ती नांवाच्या राजाची गोष्ट सांगतो. ती ऐकता ऐकता तुझा थकवाही दूर होईल.’’ आणि वेताळाने सत्यकीर्तिची पुढील गोष्ट सांगितली.

फार पूर्वींची कहाणी आहे ही! सत्यकीर्ति हा वराल देशाचा राजा होता. तो एक उत्तम राज्यकर्ता होता. राज्याचा कारभार अतिशय कुशलतेने तो सांभाळत होता. प्रजाननांचा तो आवडता होता. त्याच्या राजवटींत प्रजा फारच सुखी होती, शांततापूर्ण आयुष्य घालवीत होती. त्याचे वय जसे वाढत गेले, तशी राजकारणाची त्याची आसक्ती कमी होत चालली. त्याला विश्रांतिची गरज जाणवायला लागली. आपण राज्यकारभारांतून मुक्त झालो तर चांगलं होईल असं त्याला वाटायला लागलं.
सत्यकीर्तिला चार मुलगे होते. चौघेही विद्वान, बुद्धिमान व शूरवीर होते. राजाने मंत्रीगण व इतर सरदारांबरोबर विचारविनिमय करून थोरला मुलगा रामभद्र याला राज्याभिषेक केला व राज्यशासनाचे सारे कामकाज त्याच्यावर सोंपवले.
यापूर्वीं दोन वर्षें अगोदरच महाराणीचे देहावसान झाले होते. आता मात्र राजा सत्यकीर्ति गृहस्थाश्रमांत एकटाच राहिला. त्याने भक्तीमार्गाकडे आपले मन वळवले आणि त्यावरच सारे लक्ष केंद्रित केले. तरीदेखील त्याचे ध्यान सैरभैर होत होते. आपले मन असे चंचल कां आहे, भक्तीमार्गात आपले चित्त पूर्णपणे समरस कां होत नाही याची चिंता त्याला खात होती.

त्याने ह्यावर भरपूर विचार केला आणि ठरवले कीं उरलेले आयुष्य साधूसंन्यासी यांच्या संगतीत घालवायचे, आश्रमांत राहायचे आणि मुक्तीचा मार्ग शोधायचा! आपल्या मनांतले विचार राजाने बृहस्पती भट्ट नांवाच्या एका पंडिताला सांगितले. हा पंडित राजाकडे रोजच येतजात असे.
राजाच्या मनांतले विचार ऐकून बृहस्पति भट्ट फारच खूष झाला. तो म्हणाला, ‘‘आपण अगदी योग्य विचार ठरवला आहे. सांसारिक व्यापांतून बाहेर पडण्यासाठीं साधू-संन्यासी यांच्या संगतीत राहाणें उत्तम व श्रेयस्कर आहे. अध्यात्म व जीवनांतल्या मोहांतून मुक्ती मिळवण्यासाठीं हाच खरा मार्ग आहे.’’

तरीदेखील राजा थोडा वेळ विचार करीत राहिला. आपल्याशीच तर्कवाद करीत तो बृहस्पती भट्टाला म्हणाला, ‘‘आपण ठीक सांगितलेत. जन्मापासून मी सुखी, आरामशीर आयुष्य जगलो आहे. संन्यासी जीवन अतिशय कठीण असतं. आश्रमाच्या कठोर नियमांचं पालन करावं लागतं. आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. मला हे सारं जमेल कीं नाही याची भिती वाटते. या परीक्षेत मी अपयशी तर होणार नाही ना?’’

त्यावर बृहस्पती किंचित हंसून म्हणाला, ‘‘महाराज, आपण मुळीच घाबरूं नका. पहिले कांही दिवस हे काम कठीण वाटेल खरं पण नंतर त्याची संवय अंगवळणीं पडेल. आणि मुक्तीच्या मार्गाकडे आपले ध्यान केंद्रित होऊं लागेल. आपण निःसंशय सफल व्हाल, असा मला गाढ विश्वास आहे.’’

राजावर भट्टच्या बोलण्याचा परिणाम झाला. तरीही त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास नव्हता. म्हणून तो म्हणाला, ‘‘एक काम करूं या. आपल्या राजधानीजवळच्या चंपकवनांत कार्तिकेय नांवाचा संन्यासी तपस्येंत मग्न आहे. तिथें मी कांही दिवस राहीन. तिथल्या अनुभवाने मी तिथें राहायला योग्य आहे कां नाही, याची मला खरीखुरी कल्पना येईल.’’
बृहस्पती भट्टालाही राजाचा हा विचार पटला. त्याने संमती दिली आणि राजाने आपल्या प्रवासाची सारी तयारी स्वतः केली. पित्याच्या या यात्रेला चारी मुलांनी प्रथमच आपला विरोध दर्शवला. तेव्हां राजाने त्यांना समजावीत म्हटले, ‘‘जर मला तिथें राहाणें जमले नाही तर मी अवश्य परत येईन.’’ पित्याचे हे आश्वासन ऐकल्यानंतर चौघेजण निमूट बसले.

राजा सत्यकीर्तिने एक सेवक व एका दासीला बरोबर घेतले आणि तो चंपकवनांत पोंचला. संन्यासी कार्तिकेयाच्या झोंपडीजवळच राजासाठी एक सुसज्ज झोंपडी बांधून तयार होती. त्यांत मऊ बिछाना असलेला पलंग होता. जवळच एका मेजावर निरनिराळी फळें ठेवली होती.

सात्विक साध्या आहाराचे पदार्थ झांकून ठेवले होते. कोपर्‍यांत छोटे देवघर होते. त्यांत अनेक देवी देवतांची चित्रें मांडलेली होती. त्याच्याजवळच रुद्राक्षांची गुंफलेली माला आणि चित्रासनही ठेवलेले होते.सत्यकीर्तिने त्या सेवक व दासीने सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

रात्रीचे भोजन झाल्यानंतर राजाने विश्रांति घेतली आणि सकाळीं तो कार्तिकेयच्या दर्शनासाठी बाहेर पडला. जवळ गेल्यानंतर त्याला दिसले कीं एका आम्रवृक्षाखाली कार्तिकेय संन्यासी ध्यान लावून बसलेला आहे.

त्याच्या तपस्येंत भंग होऊं नये म्हणून राजा निमूटपणें दूर गेला व एका चौथर्‍यावर बसून राहिला. बरेच प्रहर उलटले, पण कार्तिकेय ध्यानस्थ होता. राजा चौथर्‍यावरून उतरला आणि आजूबाजूच्या वनराईकडे लक्षपूर्वक पाहूं लागला. थोड्या वेळानंतर पाठीमागून ‘राजा’ अशी हांक ऐकूं आली. त्याने मागे वळून पाहिले.तिथें त्याला मंदस्मित करीत मागे उभा असलेला कार्तिकेय दिसला. सत्यकीर्तिने मान झुकवून त्याला प्रणाम केला. कार्तिकेयने त्याला ‘सुखी भव’ असं म्हणून आशिर्वाद दिला व पुढें म्हटले, ‘‘या, आपण या चौथर्‍यावरच बसूं या.’’ दोघेही तिथे बसल्यानंतर प्रसन्नमुद्रेने कार्तिकेयाने विचारले, ‘‘तुमचे सारे सेवक परत गेले कां?’’
हा प्रश्न ऐकून सत्यकीर्ति जरा वरमला आणि त्याने खालच्य स्वरांत म्हटले, ‘‘पर्णकुटींत माझ्यासाठीं आवश्यक त्या सुविधांची त्यांनी व्यवस्था केली आणि ते राजधानीला परत गेले. स्वामीजी, आता माझ्याबरोबर फक्त एक सेवक आणि एक सेविका आहे. जेव्हां वानप्रस्थाश्रमांतले जीवन जगायची मला संवय होईल, तेव्हां ही दोघेजणदेखील परत जातील. आपल्याला माहीत आहेच कीं माझे जीवन नेहमीच सुखासीन तर्‍हेने गेलेले आहे, राजा होतो ना मी!!’’ आणि त्याने तिथे राहायला येण्याचे कारण सविस्तर सांगितले.
कार्तिकेयाने राजाचे कथन लक्ष देऊन ऐकले, व नंतर विचारले, ‘‘म्हणजे त्याचा असा अर्थ झाला कीं इथें येऊन तुम्हाला बराच वेळ झाला, होय ना? तितका वेळ काय करीत होतात? कंटाळा तर आला नाही ना?’’

सत्यकीर्तिने जरा नरमाईच्या स्वरांत म्हटले, ‘‘हो, जरा कंटाळलो खरा! पण नंतर उठून या चंपकवनांतली झाडें झुडुपें बघत होतो. इथली वनराई पाहताना माझ्या मस्तकांत अनेक विचार उचंबळत होते.’’  ‘‘ते कोणते विचार होते ते जरा मला कळेल कां?’’ कार्तिकेयाने विचारले.

‘‘स्वामीजी, या चंपकवनांत फळाफुलांनी लगडलेले अनेक वृक्ष आहेत. औषधी उपयोगाची अनेक लहानमोठी झुडुपें, वेली व रोपटीही भरपूर आहेत. मला वाटलं कीं राजवैद्य भीष्माचार्यांना इथें बोलावून घ्यावं आणि यापैकीं किती वृक्षवेली व रोपें औषधी आहेत ते जाणून घ्यावं. आजारांवर प्रतिबंधक उपाय म्हणून नवी औषधे बनवण्याचं कामदेखील त्यांच्यावर सोंपवावं असं मला वाटतंय.’’ सत्यकीर्तिने सांगितलं.
सगळं ऐकल्यानंतर कार्तिकेयाने गंभीर आवाजांत सांगितलं, ‘‘राजन्, तुम्ही ज्ञानी आहात. मी जे कांही ऐकलंय, त्यावरून स्पष्ट आहे कीं तुम्ही सकल शास्त्रांमधें पारंगत आहात. केवळ डोळे मिटून ध्यानधारणा करण्याने आणि जपजाप्य केल्यानेच मुक्ती मिळते असं थोडंच आहे?’’

सत्यकीर्तिने कांहीही उत्तर न देता मौन पत्करले. तेव्हां कार्तिकेय पुन्हां बोलूं लागला, ‘‘हे पहा राजन्, तुम्ही तडक राजधानीला परत जावे आणि आरामांत आयुष्य कंठावे. राजा या नात्याने आपले विचार उपयोगांत आणावेत. त्यामुळें प्रजाजनांचे कल्याण होईल. चंपकवनाच्या बाबतीत जे तुमचे दूरदर्शी विचार आहेत, ते उत्तम आहेत.’’

सत्यकीर्तिने कांहीही न बोलता कार्तिकेयाच्या पायांना स्पर्श करून वंदन केले. त्यांच्या परवानगीने तो तिथून निघून गेला. दुसर्‍याच दिवशीं तो राजधानीला परत गेला.
ही गोष्ट सांगून वेताळाने राजा विक्रमार्कास विचारले, ‘‘राजन्, कार्तिकेय संन्याशाने सत्कीर्तिला सर्व शास्त्रांत पारंगत आहेस असे म्हटले होते. वानप्रस्थाश्रम आणि तपस्या करण्यासाठी राजाला जो उपदेश त्याने करायला हवा होता, तो न करता राजधानीला परत जाण्याचा सल्ला दिला.

 माझ्या दृष्टीने हे काम न्यायाला धरून व तर्काशी सुसंगत असे वाटत नाही. संन्यासी सर्वस्वाचा त्याग करीत असतात. आणि त्याबद्दल त्यांना एक वेगळाच अहंकार असतो. म्हणून त्याने राजाला परत जायचा सल्ला दिला.
 परंतु, निदान सत्यकीर्ति राजाने तरी संन्याशाला विनंती करायला हवी होती; किमान तपस्या करण्याची अनुमती मागायला हवी होती. असं करण्याऐवजी संन्याशाने सांगितल्याबरोबर दुसर्‍या दिवशी राजा आपला राजधानीला निघून गेला. हा त्याचा निव्वळ अविचारीपणा नव्हे कां? आता त्याला वानप्रस्थ ही मिळाला नाही किंवा तपश्चर्येचे पुण्यही प्राप्त करता आले नाही! जीवनांतल्या समस्यांपासून मुक्त होण्याची त्याची आकांक्षा तशीच राहिली, नाही कां? माझ्या या शंकांचं उत्तर तुला माहीत असूनही तू गप्प बसलास तर तुझ्या मस्तकाचे तुकडेतुकडे होतील.’’
तेव्हां विक्रमार्काने उत्तर दिले, ‘‘आर्योक्ति अंशी आहे, कीं मानव सेवा हीच माधव सेवा आहे. सत्यकीर्ति दीर्घकाळ मानवाच्या सेवेत गुंतलेला होता. परंतु वृद्धापकाळ जवळ आल्यामुळें थकलेल्या शरीराला राज्यकारभाराचा भार वाटूं लागला. म्हणून त्याने राज्यत्याग करायचा निश्चय केला होता. तो तेव्हां वानप्रस्थ व तपस्या यांचाच विचार करीत होता. यांच्यामुळें मुक्ती मिळेल असा त्याचा समज होता. परंतु हा त्याचा गैरसमज होता, अज्ञान होते. कार्तिकेयाने त्याचा स्वभाव ओळखला. राजा सदैव प्रजेचे हित पाहाणारा, त्यांची काळजी घेणारा असा धर्मशील राज्यकर्ता होता.

त्यामुळें जरी तपस्या करण्यासाठीं, अनुग्रह घेण्यासाठी तो चंपकवनांत गेला तरी तिथें दिसणार्‍या झाडांझुडुपांच्या औषधी उपयोगाबद्दलच तो विचार करीत बसला. आपली कामें करण्यासाठीं त्याने दोन सेवक बरोबर ठेवले होते, कारण त्याची त्याला संवय होती. संन्यासी बनणें, सर्वस्वाचा त्याग करणें, तपस्येंत लीन होणे, ही कामें हळूंहळूं, एकामागोमाग एक, अशी करायची नसतात.

ही सर्व एकदमच करायची असतात. नाहीतर ते शक्य होत नाही. कार्तिकेयाने राजाची प्रवृत्ती ओळखली होती. म्हणून त्याने सत्यकीर्तिला राजधानींत परत जाण्याचा आदेश दिला व पुन्हां राज्यकारभारांत लक्ष घालण्यास सांगितले. सूक्ष्मग्रही सत्यकीर्तिला संन्याशाच्या बोलण्यांतला मतितार्थ समजला.

कांहीही न बोलता तो दुसर्‍याच दिवशी परत गेला. इतकंच घडलं होतं. आता याच्यांत जर तुला कार्तिकेय संन्याशी अहंकारी वाटला किंवा राजा अज्ञानी आहे असं वाटलं तर मी म्हणतो कीं ही तुझीच चुकीची विचारसरणी आहे. तुझे अज्ञान प्रकट होते आहे.’’ राजाचे मौनभंग करण्यांत यशस्वी झालेला वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि झाडावर जाऊन बसला.        (सुभद्रादेवीच्या रचनेवरुन)


No comments:

Post a Comment